गरीब व गरजूंना शिवभोजन थाळीचे मोफत वितरण
नागपुरात सामाजिक बांधिलकी व माणुसकीचे दर्शन
नागपूर : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक गरीब व मजूर वेळेत गावी पोहचू शकले नाहीत. त्यांना इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि डागा रुग्णालय येथील शिवभोजन थाळी केंद्र संचालकांनी जेवणाची पाकीटे बनवून वाडी येथे मोफत वितरीत केली.
सामाजिक बांधिलकी जपत आणि सोशल डिस्टन्सचे भान ठेवत केंद्र संचालकांनी पाकीटे वितरीत केल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. अन्नाच्या पाकिटांमध्ये पोळी, भाजी, भात, वरण व चटणीचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांनी दिली. संचारबंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गरिबांना निशुल्क भोजन देण्यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घेतल्याचे श्री. तायडे यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या वतीने २६ जानेवारी २०२० रोजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचे उद्घाटन करण्यात आले होते. शहरातील विविध ठिकाणी ७५० शिवभोजन थाळी नाममात्र १० रुपयात उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र गावाकडे पोहचू न शकलेल्या गरीब मजुरांना वाडी येथे जावून मोफत अन्नाची पाकीटे वितरीत केली. ही पाकीटे मेयो व डागा रुग्णालय परिसरातील शिव भोजन थाळी केंद्राच्या संचालकांनी दिली.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमांच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. शिव भोजन थाळीच्या संचालकांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात उपाशीपोटी कोणीही राहू नयेत, या भावनेतून मोफत अन्नाची पाकीटे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
अन्नाची मोफत पाकीटे वितरीत केल्यानंतर गरीब व मजूर कामगारांच्या चेह-यावर समाधानाचे भाव दिसून आले. तसेच शिवभोजन थाळी केंद्र संचालकांनी गरीब, मजूर व कामगारांना वाडी येथे जावून अन्नाची पाकीटे वितरीत केल्याचे समाधान मिळाले. यावेळी त्यांनी साहेब, कोरोना तर नंतर मारेल पण त्यापूर्वीच आम्ही भूकेने मेलो असतो, अशी प्रतिक्रिया श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्वंयरोजगार सेवा संस्थेचे संचालक यशवंत पांडे आणि सुविधा बहुउद्देशीय संस्थेच्या संचालक श्रीमती सुरेखाताई खोब्रागडे यांनी दिली.
गरीब व गरजूंना शिवभोजन थाळीचे मोफत वितरण
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3dCvFTa
via
No comments