Breaking News

कोविड लसीकरणाची प्रशासनाकडून जय्यत तयारी- जिल्हाधिकारी संदिप कदम

Nagpur Today : Nagpur News

• लसीचे 9500 डोज प्राप्त
• तीन ठिकाणी होणार शुभारंभ
• 4750 लाभार्थ्यांना मिळणार लस
• 16 ला सकाळी उद्घाटन
• पहिल्या दिवशी 300 लाभार्थी

भंडारा :- बहुप्रतिक्षित कोविड लसीकरणाचा शुभारंभ 16 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील तीन केंद्रावर होणार असून लसीकरणासाठी जिल्हा व आरोग्य प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सिरम इन्स्टिट्यूट पुणे निर्मित कोविशिल्ड लसीचे 9500 आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहेत. कोविड लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सांगितले.

कोविड लसीकरण जिल्हा कृती दलाची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानाझडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, डॉ. माधुरी माथूरकर, डॉ. निखिल डोकरिमारे, डॉ. चव्हाण व कृती दलाचे सदस्य उपस्थित होते.

लसीकरण मोहिमेच्या नियोजनाची सविस्तर माहिती डॉ. माधुरी माथूरकर यांनी बैठकीत दिली. शनिवार 16 जानेवारीला जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय भंडारा, उपजिल्हा रुग्णालय तुमसर व ग्रामीण रुग्णालय लाखनी येथील लसीकरण केंद्रावर कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणाची सर्व तयारी आरोग्य विभागाने केली आहे. याठिकाणी प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरिक्षण कक्ष उभारण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर म्हणजे आरोग्य सेवा देणाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांची यादी यापूर्वीच कोविन अँपवर अपलोड करण्यात आली आहे.

सिरम इन्स्टिट्यूट पुणे द्वारा निर्मित कोविशिल्ड लसीचे 9500 डोज आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहेत. प्रत्येकी दोन याप्रमाणे 4750 लाभार्थ्यांना ही लस स्नायूमध्ये पॉईंट पाच एमएल द्यावयाची आहे. एक व्हायलमध्ये दहा लाभार्थी कव्हर होणार आहेत. याच लाभार्थ्यांना 28 दिवसानंतर दुसरा डोज घ्यावयाचा आहे. कोविशिल्ड लसीचे दोन डोज घेतल्यानंतर पुढच्या 14 दिवसानंतर लस घेणाऱ्याच्या शरिरात अँटिबॉडी तयार व्हायला सुरुवात होईल. कोरोनाची लस घेतल्यानंतरही मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे व सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे.

लस देण्यात येणाऱ्या लाभार्थ्याला याबाबत रजिस्टर मोबाईलवर नंबरवर मेसेज येणार आहे. लाभार्थी केंद्रावर आल्यानंतर त्यास प्रतीक्षा कक्षात बसविण्यात येईल याठिकाणी लाभार्थ्याचे समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यानंतर लाभार्थी लसीकरण कक्षात जाईल. लसीकरण कक्षात त्यांना चार संदेश समजावून सांगून लसीकरण केले जाईल. त्यानंतर लाभार्थ्यास अर्धा तास निरिक्षण कक्षात तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणात ठेवण्यात येणार आहे. या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी घरी जाणार आहे.

16 तारखेला शुभारंभाच्या दिवशी तीन केंद्रावर 300 लाभार्थ्यांना लस देण्यात येईल. त्यानंतर आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार, बुधवार व गुरुवारला नियमितपणे लसीकरण सुरू राहणार आहे. लसीकरण केंद्रावर लाभार्थ्यांना टोकण देण्यात येणार आहे. त्यावर लसीकरणाची वेळ व दिनांक तर दुसऱ्या बाजूला संपर्कासाठी हेल्पलाईन क्रमांक नमूद असणार आहेत. लसीकरण करून घरी आल्यावर काही त्रास झाल्यास नमूद क्रमांकावर संपर्क साधता येईल.

लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्हा कृती दलाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्गदर्शनात एक समन्वय समिती सुध्दा असणार आहे. त्यासोबतच कोविन अँपवर डेटा अपलोड करण्यासाठी एक चमू असणार आहे. टप्प्या टप्प्याने लसीकरण केंद्र वाढविण्यात येणार आहेत. त्याचेही नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. ही लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन श्री. कदम यांनी केले आहे.

कोविड लसीकरणाची प्रशासनाकडून जय्यत तयारी- जिल्हाधिकारी संदिप कदम



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3ibDXUN
via

No comments