सर्वसमावेशक बाबासाहेब-डॉ.घपेश धवळे
नागपूर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ऊत्तंग विचाराचे धनी त्यांचे प्रत्येक विचार म्हणजे एक धगधगती क्रांती- मशाल , पण जेव्हा आपण त्यांच्या आपन सर्वांगीक विचारावर चर्चा करतो, तेव्हा आपल्याला दिसते स्वराज्य, राष्ट्रवाद, मूलभूत हक्क, अल्पसंख्यांकांचे हितरक्षण,शिक्षण,अर्थव्यवस्था, समाजवाद ,साम्यवाद ,बौद्ध धर्म आणी देशांच्या विकासासाठी असलेली सर्वसमावेषक भुमीका.
डॉ. आंबेडकरांनी भारतातील विविध राजकीय प्रश्नांसंबंधी आणि राजकीय तत्वा संबंधीचे मते, आपल्या अनेक लेखातून पुस्तकातून आणि भाषणातून मांडलेली आहेत .हेच बाबासाहेबांचे राजकीय विचार आहेत .काही राजकीय विचार हे त्यांनी घटना परिषदेच्या अधिवेशनात केलेल्या भाषणातून व्यक्त झालेले आहे . डॉ.आंबेडकरांच्या विचारांचा तत्कालीन राजकारण तसेच स्वातंत्र्याचा राजकारणात प्रभाव पडला आहे.
ब्रिटिश काळात सर्वच भारतीय राजकीय नेते आणि विचारवंत प्रमाणे डॉ. आंबेडकरांनी सुद्धा स्वराज्य संबंधी चे विचार मांडले आहेत .परंतु ते विचार इतरांपेक्षा वेगळे आहेत डॉ आंबेडकरांनी समाजवादाचा पुरस्कार केला होता .परंतु त्यांना रशिया, चीन व इतर साम्यवादी देशातील एक पक्ष पद्धतीचा साम्यवाद मान्य नव्हता. देशातील समाजवादी व्यवस्था राजकीय तसेच धार्मिक क्षेत्रात लोकशाहीचा स्वीकार करून आणि उद्योगधंद्यावर सरकारची मालकी प्रस्थापित करून समाजवादी व्यवस्था प्रस्थापित होऊ शकते .असे त्यांना वाटे डॉ. बाबासाहेबांनी लोकशाही समाजवादाचा सुद्धा पुरस्कार केला होता.
त्यामुळे त्यांना मार्क्सवाद किंवा समाजवाद विचार अपूर्ण आणि सदोष वाटत होता. डॉ. आंबेडकरांनी साम्यवाद पद्धतीवर जोरदार टीका केली होती. साम्यवाद केवळ आर्थिक भौतिक जीवनाचा महत्त्व दिले जाते, साम्यवाद धर्मविरोधी आहे ,साम्यवाद स्वातंत्र विरोधी आहेत ,साम्यवादी राष्ट्रांनी सुद्धा समाजवादी धोरण स्वीकारून अनेक लहान लहान राष्ट्रांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवले आहे.
अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करणे हा डॉ. आंबेडकरांच्या जीवनाचा व कार्याचा केंद्रबिंदू होता. भारतीय समाज जीवनात अल्पसंख्यांक लोकांवर होणारे अन्याय, लक्षात घेऊन डॉ. आंबेडकरांनी सुरुवातीपासूनच अल्पसंख्यांकाच्या हिताचे रक्षण झाले पाहिजे असा विचार मांडला व त्यासाठी सतत प्रयत्न केले.
1931 32 मध्ये झालेल्या गोलमेज परिषदेतही डॉ बाबासाहेबांनी अल्पसंख्यांकाच्या आरक्षणाची भूमिका घेतली होती .आणि मुसलमानां प्रमाणे अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ असावेत अशी मागणी केली होती .भारताची राज्यघटना तयार करणाऱ्या राज्यघटना समितीत आणि राज्यघटना मसुदा समितीत सुद्धा स्पृश्य हिंदूचे बहुमत होते .हे लक्षात घेऊन त्यांनी अल्पसंख्यांकाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मागण्या केल्या होत्या.
अस्पृश्यांना अल्पसंख्यांक म्हणून घोषित करावे, अस्पृश्यांच्या रक्षणासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापित करावी, अस्पृश्यांना घटनात्मक तरतूद करून काही सवलती द्याव्यात आणि अशी घटनात्मक तरतूद केवळ बहुमताने बदलता येणार नाही अशी व्यवस्था करावी.
अस्पृश्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने भारतीय राज्यघटनेतील कलम 323 ते 342 यात अस्पृश्यांसाठी आणि मागासलेल्या जाती जमातीसाठी हा सवलती मान्य केल्या .त्यांना देशात विकासवादी, समता पूरक आणि सर्वसमावेशक लोकशाही हवी होती. म्हणून त्यांनी संविधानात किंवा आपल्या लेखनात लोकशाही वर भर दिल्याचे दिसते.त्यांची लोकशाही लोकांच्या आणि देशाच्या विकासाला बाधा आणणारी नव्हती, तर विकासाला एका उत्तुंग शिखर गाठणारीहोती बाबासाहेब आंबेडकरांनी चीनबाबत धोक्याचा इशारा दिलेला आहे.
