कर्मचाऱ्यांची वाणवा, बिलांची अडचण
उपसमितीने मांडलेल्या अहवालातील तथ्य : सीसीसी, चाचणी केंद्रातील व्यवस्था उत्तम
नागपूर, : कोव्हिड-१९ चा सामना करण्यासाठी, रुग्णांना लवकर उपचार मिळावे, यासाठी खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली. मात्र, अनेक रुग्णालयात कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. बिलांच्या बाबतीत अनेक तक्रारी आहे. मनपाने तयार केलेले कोव्हिड केअर सेंटर आणि कोव्हिड चाचणी केंद्रात मात्र उत्तम कार्य सुरू असल्याचा अहवाल यासाठी तयार करण्यात आलेल्या उपसमितीने दिला.
कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर नागपुरात असलेल्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी पदाधिकारी-प्रशासनाच्या चार समित्या तयार करण्यात आल्या होत्या. या समितीने संबंधित विषयाचा अभ्यास करून, दौरा करून एक अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार सोमवारी (ता. ३१) या सर्व समितींचा महापौरांनी आढावा घेतला.
सदर आढावा बैठकीला महापौर संदीप जोशी यांच्यासह आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त राधाकृष्णन बी., सत्तापक्ष उपनेते वर्षा ठाकरे, नरेंद्र बोरकर, प्रतोद दिव्या धुरडे, शिवसेना गटनेते किशोर कुमेरिया, राकाँचे गटनेते दुनेश्वर पेठे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाने उपस्थित होते.
कोव्हिड हॉस्पीटल, कोव्हिड केअर सेंटर, कोव्हिड चाचणी केंद्र आणि मेडिकल, मेयो, एम्स येथील व्यवस्थेची पाहणी त्यासाठी तयार करण्यात आलेल्या उपसमितीने केली. खासगी कोव्हिड हॉस्पीटलसाठी तयार करण्यात आलेल्या समितीचे प्रमुख उपमहापौर मनीषा कोठे यांनी अहवालातील तथ्य मांडताना सांगितले की, काही हॉस्पीटलमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. अनामत रक्कम अधिक घेण्यात येत आहे. एका रुग्णालयात केवळ औषधींचे बिल २,३६,००० आणि उपचाराचे बिल १,९६,००० देण्यात आले. त्यामुळे खासगी रुग्णालयांवर मनपाचा वचक असणे आवश्यक असल्याची सूचना अहवालातून मांडली.
कोव्हिड केअर सेंटरचा अहवाल उपसमितीचे प्रमुख तथा स्थायी समिती सदस्य विजय झलके यांनी मांडला. या उपसमितीने आमदार निवास, पाचपावली आणि व्हीएनआयटी कोव्हिड केअर सेंटरला भेट दिली. तीनही ठिकाणी व्यवस्था उत्तम असल्याचे सांगितले. केवळ आमदार निवासात मनपाचा कुणीही समन्वयक नसल्याने तेथे समन्वयक नेमण्याची सूचना समितीने केली.
शासकीय रुग्णालयातील व्यवस्थेचा अहवाल उपसमितीचे सदस्य ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल यांनी मांडला. बेड उपलब्ध असतानाही अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे केवळ ५० टक्के बेडचा उपयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले. मृत्यू झाल्यानंतर शववाहिका वेळेवर पोहचत नाही. एम्समध्ये मनपातर्फे गाद्या व इतर साहित्य पाठविल्यास बेड्सची संख्या वाढू शकते. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात संपर्कासाठी फोन क्रमांक आवश्यक असल्याची सूचना त्यांनी केली.
कोव्हिड चाचणी केंद्राचा अहवाल उपसमितीच्या प्रमुख सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे यांनी मांडला. ३४ पैकी ३० चाचणी केंद्राला उपसमितीने भेट दिली असून सर्व केंद्रांवर व्यवस्था उत्तम आहे. इंदोरा केंद्रावर सर्व महिला अधिकारी-कर्मचारी असल्यामुळे गर्दीला आवर घालण्यासाठी पुरुष कर्मचारी नेमण्याची सूचना त्यांनी मांडली.
आमदार प्रवीण दटके यांनी यावेळी गंगाबाई घाट येथील वास्तव मांडले. तेथे कोव्हिड रुग्ण दहन करण्याची संख्या अधिक झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अन्य मृत व्यक्तीचे दहन करताना बऱ्याच अडचणी येत आहे. मोक्ष काष्ठची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. मानेवाडा डिझेल शववाहिनी तातडीने सुरू केल्यास मृत कोव्हिड बाधित व्यक्तीचे दहन तेथे करता येईल, अशी सूचना त्यांनी मांडली.
उपसमितीने केलेल्या सर्व सूचना महापौर संदीप जोशी यांनी स्वीकारल्या असून त्यावर तातडीने अंमल करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
कर्मचाऱ्यांची वाणवा, बिलांची अडचण
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2EA9fWb
via
No comments