शहरातील कोचिंग क्लासेस सुरू करण्यास मनपाची सशर्त परवानगी
कोचिंग असोसिएशनच्या पत्रावर महापौरांची आयुक्तांशी चर्चा : आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आदेश निर्गमित
नागपूर : मिशन बिगीन अगेन अंतर्गत नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था, टायपिंग, संगणक प्रशिक्षण संस्था आदी कोचिंग क्लासेस कोव्हिड संदर्भातील सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करून १८ जानेवारी २०२१पासून सुरू करण्याबाबत नागपूर महानगरपालिकेद्वारे परवानगी देण्यात आली आहे. यासंबंधी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी (ता.१८) आदेश निर्गमित केले आहेत.
शहरातील कोचिंग क्लासेस सुरू करण्यात यावेत या मागणीसंदर्भात ‘इन्स्टिट्यूट ऑफ कोचिंग असोसिएशन’द्वारे महापौर दयाशंकर तिवारी यांना निवेदन देण्यात आले होते. कोचिंग इन्स्टिट्यूटच्या ऑफलाईन शिकवणी विना विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचा प्रभाव त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमावरही पडतो. त्यामुळे यासंदर्भात आवश्यक सकारात्मक निर्णय घेण्याबाबत महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशी चर्चा केली. महापौरांशी झालेल्या सविस्तर चर्चेअंती आयुक्तांनी सोमवारी (ता.१८) आदेश निर्गमित केले.
मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार इयत्ता नववी पासून पुढील कोचिंग क्लासेस सॅनिटायजेशन व सोशल डिस्टंसिंगबाबतचे मार्गदर्शक सुचना व नियमांचे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. कोचिंग क्लोसेससह मनपा क्षेत्रातील विविध शासकीय प्रशिक्षण संस्था उदा. वनामती आदींना प्रशिक्षण सुरू करण्याकरिता सुद्धा परवानगी देण्यात आली आहे. याबाबत संबंधित प्रशासकीय विभागाने स्वतंत्रपणे मानक कार्यप्रणाली निर्गमित केल्यानुसार त्याचे अनुपालन करणे आवश्यक राहिल.
क्रीडा स्पर्धा, उपक्रमांच्या आयोजनाला सुद्धा परवानगी
राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षण घेतात अशा संस्थांना क्रीडा स्पर्धांचे आयोजन, बैठक व विविध क्रीडा उपक्रमांच्या आयोजनाबाबतही मनपा आयुक्तांद्वारे परवानगी प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विविध क्रीडा प्रशिक्षण संस्थांचा समावेश असून यासंदर्भात क्रीडा व युवक सेवा संचालनालयाद्वारे स्वतंत्रपणे मानक कार्यप्रणाली निर्गमित केल्यानुसार त्याचे अनुपालन करणे बंधनकारक राहिल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
सुचनांचे पालन करणे बंधनकारक
प्रशिक्षण संस्था तसेच कोचिंग क्लासेस सुरू करताना सदर संस्थांनी कोव्हिड-१९च्या प्रसारास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने शासनाद्वारे निर्गमित करण्यात आलेल्या सर्व सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहिल. प्रशिक्षणार्थी प्रवेश करताना थर्मल गनद्वारे नियमित तपासणी करावी. मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. सर्व संस्थांमधील प्रशिक्षक व व्यवस्थापन कर्मचारी यांची कोव्हिड-१९साठी आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी. सदर संस्थांनी प्रवेश दारावर तसेच प्रशिक्षण सभागृहामध्ये सॅनिटायजर मशीन उपलब्ध करून देणे बंधनकारक राहिल. दोन प्रशिक्षणार्थींमध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे बंधनकारक आहे. सभागृहाच्या एकूण आसन क्षमतेच्या ५०टक्के पेक्षा जास्त उपस्थितीला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. दोन बॅचमध्ये किमान अर्धा तासाचे अवकाश ठेवून प्रत्येकवेळी सभागृह तसेच संगणक साहित्यांचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहिल. मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्गांना लागू असलेल्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहिल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शहरातील कोचिंग क्लासेस सुरू करण्यास मनपाची सशर्त परवानगी
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3sKxK7l
via
No comments