Breaking News

एनयुएचएमचे प्रस्ताव तीन दिवसात तयार करा : महापौर दयाशंकर तिवारी

Nagpur Today : Nagpur News

आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी महापौरांची आढावा बैठक

नागपूर : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत (एनयुएचएम) नागपूर महानगर पालिकेद्वारे शहरात ७५ ‘हेल्थ पोस्ट’ तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी गुरूवारी (ता. १४) महापौर दयाशंकर तिवारी यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी महापौरांनी एनयुएचएमचे प्रस्ताव तीन दिवसात तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच शहरात ज्या भागात लोकसंख्येनुसार आरोग्य यंत्रणा अपुरी आहे किंवा मुळीच नाही अशा भागांचे सर्वेक्षण करून हेल्थ पोस्टसाठी लवकरात लवकर जागा निवडण्याचेही आदेश महापौरांनी दिले.

बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. संजय चिलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, टाटा ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. टिकेश बिसेन, डॉ. विंकी रूगवाणी, डॉ. चरडे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी याआधी शहराच्या आऊटर भागात ७५ हेल्थ पोस्ट तयार करण्याची घोषणा केली होती. आता या कार्याला गती मिळाली असून महापौरांनी यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. शहराच्या आऊटर भागातील सर्व नगरसेवकांचे जागेसंदर्भात मत जाणून घेण्यासाठी आणि यावर चर्चा करण्यासाठी सोमवार १८ जानेवारी रोजी स्वत: बैठक घेणार असल्याचेही महापौरांनी यावेळी सांगितले.

हेल्थ पोस्टच्या निर्मितीमुळे गरिब तसेच सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी व उपचारासाठी लागणारा खर्च कमी होण्यास मदत होईल. तसेच वेगाने वाढणा-या शहरी लोकसंख्येच्या आरोग्याविषयक आव्हानांना सामोर जाण्यासाठी या हेल्थपोस्टची मोठी मदत होणार आहे असे महापौर यावेळी म्हणाले. जुन्या रचनेतील वॉर्डाच्या धर्तीवर ही यंत्रणा उभारण्याची सूचनाही बैठकीत महापौरांनी केली.

शहरात रुग्णवाहिका जननी सुरक्षा सेवा सर्व तळागाळातील नागरिकांना मिळावी यासाठी लहान मारूती वॅनचा उपयोग करण्याची सूचना महापौरांनी संबंधित अधिका-यांना दिली. या वॅनमुळे वस्तीत राहणा-या नागरिकांना सुध्दा फायदा होईल व रुग्णवाहिका थेट वस्तीत रूग्णाच्या दारासमोर नेऊन रूग्णाला तात्काळ रूग्णालयात पोहचविण्यास मदत होईल, असे महापौर म्हणाले.

एनयुएचएमचे प्रस्ताव तीन दिवसात तयार करा : महापौर दयाशंकर तिवारी



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/38M0GDM
via

No comments