Breaking News

पूर्व इतिहासाचे स्मरण करून जे संकट आले आहे त्यावर धैर्याने मात करुया – शरद पवार

Nagpur Today : Nagpur News

मुंबई : लातूर भूकंप असेल किंवा मुंबई बॉम्बस्फोट असेल या पूर्व इतिहासाचे स्मरण करून जे संकट आले आहे त्यावर धैर्याने मात करून कामाला लागूया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील जनतेला केले आहे.

दरम्यान पोलिस आणि डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत शरद पवार यांना दु:ख झाले असून आपल्यासाठी जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या या लोकांना सहकार्य करुया अशी विनंती केली.

आज पुन्हा एकदा शरद पवार यांनी जनतेशी संवाद साधला.

सध्या ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. मुंबई व पुणे याबाबतीत वेगळा निर्णय होईल परंतु काही ठिकाणांचा लॉकडाऊन उठवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पूर्वीसारखी गर्दी करु नका. सरकारच्या सूचनांचे कटाक्षाने पालन करा असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

कारखाने, व्यापार आणि उद्योग गेले ४० दिवस बंद आहेत. रोजगार बुडाला आहे. त्याचा विपरीत परिणाम शासनाच्या अर्थकारणावर होत आहे. राज्याचा २०-२१ चा अर्थसंकल्प पाहिला तर महसुली उत्पन्न हे ३ लाख ४७ हजार कोटीच्या आसपास जाईल असं दिसतंय परंतु आज सुधारित माहिती घेतली असता या महसुलात तूट पडेल असे चित्र दिसतंय. ती तूट १ लाख ४० हजार कोटी होईल. याचा अर्थ एकंदर येणाऱ्या उत्पन्नापैकी ४० टक्के उत्पन्न महसुलाचे कमी होईल याचा एकंदरीत परिणाम राज्याच्या सगळ्या विकासाच्या विविध कामावर झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून राज्यावरील आर्थिक संकट लक्षात घेऊन पंतप्रधानांना या प्रश्नांची कल्पना यावी म्हणून सविस्तर प्रस्ताव दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले. दरम्यान केंद्र व राज्य एकत्र बसून या सगळ्या प्रश्नांवर मार्ग काढण्याची निती ठरवावी. त्यासाठी त्रास होईल पण आव्हान आहे. त्यामुळे एकजुटीने यावर मात करु असे सांगतानाच राज्यांना वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक मदत करता येईल म्हणून हा प्रस्ताव दिल्याचे सांगतानाच केंद्र सरकारने राज्यांना अधिक शक्ती दिली पाहिजे. सध्या राज्य फिल्डवर काम करत आहे. लोकांच्या यातना कमी करण्यासाठी कामावर गुंतले आहे. सगळी यंत्रणा कामाला लागली आहे तर केंद्राची यंत्रणा ही रिसोर्स कसे निर्माण करता येईल. जगात कसे बदल होत आहेत. संशोधन करून आपल्याकडे कशी उपयुक्तता करता येईल असे काम करत आहे त्यामुळे त्यांनी लक्ष द्यावे अशी मागणीही शरद पवार यांनी केली आहे.

सध्या संस्था व संघटना मदत करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलच्यावतीने पक्षीय विचार न करता रुग्णसेवा दिली जात आहे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स आणि त्यांच्या स्टाफला कोरोना विषाणूची बाधा होवू नये म्हणून सुरक्षा आवरणे देत हातभार लावला जात आहे. याशिवाय राज्यात जे लोककलावंत आहेत त्यांना आर्थिक मदत राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून केली जात आहे त्याची अंमलबजावणी सुरू आहे असेही शरद पवार यांनी सांगितले.

वेगवेगळ्या राज्यात देवदर्शन व पर्यटनासाठी गेलेले नागरीक अडकून पडले आहेत त्यांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी राज्यसरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी मुंबईत आपत्ती व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. तिथे अभय यावलकर काम करत आहेत. अजूनही कुणाला काही अडचण असेल त्यांनी ०२२-२२०२७९९०,०२२-२२०२३०३९,याशिवाय ९८२११०७५६५, ८००७९०२१४५ इथे संपर्क साधावा त्यांच्याकडून सहकार्य असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

राज्यातील साखर कारखाने, सूत गिरण्या, सहकारी बँका, सहकारी पतसंस्था यांनी आपल्या नफ्यातील रक्कम बाजुला करून गरीब जनतेला अन्न धान्य द्यावे. त्यामध्ये गहू, तांदूळ, डाळी दिल्या तर उपयोगी ठरतील असे आवाहनही शरद पवार यांनी सहकार क्षेत्रातील लोकांना केले आहे.

