नागपूर जिल्हा परिषदेत आग, कर्मचारी थोडक्यात बचावले
नागपूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कक्षातील पंख्यात शॉर्टसर्किट होऊन आग लागली. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे विभागात खळबळ उडाली. यावेळी विभागात कर्मचारी मोठा अनर्थ टळला. विभागातीलच दोन परिचालकांच्या दक्षतेमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
जि.प.च्या मुख्यालयातील जुन्या इमारतीमध्ये आरोग्य विभागाचे कार्यालय आहे. याच परिसरात पशुसंवर्धन विभागाचेही कार्यालय आहे. सकाळी १०.३० च्या सुमारास कर्मचारी कार्यालयात आले होते. याचदरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या कक्षाशेजारी असलेल्या अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. असीम इनामदार यांच्या कक्षातील पंख्यामध्ये शॉर्टसर्किट होऊन आगीची ठिणगी उडाली व भडका उडून यात संपूर्ण पंखा जळाला.
याशिवाय परिसरातील लाकडी आलमारीवरही आगीची ठिणगी उडाल्यामुळे आगीने ती लाकडी आलमारीही आपल्या विळख्यात घेण्यात सुरुवात केली. याचवेळी आरोग्य विभागातील परिचर राऊत व सिडाम यांनी त्वरित परिसरातील विजेचा पाॅवर सप्लाय बंद केला व अग्निशमन यंत्र काढून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते अग्निशमन यंत्रच नादुरुस्त असल्याने ते सुरू झाले नसल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, राऊत व सिडाम यांनी त्वरित परिसरातून पाणी आणले व आगीवर पाण्याचा मारा करण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले. या आगीत इतरही इलेक्ट्रिकची वायरिंग जळून खाक झाल्याची माहिती आहे.
जि.प.मध्ये फायर ऑडिटच झालेले नाही
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे घडलेल्या घटनेनंतर शासनाने सर्व रुग्णालये, शासकीय कार्यालये आदींचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर अनेक विभागांनी हे कामही युद्धपातळीवर करण्यासाठी प्रयत्न केले. त्याच पार्श्वभूमीवर जि.प.च्या बांधकाम विभागानेही महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे फायर ऑडिटबाबत पत्रव्यवहार केला. परंतु अद्यापपर्यंत हे ऑडिट झाले नसल्याची माहिती आहे.
नागपूर जिल्हा परिषदेत आग, कर्मचारी थोडक्यात बचावले
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/36mVULp
via
No comments