Breaking News

१६ जानेवारीला होणाऱ्या लसीकरणाची तयारी पूर्ण

Nagpur Today : Nagpur News

१० केंद्रांवर ‘ड्राय रन’

महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली पाहणी

नागपूर : नागपूर शहरात १६ जानेवारी रोजी होणाऱ्या कोव्हिड लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. नागपुरात २२ हजार कोविशिल्ड लस पोहोचल्या आहेत. यामध्ये नोंदणी झालेल्या साडे बावीस हजार आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी १० हजार कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात लस देण्यात येणार आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांनी आज फुटाळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन लसीकणाच्या तयारीची पाहणी केली.

दरम्यान, १६ जानेवारी रोजी होणाऱ्या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. १४) दुपारी २ ते ३ या वेळात शहरातील १० केंद्रांवर लसीकरणाची ‘ड्राय रन’ पार पडली. यामध्ये प्रत्येक केंद्रावर १० आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी बोलविण्यात आले होते. केंद्र शासनाच्या दिशानिर्देशानुसार लसीकरण केंद्रामध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरणाचे जे-जे टप्पे आहेत, त्यानुसार निवड झालेल्या कर्मचाऱ्यांची ‘ड्राय रन’ घेण्यात आली.

नागपुरातील महाल रोगनिदान केंद्र, पारडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कल्पवृक्ष हॉस्पीटल, मेहंदीबाग नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जाफरी हॉस्पीटल, आयसोलेशन हॉस्पीटल, पाचपावली सुतिकागृह, इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि फुटाळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी ही ‘ड्राय रन’ पार पडली. यापैकी फुटाळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला महापौर दयाशंकर तिवारी यांनी भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महापौरांना संपूर्ण माहिती दिली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. २२ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांची ऑनलाईन नोंदणी लसीकरणासाठी झाली आहे. यापैकी १० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात कोविशिल्ड लस देण्यात येणार आहे. यासाठी २२ हजार कोविशिल्ड लस नागपुरात पोहचल्या असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अन्य कर्मचाऱ्यांनाही टप्प्याटप्प्याने लस देण्यात येणार आहे.

अशी पार पडली ‘ड्राय रन’
आरोग्य विभागातर्फे लसीकरणासाठी निवड करण्यात आलेल्या व्यक्तींना संदेश प्राप्त झाले होते. लसीकरण केंद्रात सर्वात पहिल्या बाकावर संबंधितांनी संदेश दाखवून लसीकरणासाठी बोलविण्यात आल्याचे निश्चित केले. या व्यक्तींचे शरीर तापमान तपासण्यात आले. हात सॅनिटाईज करण्यात आले. त्यांना टोकन नंबर देऊन केंद्रातील प्रतीक्षा कक्षात त्यांना पाठविण्यात आले. प्रतीक्षा कक्षात सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तींना बसविण्यात आले. टोकन क्रमांकानुसार संबंधित व्यक्तीला लसीकरण कक्षात पाठविण्यात येत होते. प्रारंभी त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे संबंधित व्यक्ती तोच असल्याची खातरजमा करण्यात आली. ओटीपीच्या आधारे त्यांना लसीकरणासाठी पात्र ठरविण्यात येत होते. यानंतर लसीकरण अधिकाऱ्याकडे त्यांना पाठविण्यात आले.

लसीकरण अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला लसीकरणाची माहिती दिली. लस कोणत्या कंपनीची आहे, लसीकरणानंतर काय नियम पाळायचे आहेत, पुढील लस घेण्याकरिता किती दिवसांनी यावे लागेल, लसीकरणानंतर अर्धा तास निगराणीखाली थांबायचे, त्यानंतर घरी गेल्यावर काही अडचण आल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांना अथवा १०८ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून माहिती देण्यास सांगितले. लसीकरणानंतर सिरींज कट करून ती संबंधित बीन मध्ये टाकण्यात आली. यानंतर लसीकरण झालेल्या व्यक्तीला निगराणी कक्षात अर्धा तासाकरिता बसविण्यात आले.

१६ जानेवारीला होणाऱ्या लसीकरणाची तयारी पूर्ण



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2XJ2qas
via

No comments