या सगळ्या कोरोना संकटाचा परिणाम शेतीवर होत आहे. शेतकर्‍यांना शेतीसाठीचे जे कर्ज दिले जाते त्याची पुनर्रचना केली पाहिजे. अल्पमुदतीचे कर्ज मध्य व दिर्घ मुदतीचे करावे. कर्जफेडीचे हप्ते लांबवले पाहिजे. व्याजदरात सवलत दिली पाहिजे. पीककर्जाचा व्याजाचा दर शून्यावर आणावा आणि तसा दर परत करण्याचा कालावधी ३० जून २०२० च्यापुढे ढकलावा. असेच निर्णय उद्योग, व्यापारासंबंधी आर्थिक क्षेत्रात घेण्याची गरज आहे. शेती, उद्योग, व्यापार या सगळ्या क्षेत्रात आज त्यांचं अर्थकारण सावरण्यासाठी रिझर्व्हं बॅंकेकडून पावले टाकली जात आहेत त्यात आणखी वाढ केली पाहिजे. त्यांनी मार्गदर्शन करण्याऐवजी आदेश द्यावा. तो आदेश जिल्हा व अन्य बॅंकांना पाळावाच लागेल अशाप्रकारची सूचना करावी तर ख-याअर्थाने संकटग्रस्त लोकांना मदत होईल असेही शरद पवार यांनी सांगितले.

यावेळी शरद पवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व त्यांचे सहकारी आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था नीट राहण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगतानाच धान्य वितरीत करणारी आणि होणारी आकडेवारी शरद पवार यांनी यावेळी सांगितली.

जगात कोरोनाचे संकट मोठं आहे. दिवसेंदिवस जगातील आकडेवारी पाहिली तर पाश्चिमात्य देशात मृत्यूची संख्या वाढली आहे. शिवाय भारतातही प्रादुर्भाव वाढला आहे. त्याची किंमत मोजावी लागते आहे. पाश्चिमात्य देश आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत. शिवाय संशोधनात पुढे आहेत. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता भारताच्या मानाने तुलनात्मक यश तिकडे कमी मिळतंय. अमेरिका, फ्रान्स, इटली या देशातील मृत्यूमुखींची संख्या टक्केवारीत अधिक आहे असेही सांगितले.

देशात ३३ हजार रुग्ण आहेत. तर १ हजार ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. ८ हजार ३२५ उपचार घेवून घरी गेले आहेत. हे देशाचे चित्र आहे तर महाराष्ट्रात ९ हजार ९१५ इतके रुग्ण आहेत. ४३२ लोकांचा मृत्यू झाला आहे. १ हजार ५९३ उपचार घेवून घरी गेले आहेत. भारताचा विचार करता अधिक संख्या ही मुंबई व पुणे, जळगाव, नाशिकचे मालेगाव,औरंगाबाद, पूणे जिल्हा आहे. मुंबई व पुणे येथे सर्वाधिक संख्या लक्षात येत आहे. मुंबईतील झोपडपट्टीचा विचार केला तर संख्या अधिक आहे. यामध्ये महानगरपालिकांनी टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वच रुग्ण कोरोनाचे नाहीत. अन्य रोगाचे आहेत. यासाठी आरोग्य यंत्रणा अतिशय कष्टाने या क्षेत्रातील सर्व घटक मनापासून काम करत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी आपण घेतोय. वैद्यकीय क्षेत्रातील लोक कष्ट व धोका पत्करुन काम करत आहेत. कायदा व सुव्यवस्था ठेवणारे पोलिसही काम करत आहेत. यामुळे इथली परिस्थिती दुरुस्त होण्यास मदत होत आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक शरद पवार यांनी केले.

फेसबुक पेजवर येतानाच सुरुवातीला शरद पवार यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला भेटतोय असे स्पष्ट केले. उद्या कामगार दिवस. कामगार, कष्टकऱ्यांचे स्मरण करणारा हा दिवस आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही तुमची माझी जबाबदारी आहे असेही शरद पवार म्हणाले. याशिवाय १ मे १९६० रोजी अनेक वर्षे महाराष्ट्रातील मराठी भाषिकांचे राज्य व्हावे ही पूर्तता झालेला हा दिवस. या दिवशी देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू मुंबईत आले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत नव्या राज्याची घोषणा केली. आज ६० वर्षे महाराष्ट्र निर्मितीला पूर्ण झाली आहे. तर दुसरीकडे आपल्या सोप्या व साध्या भाषेतील खंजिरीने समन्वयाचा, मानवतेचा संदेश दिला ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आहे. त्यांची जयंती अनेक भागात साजरी होत आहे.

असे सांगतानाच दूसरीकडे आणखी एका गोष्टीने अस्वस्थ आहोत ते म्हणजे काल आणि आज या देशातील रसिकांना सतत समाधान देण्यासाठी आयुष्य दिले. आपल्या कलेच्या दर्शनाने लोकांपर्यंत पोचले ते दोन महान कलावंत आपल्यात नाहीत. एक इरफान खान. कलेच्या क्षेत्रात त्यांनी योगदान दिले. कलेच्या माध्यमातून संबोधित केले. तर दुसरीकडे कपूर कुटूंब व देशातील प्रत्येक रसिक यांच्या काही पिढ्या यांचं नातं आहे. त्यामध्ये पृथ्वीराज कपूर, राज कपूर या सर्वांची कला देशाबाहेर पोचली त्याबद्दल त्यांचा सन्मान होत आहे. आज याच मालिकेतील कलावंत ऋषी कपूर यांचे निधन झाले. ज्या कुटुंबियांनी रसिकांना संतुष्ट ठेवले त्या महान कलाकारांना शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.

शेवटी फेसबुक पेजवर आलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देत काळजी घ्या घराबाहेर पडू नका अशा सूचनाही शरद पवार यांनी केल्या.

पूर्व इतिहासाचे स्मरण करून जे संकट आले आहे त्यावर धैर्याने मात करुया – शरद पवार



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2VR5yRq
via

No comments