‘फॉगींग’ आणि ‘सॅनिटायजेशन’चा कागदोपत्री सोपस्कार बंद करा!
महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाला खडसावले : लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता थातूरमातूर फॉगींग आणि सॅनिटायजेशन
नागपूर : शहरात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता सर्वत्र फवारणी होणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून दररोजच फवारणीची प्रसिद्धी केली जाते. मात्र रोजच लोकप्रतिनिधींना नागरिकांकडून फवारणीबाबत तक्रारी केल्या जातात. शहरातील अनेक भागात अद्यापही योग्य प्रकारे ‘फॉगींग’ आणि ‘सॅनिटायजेशन’ करण्यात आले नाही. अनेक छोट्या वस्त्यांमध्ये अद्यापही कोणतिही व्यवस्था केली जात नाही. अशा स्थितीत प्रशासनाद्वारे दररोज ‘फॉगींग’ आणि ‘सॅनिटायजेशन’चा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीला विश्वासात न घेता सर्वत्र थातुरमातुर ‘फॉगींग’ आणि ‘सॅनिटायजेशन’ केले जात आहे. ‘फॉगींग’ आणि ‘सॅनिटायजेशन’चा हा कागदोपत्री सोपस्कार तात्काळ बंद करा, अशा कडक शब्दात महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाला खडसावले.
यासंबंधी महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना नुकतेच एक कार्यालयीन पत्र सोपविले आहे. या पत्रात नमूद केल्यानुसार, शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रत्येक भागात ‘सॅनिटायजेशन’ तसेच डासांच्या वाढत्या संख्येमुळे नियमीत ‘फॉगींग’ करण्यात यावी. याकरिता मागील सात दिवसांपूर्वीच मनपा प्रशासनाला निर्देश देण्यात आले होते. मात्र ‘फॉगींग’ आणि ‘सॅनिटायजेशन’बाबत आवश्यक तशी कार्यवाही करण्यात आली नाही. कोरोनाच्या दहशतीमुळे नागरिक स्थानिक प्रतिनिधी म्हणून संबंधित नगरसेवकांना वारंवार संपर्क करतात. मात्र प्रशासनातर्फे ‘फॉगींग’ आणि ‘सॅनिटायजेशन’बाबत कोणत्याही लोकप्रतिनिधीला विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे प्रशासन नगरसेवकांना विश्वासात न घेता प्रसिद्धीसाठी थातुरमातुर ‘फॉगींग’ आणि ‘सॅनिटायजेशन’ करते का? अशी शंका महापौर संदीप जोशी यांनी या पत्रात उपस्थित केली आहे.
सद्यपरिस्थिती लक्षात घेता ‘फॉगींग’ आणि ‘सॅनिटायजेशन’चे महत्व गांभीर्याने लक्षात घेउन प्रशासनातर्फे कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. मात्र अशा स्थितीतही महापौरांपासून ते स्थायी समिती सभापतींपर्यंत कोणालाही विश्वासात न घेता आयुक्त स्वत: निर्णय घेत आहेत. तर दुसरीकडे प्रशासन देखील स्थानिक स्तरावर लोकप्रतिनिधी म्हणजे स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता काहीतरी करायचे या उद्देशाने केवळ कागदोपत्री सोपस्कार करीत आहेत, यावरही त्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सगळीकडे ‘फॉगींग’ आणि ‘सॅनिटायजेशन’ होणे आवश्यक आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आवश्यक ते सहकार्य करण्यास तयार आहेत. याबाबत आयुक्तांनी स्वत: लक्ष घालून संपूर्ण शहरात विशेषत: आतल्या गल्ल्यांमध्ये ‘फॉगींग’ आणि ‘सॅनिटायजेशन’ करण्यात यावे. सद्यस्थितीत सर्वांनी एकत्रितरित्या कोरोनाला हद्दपार करणे आवश्यक आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देशही महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना दिले.
‘फॉगींग’ आणि ‘सॅनिटायजेशन’चा कागदोपत्री सोपस्कार बंद करा!
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/39uzarr
via
No comments