Breaking News

नेटकऱ्यांपुढे ‘सायबर सुपारी`चे आव्हान: अजित पारसे, सोशल मिडिया तज्ज्ञ व विश्लेषक.

Nagpur Today : Nagpur News

सोशल मिडियातून नवे संकट. सायबर गुन्हेगारांकडून व्यवसाय, वैयक्तिक आयुष्य लक्ष्य.

 

नागपूर, ता. ४ : जगभरात सोशल मिडिया वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यात अनेक व्यावसायिक सोशल मिडियाचा ‘बिजनेस टूल’ म्हणूनही वापर करीत आहे. त्यातच वैयक्तिकरित्याही अनेकजण अजाणतेपणाने घरातील, कुटुंबातील वैयक्तिक माहितीही सोशल मिडियावर टाकत आहे. व्यवसाय तसेच एखाद्याला वैयक्तिकरित्या लक्ष्य करणाऱ्या अनेक पोस्ट दिसून येत असल्याने आता सायबर सुपारी घेणाऱ्या गुन्हेगारांचे नवे संकट उभे ठाकल्याचे चित्र आहे.

जीवानिशी संपवण्याची सुपारी दिल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण सोशल मिडियातूनही एखाद्याला जीवनातून उद्ध्वस्त करण्यासाठी, समाजात तेढ, तणाव निर्माण करण्यासाठी, व्यवसायाला मोठं नुकसान पोहोचवण्यासाठी, एखाद्या मोठ्या व्यक्तिच्या खाजगी आयुष्यात कलह निर्माण करण्यासाठी सायबर सुपारी देण्याचे प्रकार घडत असल्याचे निरिक्षण सोशल मिडिया तज्ज्ञ व विश्लेषक अजित पारसे यांनी नोंदविले आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार भारतात गेल्या वर्षभरात तब्बल ६३.५ टक्के सायबर गुन्हे वाढले आहेत, यात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात शहरात एका गटाने दुसऱ्याच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सात सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा शहरात सायबर गुन्हे वाढले आहे. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबरपर्यंत सायबर क्राईमच्या १२६ घटनांची नोंद झाली होती.

यंदा जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत १६६ गुन्ह्यांची नोंद झाली. सायबर क्राईममध्ये सोशल मिडियावरून एखाद्याला लक्ष्य करणे, एखाद्याच्या व्यवसायाची बदनामी करण्याच्याही घटनांचा समावेश होता. अलीकडच्या काळात अशा घटना अंमलात आणणाऱ्या गुन्हेगारांची नवी जमात तयार झाली असून ते सायबर सुपारी घेत असल्याचेही पारसे यांनी सांगितले. व्यवसायासाठी सोशल मिडिया फायदाचा ठरत असला तरी व्यावसायिक स्पर्धेतून सायबर सुपारी ही त्याची एक काळी बाजू गेल्या काही वर्षातून ठळकपणे पुढे आली आहे. सोशल मिडीया वापरणारे बहुतांश नागरिक वैयक्तिक आयुष्य, कुटुंबातल्या छोट्यामोठ्या गोष्टी, नाराजी, भांडणं, वादविवाद इतरांना सहज कळेल, अशा पोस्ट टाकतात. याच वैयक्तिक माहितीच्या आधारे सायबर सुपारी घेणारे पोस्ट टाकणाऱ्यांचे सायकोमॅट्रीक प्रोफाईल तयार करुन त्याच्या वैयक्तिक आयुष्य़ात कलह निर्माण करण्याचे काम करतात. अशा प्रकारे सायबर गुन्ह्याचीही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सायबर सुपारीला बळी पडणार नाही, याची प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे. सायबर गुन्हेगारांची समाजमाध्यम वापरणाऱ्यांच्या प्रत्येक हालचालींवर नजर असते. सायबर गुन्हेगारीबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे, त्यांना साक्षर करणे आवश्यक आहे. तरच सायबर गुन्हे, सायबर सुपारीचे प्रकार थांबवणे आणि कमी करणे शक्य आहे.

– अजीत पारसे, सोशल मिडिया तज्ज्ञ व विश्लेषक.

नेटकऱ्यांपुढे ‘सायबर सुपारी`चे आव्हान: अजित पारसे, सोशल मिडिया तज्ज्ञ व विश्लेषक.



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3lBV02x
via

No comments