अमेरिका, आग्नेय आशियाई राष्ट्रे यांबरोबरच चीनसंदर्भातही डॉ. आंबेडकरांचे धोरण अतिशय स्पष्ट होते. चीन हे अतिशय धूर्त राष्ट्र आहे आणि अशा राष्ट्राबाबत भारताने गाफील राहून चालणार नाही. तसेच आदर्शवादी दृष्टीकोनातून चीनशी मैत्री करण्याचे प्रयत्न भारताने करू नये, असे बाबासाहेबांचे म्हणणे होते
इ.स. १९५४ मध्ये भारताने चीनसंदर्भात तयार केलेले पंचशील धोरण संसदेमध्ये चर्चेसाठी आले होते. त्यावेळी बाबासाहेबांनी फार उत्तम प्रकारे त्यावर टीका केली होती. ते असे म्हणतात, “पंचशील धोरण हे बौद्ध धर्माचा अविभाज्य घटक आहे. पण या धोरणाचा चीनकडून अवलंब होताना दिसत नाही. चीन जर तिबेटी लोकांवर अन्याय करत असेल तर त्यांना अशा प्रकारचे पंचशील धोरण करण्याचा काय अधिकार आहे असा सवाल त्यांनी केला.” त्यावेळी भारत चीनला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेचा कायम सदस्यत्व मिळावे म्हणून पाठिंबा देत होता याही गोष्टीला डॉ .आंबेडकर यांचा विरोध होता .
बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेम्ब्लीचे सदस्य असताना (१९२६) ग्रामीण भागातील गरिबांच्या समस्यांविषयीचे त्यांचे समग्र आकलन त्यांनी उभारलेल्या जनआंदोलनांमध्ये प्रतिबिंबित होते. शेतीमधील खोती पद्धतीविरुद्ध त्यांनी केलेल्या यशस्वी आंदोलनामुळे अनेक ग्रामीण गरिबांची आर्थिक शोषणातून मुक्तता झाली. महार वतन या नावाखाली सुरू असलेल्या शुद्ध गुलामगिरीविरुद्ध त्यांनी आवाज उठविल्यानंतर ग्रामीण भागातील गरिबांचा मोठा वर्ग शोषणमुक्त झाला. सावकारांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी त्यांनी असेम्ब्लीमध्ये विधेयक आणले.
औद्योगिक कामगारांच्या क्षेत्रात डॉ. आंबेडकरांनी इ.स.१९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. त्याकाळी कामगारांचा आवाज बुलंद करणार्या अन्य संघटना होत्याच; मात्र त्यांना अस्पृश्य कामगारांच्या मानवाधिकारांशी काहीही देणे-घेणे नव्हते. नव्या राजकीय पक्षाने ही उणीव भरून काढली. त्याचप्रमाणे व्हॉइसरॉयज् एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे कामगार सदस्य या नात्याने १९४२ ते १९४६ या काळात डॉ. आंबेडकर यांनी कामगारविषयक धोरणात आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या.
त्यात सेवायोजन कार्यालयाची स्थापना ही महत्त्वपूर्ण घटना होती आणि स्वतंत्र भारतातील औद्योगिक संबंधांची तीच पायाभरणी ठरली. बाबासाहेबांनी पाटबंधारे, ऊर्जा आणि इतर सार्वजनिक बांधकामे ही खातीही सांभाळली. देशाचे पाटबंधारे धोरण निश्चित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दामोदर व्हॅली प्रकल्पाचा यात प्राधान्याने समावेश करावा लागल.
बाबासाहेब आंबेडकर यांचा समाजसुधारणाविषयक दृष्टिकोण एकोणिसाव्या शतकातील नेमस्त सुधारकांपेक्षा गुणात्मकदुष्ट्या भिन्न होता. नेमस्त सुधारकांनी सुचविलेल्या सुधारणा विधवा विवाह, केशवपन, विवाहाची वयोमर्यादा इत्यादी कौटुंबिक सुधारणासंबंधी होत्या. त्यामुळे त्या सुधारणांमधून मूलभूत अशा सामाजिक सुधारणा झालेल्या नाहीत. मूलभूत प्रश्न सुटलेला नाही असे मत डॉ. आंबेडकरांनी या संदर्भात व्यक्त केले आहे. इतर लहान लहान सामाजिक सुधारणा होण्यासाठी मुळात सामाजिक विषमतेचा प्रश्न सुटला पाहिजे असे त्यांना वाटप होते.
नेमस्त सुधारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचात आणखी एक मुख्यतः फरक म्हणजे नेमस्त सुधारकांनी सुधारणांसाठी प्राचीन धर्मग्रंथांचा आधार घेतला आहे. यावर मात्र डॉक्टर आंबेडकरांना विश्वास नव्हता. अस्पृश्यता मान्य करणाऱ्या ग्रंथाची त्यांनी होळी केली होती. त्या काळातील नेमस्त सुधारक आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या समाज सुधारणा दृष्टिकोणाबाबतचा आणखी एक फरक म्हणजे नेमस्तक सुधारकांचा हृदय परिवर्तनावर विश्वास होता. मात्र हृदय परिवर्तनावर मर्यादा असतात असे मत डॉ. आंबेडकरांचे होते.
