31 मे रोजी दीपोत्सव करून घरोघरी साजरी करावी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती – खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे
दरवर्षी 31 मे रोजी संपूर्ण भारतात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती समारंभपूर्वक, जल्लोषात व मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी कोरोना महामारी च्या लॉकडाऊन मुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती सार्वजनिक रित्या साजरी करणे अडचणीचे आहे. म्हणून “या शुभ प्रसंगी 31 मे ला आपण सर्व परिवारातील सदस्य आपल्या घरीच जयंती साजरी करू या; सकाळी 9 वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे किंवा मूर्तीचे पूजन व माल्यार्पण करावे तसेच रात्री ठीक 8 वा. आपल्या घरासमोर कमीत कमी 5 दीप प्रज्वलित करून हा सोहळा भव्य दिव्य करावा” असे आवाहन खासदार पद्मश्री पुरस्कृत नेत्रतज्ञ डॉ. विकास महात्मे यांनी केले आहे.
राजमाता अहिल्यादेवी यांचे कार्य सर्वश्रुत आहे. परंतु त्यांची काही वैशिष्ठ्ये आज ही मानवी जीवन बदलू शकतील, मानवतेचा संदेश विश्वात प्रसारित करू शकतील, त्याबद्दल काही अंश :-
28 वर्षे शांततापूर्ण व लोककल्याणकारी, न्यायपूर्ण मार्गाने राज्य चालवणा-या सशक्त महिला राज्यकर्त्या होत्या.
राजमाता अहिल्यादेवी अत्यंत कुशल प्रशासक म्हणून ओळखल्या जात होत्या.
त्यांची न्यायप्रणाली अत्यंत आदर्श मानल्या जात होती.
संपूर्ण देशात अहिल्यादेवींनी जागोजागी घाट बनविले, मंदिरांचा जीर्णोद्धार केला; लोकांमध्ये नैतिक मूल्ये रूजविली. “सद्गुणाला जात नसते अन् शौर्याला धर्म नसतो” असे सुंदर विचार त्यांनी विश्वाला दिले.
“माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे. माझ्या प्रत्येक कृत्याला मी स्वतः जबाबदार आहे.” हे त्यांचे विचार त्यांच्या राजगादीच्या मागे लिहिलेले होते. आजच्या भाषेत त्याला आपण (Mission Statement) जीवन लक्ष कथन म्हणू शकू.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धनगर समाजाच्या होत्या. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात या भटक्या समाजाचे लोक राहतात. मेंढीपालन व शेळी पालन हे त्यांचे प्रमुख उद्योग आहेत. देशांच्या विविध भागात पाल, बघेल, गडरिया, कमरू, गायरी, पुर्बिया, कुरबा, कुरूमा, कुरूम्बर, ग्वाला, रेबारी, भरवाड, देवासी, मलधारी, गाडरी, गद्दी, गोला, कुरूम्बास, कुरूम्बर, गोंडा इत्यादी विविध नावांनी त्यांना ओळखले जाते. हे सर्व अहिल्यादेवींना आपले आदर्श व दैवत मानतात, त्यांचे पूजन करतात.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त शत शत नमन.
“इवलासा दीप माझा … उजळेल सारी दुनिया
अहिल्या मातेच्या सामर्थ्याने … घडेल ही किमया”
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3eysKut
via
No comments