Breaking News

शेतकऱ्यांनी थेट शहरात येऊन भाजीपाला विकावा

Nagpur Today : Nagpur News

आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन : कॉटन मार्केट ३१ मार्चपर्यंत बंद

नागपूर: निर्जंतुकीकरणासाठी कॉटन मार्केट ३१ मार्चपर्यंत तीन दिवस बंद करण्याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना शहरातील ज्या परिसरात सोयीचे होईल त्या परिसरात जाऊन भाजीपाला विकावा.

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सद्यस्थितीत सुरू असलेले लॉकडाऊन लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने नागपुरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये व त्यांना भाजीपाला, दूध, किराणा व औषधी इत्यादी आवश्यक वस्तू घरपोच उपलब्ध व्हाव्यात यासाठी अगोदरच पाऊल उचलले आहे. यासाठी कृषी विभागाच्या मदतीने आजूबाजूच्या खेड्यातील व गावातील शेतकरी आपला भाजीपाला घरोघरी जाऊन ग्राहकांना विकत आहेत.

परंतु कॉटन मार्केट हे भाजीपाला विक्रीचे मध्यवर्ती केंद्र असल्यामुळे तेथे फार जास्त प्रमाणात गर्दी होत असल्याचे लक्षात आल्याने सदर मार्केट पुढील तीन दिवस अर्थात ३१ मार्चपर्यंत निर्जुंतुकीकरण करण्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तेथे आपला भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला थेट आपल्या वाहनाने घरोघरी जाऊन विकावा. ज्या शेतकऱ्यांना ज्या भागात भाजीपाला विकायचा आहे, त्या भागात विकता येईल.

त्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे प्रभारी उपायुक्त महेश मोरोणे (मोबाईल क्र. ९८२३३३०९३२) व बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य (मोबाईल क्र. ९६७३९९६३३२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गर्दीमुळे होणारा संभाव्य धोका लक्षात घेता हे पाऊल उचलण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा शहरातील नागरिकांना अविरत सुरू राहावा, हीच यामागची भूमिका आहे. कुठलाही बाजार बंद करणे, हा महानगरपालिकेचा उद्देश नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यानी आपला भ्रमणध्वनी क्रमांक कळविल्यास तो नागरिकांच्या सोयीसाठी प्रकाशित करण्यात येईल, जेणेकरून नागरिक घरपोच सेवेसाठी थेट संपर्क करू शकतील.

शेतकऱ्यांनी थेट शहरात येऊन भाजीपाला विकावा



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2wDyhzL
via

No comments