Breaking News

मित्रांसोबत सहलीला गेलेल्या युवकाचा धरणात बुडून मृत्यू

Nagpur Today : Nagpur News

रामा डॅम परिसरातील दुर्दैवी घटना
#बेला पोलिसांच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह सापडला
#धरण परिसराची सुरक्षा रामभरोसे

नागपूर:-विरंगुळा म्हणून आपल्या पाच मित्रांसोबत सहलीला गेलेल्या युवकाचा धरणाच्या पाण्यात बुडुन करून अंत झाल्याची दुर्दैवी घटना रामा डॅम परिसरातील साहस कँप नजीक शुक्रवार दि.३१ जुलै रोजी दुपारी तीन च्या सुमारास बेला पोलीस स्टेशन अंतर्गत घडली.बेला पोलीसांच्या तब्बल ११ तासांच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह शोधण्यास अखेर यश आले.विपुल वीरेंद्र पटेल (२२) रा. हनुमान नगर बुटीबोरी असे या घटनेतील मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की,मृतक विपुल वीरेंद्र पटेल,आशिष वासुदेव बावणे(२२) रा.तलमले ले आउट,सतीश रघुनाथ लांजेवार (२१) रा.सातगाव,शुभम चंद्रपाल त्रिपाठी (२२) रा.तलमले ले आऊट, शुभम कापसे (२२) रा.सातगाव आणि रोहित निंबुरकर (२२) रा.सिडको हे सर्व बुटीबोरी परिरात राहतात.व एकत्रच शिक्षण घेतात.त्यामुळे या सर्व महाविद्यालयीन मित्रांनी योजना बनवून सहलीचे आयोजन केले.त्यानुसार ते दि ३१ जुलै ला रामा डॅम परिसरात फिरयाला गेले होते.फेर फटका मारल्यानंतर त्यांना पाण्यात पोहण्याची कल्पना सुचली.सर्वांनी साहस कँप नजीक असलेली जागा पसंत केली.सर्वांनी अंगावरचे कपडे काढून पाण्यात पोहायला सुरुवात केली.पोहण्यास तरबेज असलेले अन्य युवक हे समोर निघून गेले.परंतु दुर्दैवी विपुलला पाण्याच्या खोलीचा अंदाज बांधता आला नसल्याने तो त्या ठिकाणी असलेल्या डोहात अडकून पाण्याखाली बुडाला.बऱ्याच वेळानंतरही विपुल पाण्याबाहेर आला नसल्याचे बघून सर्व मित्र घाबरले.आरडा ओरड केली.परंतू घटनास्थळाचा परिसर निर्जन असल्याने कुणालाही त्याच्या मदतीला धावता आले नाही.

अखेर शुभम आणि रोहित यांनी मोटर सायकल ने बेला पोलिस ठाण्यात धाव घेऊन सर्व हकीकत ठाणेदाराला सांगितली.ठाणेदार शिवाजी भांडवलकर यांनी पो उ नि राहुल ढेंगळे,पो ह अशोक चौहान,गणेश गिरडकर,शाम मरसकोल्हे,शैलेश देशभ्रतार,मनोज मेंढूले,पो शि नीलकंठ कटोरे,प्रमोद ढुमने यांच्यासह घटनास्थळी धाव घेऊन लहु मन्ने,विजय बावणे,अनिल बावणे या मच्छीमारांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली.रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू ठेवून बुडीत विपुल याचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला मात्र रात्र झाल्याने शोधकार्य थांबवण्यात येऊन आज सकाळी साडे पाच पासून शोधकार्य सुरू केले.अखेर मृतक विपुल चा मृतदेह हा पाण्याच्या वीस फूट खोल एका दगडाच्या फटीत अडकून असलेला आढळला.मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रवाना करून घटनेची नोंद केली.पुढील तपास बेला पोलिस करीत आहेत.

महत्वाची बाब असी की रामा डॅम परिसर हा पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो.या ठिकाणी शेकडो मुले मुली मौज मजा करायला येत असतात.परंतु या परिसरात सुरक्षेच्या बाबतीत येथील व्यवस्थापनाचा बेजबादारपणा दिसून येतो.अपघात संभाव्य ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचना फलक नाही.या ठिकाणी येणाऱ्या लोकांची कसलीही चौकशी होत नाही.मागील तीन वर्षांअगोदर देखील या परिसरात नागपूर येथील चार तरुणांचा जीव गेला होता.या नंतरही येथील व्यवस्थापनाला जाग आलेली नाही.यामुळे येथील सुरक्षा ही रामभरोसेच असल्याची तक्रार रामा येथील पोलिस पाटील अशोक उपरे यांनी केली आहे.अजून या ठिकाणी किती बळी गेल्यावरच व्यवस्थापनाला जाग येईल असा सवाल आ वासून उभा आहे.

धरणावर झालेला अपघात हा दुर्दैवी प्रकार असून कर्मचाऱ्याच्या कमतरतेमुळे आम्ही सर्व ठिकाणी लक्ष ठेवू शकत नाही.इथे कर्मचाऱ्यांची मान्य संख्या ४४ असून प्रत्यक्षात मात्र २ कर्मचारी कार्यरत आहे.माझ्या स्वतःकडे तीन कार्यालयाचा कार्यभार असून तीन तीन ठिकाणी काम करताना तारेवरची कसरत करावी लागते.हेमंत कुलकर्णी,रामा डॅम, व्यवस्थापक

“पोलिसांची नेहमीच या परिसरात गस्त होत असते.परंतु झाडी झुडपांचा परिसर असल्याने फारसं लक्षात येत नाही.व्यवस्थापनाच्या दुर्लक्षी स्वभावामुळे घडणाऱ्या घटना ही खेदजनक बाब असून संपूर्ण ताण हा पोलिस खात्यावर येतो.अपघात संभाव्य ठिकाणी सूचना फलकाची आवश्यकता आहे जेणेकरून अशा दुर्दैवी घटना घटना होणार नाही.तरुणांनी देखील आई वडिलांचा विचार करून आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी.” ठाणेदार शिवाजी भांडवलकर,बेला

मित्रांसोबत सहलीला गेलेल्या युवकाचा धरणात बुडून मृत्यू



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/33hXptK
via

No comments