Breaking News

महापौर व उमहापौर पदासाठी प्रत्येकी चार उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र सादर

Nagpur Today : Nagpur News

– ५ जानेवारीला निवडणूक : आठ उमेदावरांचे १६ नामनिर्देशन पत्र

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या उर्वरित कालावधीसाठी ५ जानेवारी २०२१ला निवडणूक होणार आहे. यासाठी बुधवारी (ता.३०) नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी वेळ देण्यात आला होता. निर्धारित वेळेमध्ये महापौर पदासाठी ४ तर उपहापौर पदासाठी ४ असे एकूण ८ उमेदवारांनी नामनिर्देशपत्र निगम सचिव डॉ.रंजना लाडे यांच्याकडे सादर केले. विशेष म्हणजे, आठ उमेदवारांद्वारे एकूण १६ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.

२१ डिसेंबर रोजी संदीप जोशी यांनी महापौर पदाचा व मनीषा कोठे यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता नवीन महापौर निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झालेली आहे. बुधवारी (ता.३०) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीमध्ये नामनिर्देशपत्र स्वीकारण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी, महाविकास आघाडी, बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेस या पक्षांच्या उमेदवारांनी महापौर आणि उपमहापौर पदासाठी नामनिर्देशनपत्र सादर केले.

भारतीय जनता पार्टीकडून महापौर पदासाठी प्रभाग १९ ‘ड’ चे नगरसेवक दयाशंकर चंद्रशेखर तिवारी यांनी नामनिर्देशन सादर केले. प्रभाग १५ ‘अ’ चे नगरसेवक सुनील हिरणवार हे सूचक तर प्रभाग ३१ ‘ड’ चे नगरसेवक रवींद्र भोयर हे अनुमोदक होते. उपमहापौर पदासाठी पक्षाकडून प्रभाग २३ ‘ब’ च्या नगरसेविका मनीषा आशिष धावडे यांनी नामनिर्देशन सादर केले. प्रभाग १५‘क’ च्या नगरसेविका रूपा राय या सूचक होत्या तर प्रभाग १३‘ब’ च्या नगरसेविका रूतिका मसराम अनुमोदक होत्या.

महाविकास आघाडीकडून प्रभाग ३३ ‘ड’ चे नगरसेवक मनोजकुमार धोंडूजी गावंडे यांनी महापौर पदासाठी नामनिर्देशन सादर केले. प्रभाग २७‘अ’चे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते तानाजी वनवे हे सूचक होते तर प्रभाग ३८‘ब’चे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे हे अनुमोदक होते. उपमहापौर पदाकरिता आघाडीकडून प्रभाग २८ ‘ब’च्या नगरसेविका मंगलाबाई प्रशांत गवरे यांनी नामनिर्देशन सादर केले. प्रभाग ३३ ‘ड’चे नगरसेवक मनोजकुमार गावंडे हे त्यांचे सूचक तर प्रभाग ८‘ड’चे नगरसेवक भुट्टो जुल्फेकार अहमद अनुमोदक होते.

बहुजन समाज पक्षाकडून प्रभाग ‘ड’ चे नगरसेवक नरेंद्र नत्थुजी वालदे यांनी महापौर पदाकरिता नामनिर्देशन सादर केले. प्रभाग ६‘अ’चे नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार हे त्यांचे सूचक तर प्रभाग ६ ‘ड’चे नगरसेवक मो.इब्राहिम तौफीक अहमद हे अनुमोदक होते. उमहापौर पदाकरिता पक्षाकडून प्रभाग ६ ‘क’च्या नगरसेविका वैशाली अविनाश नारनवरे यांनी नामनिर्देशन सादर केले. प्रभाग ६ ‘ब’च्या नगरसेविका वंदना चांदेकर ह्या त्यांच्या सूचक व प्रभाग ७ ‘क’ च्या नगरसेविका मंगला लांजेवार अनुमोदक होत्या.

काँग्रेस पक्षाकडून प्रभाग २०‘क’ चे नगरसेवक रमेश गणपती पुणेकर यांनी महापौर पदासाठी नामनिर्देशन सादर केले. प्रभाग २१ ‘ब’चे नगरसेवक नितीन साठवणे हे सूचक तर प्रभाग १२ ‘अ’च्या नगरसेविका दर्शनी धवड या अनुमोदक होत्या. पक्षाकडून प्रभाग १० ‘ब’च्या नगरसेविका रश्मी निलमनी धुर्वे यांनी उपहापौर पदासाठी नामनिर्देशन सादर केले. प्रभाग १०‘क’चे नगरसेवक नितीश ग्वालबंशी हे सूचक तरप्रभाग १०‘अ’च्या नगरसेविका साक्षी राउत या अनुमोदक होत्या.

दयाशंकर तिवारी आणि मनीषा धावडे यांचे प्रत्येकी ४ तर रमेश पुणेकर व रश्मी धुर्वे यांचे प्रत्येकी २ नामनिर्देशन
भारतीय जनता पक्षाकडून महापौर पदासाठी दयाशंकर तिवारी व उपमहापौर पदासाठी मनीषा धावडे यांनी प्रत्येकी ४ असे एकूण ८ नामनिर्देशनपत्र सादर केले. दयाशंकर तिवारी यांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या नामनिर्देशनाचे सूचक संजय बंगाले व अनुमोदक नरेंद्र (बाल्या) बोरकर होते. तिसऱ्या क्रमांकाच्या नामनिर्देशनाचे संदीप जाधव हे सूचक तर वर्षा ठाकरे ह्या अनुमोदक होत्या. चवथ्या नामनिर्देशनाचे प्रवीण दटके सूचक तर मनीषा कोठे अनुमोदक होत्या. भाजपाच्या उपमहापौर पदाच्या उमेदवार मनीषा धावडे यांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या नामनिर्देशनाचे सूचक प्रदीप पोहाणे व श्रद्धा पाठक अनुमोदक होत्या. तिसऱ्या नामनिर्देशनाच्या माया इवनाते सूचक व शकुंतला पारवे अनुमोदक होत्या. चवथ्या नामनिर्देशनाचे सूचक वीरेंद्र कुकरेजा तर अनुमोदक दिव्या धुरडे होत्या.

काँग्रेस पक्षातर्फे रमेश पुणेकर यांनीही महापौर पदाकरिता दोन नामनिर्देशन सादर केले. त्यांच्या दुसऱ्या नामनिर्देशनाचे संदीप सहारे हे सूचक होते तर हरीश ग्वालबंशी हे अनुमोदक होते. पक्षाच्याच रश्मी धुर्वे यांनीही उपमहापौर पदासाठी दोन नामनिर्देशन सादर केले. संजय महाकाळकार हे त्यांचे सूचक तर स्नेहा निकोसे ह्या अनुमोदक होत्या.

महापौर व उमहापौर पदासाठी प्रत्येकी चार उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र सादर



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2MnG8sD
via

No comments