नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी
नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांना आज शुक्रवारी दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ संजीव कुमार यांनी विजयी घोषित केले आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या एकूण वैध मतांच्या मतमोजणी नंतर विजयासाठी मताचा कोटा निश्चित करण्यात आला होता. उमेदवारांना मिळालेल्या पहिल्या पसंतीच मतांमध्ये विजयासाठी कोटा पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे एकल संक्रमण प्राधान्यक्रम पद्धतीनुसार ( इलिमेशन ) बाद फेरीतील दुसऱ्या क्रमांकाच्या पसंती क्रमानुसार 17 व्या फेरीनंतर अभिजीत वंजारी यांनी विजयासाठीचा निर्धारित मताचा कोटा पूर्ण केला. यासाठी 17 व्या फेरीपर्यत अन्य उमेदवारांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली.
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात काल गुरूवार दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ करण्यात आला. मतमोजणी तब्बल 30 तासांपेक्षा अधिक काळ सुरू होती. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनात नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या मतमोजणीला उपस्थित होते.
कोरोना संक्रमण काळातील या निवडणुकीत कडेकोट प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात आल्या होत्या मतमोजणी केंद्रांमध्ये मास्क, हातमोजे, सॅनीटायझर व सुरक्षित अंतर पाळण्यावर कटाक्ष होता. 28 टेबलवर ही मतमोजणी करण्यात आली. मतदान पूर्णता मतपत्रिकाद्वारे असल्यामुळे गुरुवारी सकाळी टपाली मतदान व मतपेट्या मधील मतपत्रिका एकत्रित करण्यात आल्या. मतपत्रिकांची सरमिसळ करून प्रत्येक टेबलवर एक हजार मत पत्रिका मतमोजणीस देण्यात आल्या. या मतमोजणी दरम्यान प्रत्येक टेबलवर एक हजार याप्रमाणे प्रत्येक फेरीला 28 हजार मतांची मोजणी करण्यात आली. पहिल्या चार फेऱ्या प्रत्येकी 28 हजारांच्या तर पाचवी फेरी 21 हजार 53 मतांची झाली.
पदवीधरांच्या या निवडणुकीत एकूण टपाली व मतपेटीतील मते मिळून 1 लक्ष 33 हजार 53 मतदारांनी मताधिकार बजावला. त्यातील 11 हजार 560 मते अवैध ठरली. वैध ठरलेल्या 1 लक्ष 21 हजार 493 मतांचा एकल संक्रमण प्राधान्यक्रम निवडणूक पद्धतीनुसार कोटा काढण्यात आला. यानुसार एकूण वैद्य मत भागीला दोन अधिक एक अशा सूत्रानुसार 60 हजार 747 मतांचा कोटा ठरला.
तथापि, पसंतीक्रमाच्या या निवडणुकीमध्ये अपेक्षित असणारा 60 हजार 747 चा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही. (अभिजीत गोविंदराव वंजारी पहिल्या पसंतीची एकूण मते 55 हजार 947, संदीप जोशी एकूण मते 41 हजार 540, अतुल कुमार खोब्रागडे 8 हजार 499, नितेश कराळे 6 हजार 889 मते मिळाली ) विजयासाठी निश्चित केलेला मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्यामुळे या निवडणुकीतील मतमोजणीचा भाग क्रमांक २ अनुसार इलिमेशन फेरी सुरु करण्यात आली. त्यानुसार दुसऱ्या पसंतीक्रमाची मते इलिमिशन फेरी नुसार मोजणीला घेण्यात आली.
No comments