रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण रोखून रब्बीमध्ये सुरळीत वीजपुरवठा करा
ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांचे महावितरणला निर्देश
मुंबई – सध्या रब्बी हंगाम महत्वाच्या टप्प्यात असून येत्या तीन महिन्यांत सिंचनासाठी सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण विविध उपाययोजना करून रोखण्यात यावे तसेच रोहित्र, ऑईल आणि इतर साहित्य पुरेशा प्रमाणात अतिरिक्त स्वरुपात ठेवण्यात यावे व त्याचा आवश्यकतेनुसार पुरवठा करण्यात यावा असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी शुक्रवारी दिले.
फोर्ट येथील महावितरणच्या कार्यालयात ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी प्रामुख्याने रब्बी हंगामातील वीजपुरवठ्याबाबत आढावा घेत महावितरणच्या राज्यभरातील अधिकाऱ्यांना विविध निर्देश दिले. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री. असीमकुमार गुप्ता उपस्थित होते.
ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी सांगितले की, रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते किती दिवसांत बदलणार किंवा दुरुस्त करणार, शेतकऱ्यांनी कुठे तक्रार करावी, त्यासंदर्भातील मोबाईल क्रमांक आदींची माहिती स्थानिक पातळीवर देण्यात यावी. नादुरुस्त झालेले रोहित्र युद्धपातळीवर बदलण्याचे किंवा दुरुस्त करण्यात यावे. आवश्यक त्या ठिकाणी रोहित्रांची क्षमता वाढविण्यात यावी. अतिरिक्त स्वरुपात रोहित्र तसेच ऑईल व इतर साहित्याची कोणतीही कमतरता नाही. मात्र तरीही वीजपुरवठ्यात व्यत्यय येत असल्यास निष्काळजीपणा करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांविरुद् कारवाई करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
मागील सरकारच्या कालावधीत कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या देणे बंद करण्यात आल्याने कृषिपंपांसाठी अनधिकृत वीजवापर वाढला आहे. त्यामुळे रोहित्र अतिभारित होऊन नादुरुस्त होण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. महाविकास आघाडी शासनाने नुकतेच नवीन कृषिपंप धोरण जाहीर केले असून त्याप्रमाणे लघुदाब, उच्चदाब वाहिन्यांसह सौरद्वारे कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या देण्यात येणार आहे. या धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले.
रोहित्र नादुरुस्त होण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी येत्या 31 डिसेंबरपर्यंत तातडीने सर्वेक्षण पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्यात यावा. प्रादेशिक कार्यालयस्तरावर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करून दैनंदिन रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण, दुरस्ती किंवा बदलण्यात आलेले रोहित्र, ऑईलचा पुरवठा आदींची संकलीत माहिती दर आठवड्यात ऊर्जामंत्रालय, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव व महावितरणच्या मुख्यालयात पाठविण्यात यावी, असे आदेश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले.
राज्यात शेतकऱ्यांना मागणीनुसार कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करण्यात यावी. नक्षलग्रस्त भागातील नवीन वीजजोडण्यांसाठी निधीची मागणी करण्यात यावी. तसेच वनविभागाच्या जमिनीतून वीजयंत्रणा उभारण्याच्या परवानगीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात यावा आणि कमी दाबाने वीजपुरवठा होत असलेल्या भागात नवीन उपकेंद्र प्रस्तावीत करण्यासोबतच वीजवाहिन्यांचे अंतर कमी करून योग्य दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले. या बैठकीला महावितरणचे संचालक (संचालन) श्री. सतीश चव्हाणे, कार्यकारी संचालक (वितरण) श्री. अरविंद भादीकर आदींची उपस्थिती होती. तर व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे सहव्यस्थापकीय संचालक, प्रादेशिक संचालक तसेच मुख्य अभियंता आदी वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित होते.
रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण रोखून रब्बीमध्ये सुरळीत वीजपुरवठा करा
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2JNf4Sb
via
No comments