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत.
प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाली की, तो किंवा ती पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावी. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे होते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होते. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाजहितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्यांनी ध्यानी घ्यावे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत.
जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेसारख्या सामाजिक आजारांचे आर्थिक पैलू उलगडून दाखविणे, हे डॉ. आंबेडकरांचे आणखी एक विद्वत्तापूर्ण कार्य होय. ‘जातींचे विध्वंसन’ या आपल्या ग्रंथात त्यावर जातीव्यवस्थेवर कडाडून टीका केली होती. जाती व्यवस्थेमुळे केवळ श्रमाची विभागणी केली गेली नसून, श्रमिकांचीच विभागणी केली गेली आहे, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. डॉ. आंबेडकरांचा जाती व्यवस्थेवरील हल्ला हे केवळ उच्चवर्णीयांच्या वर्चस्ववादाला दिलेले आव्हान नव्हते, तर आर्थिक विकासाशी त्यांच्या मांडणीचा जवळचा संबंध होता. जाती व्यवस्थेमुळे श्रमाची आणि भांडवलाची गतिशीलता कमी झाली असून, त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि विकासावर प्रतिकूल परिणाम झाला आहे, असे त्यांचे प्रतिपादन होते.
बाबासाहेबांनी ‘स्टेट ॲन्ड मायनॉरिटीज’ नावाने ब्रिटिश सरकारला इ.स.१९४७ साली सादर केलेल्या टिपणामध्ये भारताच्या आर्थिक विकासाची योग्य धोरणे कोणती, हे सांगितले होते. अत्युच्च उत्पादन क्षमतेचा विचार करून लोकांच्या आर्थिक जीवनाचे नियोजन करणे तसेच खासगी उत्पादकांना कोणतीही आडकाठी न करता आणि संपत्तीचे समान वाटप होईल अशारीतीने आर्थिक नियोजन करणे हे सरकारचे दायित्व आहे, असे त्यांनी नमूद केले होते.
स्वातंत्र्यानंतर डॉ. आंबेडकर भारताचे पहिले कायदामंत्री बनले. इ.स. १९४८-४९ मध्ये घटना समितीचे अध्यक्ष म्हणून भारतीय राज्यघटनेला आकार देतानाही त्यांच्यातील अर्थतज्ज्ञ आपल्याला दिसून येतो. मानवी अधिकारांचे मूलतत्त्व म्हणून त्यांनी लोकशाही राज्यव्यवस्थेचा ताकदीने पुरस्कार आणि पाठपुरावा केला. समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या तीन लोकशाही तत्त्वांचा केवळ राजकीय हक्क असा संकुचित अर्थ लावला जाऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.
सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचे ते खंदे पुरस्कर्ते होते आणि सामाजिक-आर्थिक लोकशाहीकडे दुर्लक्षून राजकीय लोकशाही टिकू शकणार नाही, असा इशाराही द्यायला ते विसरले नाहीत. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ दि स्टेट पॉलिसी हा अनुच्छेद घटनेत समाविष्ट करून त्यांनी आर्थिक लोकशाहीचा हेतू विषद केला.
कायदामंत्री या नात्याने डॉ. आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल संमत करण्यासाठी मोठा संघर्ष केला. महिलांचे अधिकार, विशेषतः विवाह आणि पितृसंपत्तीविषयक अधिकार सुरक्षित करणारी ही मोठी सामाजिक सुधारणा होती. हे विधेयक संसदेत संमत होऊ शकले नाही, म्हणून सप्टेंबर इ.स.१९५१ मध्ये त्यांनी राजीनामा दिला. डॉ. आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व अनेक पैलूंनी युक्त असले तरी त्यात एक समान धागा होता आणि तो आर्थिक हित पाहणारा होता.
‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या त्यांनी दिलेल्या मंत्रातूनच त्यांचे आर्थिक विचार सुस्पष्टपणे दिसून येतात.
आंबेडकरांचे विचार सामाजिक, धार्मिक आणि नैतिक तत्त्वांवर आधारलेले आहेत. शोषक आणि शोषित हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू आहे. दबलेल्यांना उभारी देणे आणि शोषितांची जोखडातून मुक्तता करणे हाच त्यांच्या विचारांचा मूलाधार आहे. सर्वांना स्वातंत्र्य, समता आणि न्याय मिळावा, हाच त्यांच्या वैचारिक मांडणीचा प्रमुख हेतू आहे. याच हेतूसाठी लाखो अनुयायांसह त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला.
डॉ.घपेश पुंडलिकराव धवळे
नागपुर
M. 8600044560
ghapesh84@gmail.com
सर्वसमावेशक बाबासाहेब-डॉ.घपेश धवळे
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2InytZK
via
No comments