नागरिकांना मिळाला ताजा आणि स्वस्त दरातील भाजीपाला
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा पुढाकार : ठोक भाजी विक्रेत्यांकडून शहरातील विविध भागात विक्री
नागपूर: कृषि उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड व काटन मार्केट मध्ये भाजी विकणा-या शेतक-यांनी बुधवारपासून महानगरपालिकेचे आयुक्त श्री.तुकाराम मुंढे यांनी उपलब्ध केलेल्या जागेवर भाजीपाल्याची विक्री सुरु केली. यामुळे कृउबासच्या यार्डमधील गर्दी नाहिसी झाली आणि लोकांना त्यांच्या परिसरात ताजा आणि स्वस्त भाजीपाला आजपासून उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये दररोज ६०० वाहने येत असल्याने तेथे गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी आता शहरात भाजीपाल्याचे केवळ १०० वाहने येण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही वाहने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये न जाता शहरातील विविध भागात आज पोहोचली. रेशीमबाग, यशवंत स्टेडियम, बुधवार बाजार, राजाबाक्षा, मंगळवारी बाजार, झिंगाबाई टाकळी मैदान आणि जयताळा या ठिकाणी या वाहनातून भाजीची ठोक भावाने विक्री करण्यात आली. लहान भाजीपाला विक्रेत्यांनी व नागरिकांनी या ठिकाणी जाऊन माल घेतला. या ठिकाणी सामाजिक अंतर पाळण्यात येत असून नागपूर महानगरपालिकेद्वारे नागरिकांना प्रत्येक तीन फुटावर उभे राहण्यासाठी खुणा करून देण्यात आलेल्या आहेत.
विशेष म्हणजे थेट शेतकरी ते ग्राहक ही संकल्पनासुद्धा आता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अंमलात आणली आहे. ग्राहकांपर्यंत थेट भाजीपाला नेण्याचे आवाहन मनपा आयुक्तांनी शेतकऱ्यांना केले असल्याने ग्राहकांनाही ताजा भाजीपाला मिळू लागला आहे. सुमारे ३६ शेतकऱ्यांची यादी मनपाने अधिकृत सोशल मीडिया आणि वेबसाईटवर प्रकाशित केली असून फोन केल्यानंतर ग्राहकांना ताजा भाजीपाला घरपोच मिळू लागला आहे. दूध विक्रेतेही घरोघरी जाऊन दूध पोहचवित आहे. उपलब्ध जागांवर व्यवसाय करणा-या शेतक-यांच्या सुविधेसाठी मनपातर्फे पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाच्या खबरदारी संदर्भातही वेळोवेळी त्यांना ध्वनीप्रक्षेपकाद्वारे सजक केले जात आहे.
मनपाने उपलब्ध करून दिलेल्या जागांव्यतिरिक्त इतर शेतक-यांना शहरातील वेगवेगळ्या भागात जाउन घरपोच भाजीपाला विक्रीची सेवाही देता येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आणि आरोग्यासाठी प्रशासन सर्व व्यवस्था करीत असून नागरिकांनी या व्यवस्थेत सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. कॉटन मार्केटला पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहे.
लॉकडाउनच्या स्थितीत मनपाच्या या निर्णयामुळे शेतक-यांनाही दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे. शेतकऱ्याचा शेतीमाल विकायला त्रास होत आहे. तसेच ग्राहकांना जास्त भावात माल घ्यावा लागत आहे. परंतु नागपूर महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे ग्राहक व शेतकरी यांना योग्य भाव मिळत आहे. याकरिता सर्व शेतकरी मनपाचे आभारी आहेत, अशी भावना शेतक-यांनी व्यक्त केली.
भाजीपाला विक्रीसाठी झोन निहाय उपलब्ध जागा
लक्ष्मीनगर झोन – जयताळा आठवडी बाजार.
धरमपेठ झोन – रामनगर मैदान, यशवंत स्टेडियम.
हनुमान नगर झोन – रेशिमबाग मैदान, कलोडे महाविद्यालय बेलतरोडी रोड इंद्रप्रस्थ सोसायटीची जमीन, श्री.ढगे यांच्या बंगल्याजवळ पिपळा रोड.
धंतोली झोन – उंटखाना मैदान टाटा कॅपिटल हाईट समोर, राजाबक्षा मैदान, भगवान नगर मैदान पोस्ट ऑफिसजवळ, बालाजी नगर मैदान वेलू कॉर्नरजवळ, रेणुका विहार कॉलनी मैदान, नरेंद्र नगर एन.आय.टी. मैदान.
नेहरूनगर झोन – आशीर्वाद नगर एन.आय.टी. बाजार, श्रीनगर मैदान दर्शन कॉलनी, ताजबाग रोड भविष्य निर्वाह कार्यालयापुढील जागा.
गांधीबाग झोन – दिघोरीकर मैदान जुना बगडगंज, मनपा शाळा नवी शुक्रवारी मॉडेलमिल चौक गाडीखाना.
लकडगंज झोन – सरदार वल्लभभाई पटेल मैदान कच्छीविसा भवन जवळ सतनामीनगर, भास्कर व्यास मैदान पूर्व वर्धमान नगर.
आसीनगर झोन – एच.आर. कॅन्सर हॉस्पिटल कळमना रिंग रोड, दीपक नगर उप्पलवाडी रोड.
मंगळवारी झोन – नारा रोड उजव्या बाजूला नारा, क्रिष्णाधाम झिंगाबाई टाकळी, गुमान लॉन गोरेवाडा.
भाजीविक्रेत्यांना ‘कोरोना’चा संसर्ग होऊ नये म्हणून काही अटी पाळायच्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत….
– मास्क, सॅनिटायजरचा वापर बंधनकारक
– आरटीओ नियमाप्रमाणे वाहनाची सर्व कागदपत्रे सोबत असणे आवश्यक
– वाहन चालकाचा परवाना जवळ असणे आवश्यक
– वाहन चालकास खोकला, ताप, सर्दी आदी जाणवल्यास त्याने तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करून घेणे बंधनकारक
– सदरचे वाहन भाजीपाला मालाव्यतिरिक्त इतर वाहतुकीस वापरता येणार नाही
नागरिकांना मिळाला ताजा आणि स्वस्त दरातील भाजीपाला
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3ayKyE1
via
No comments