एनआयएमएच वाचविण्यासाठी डॉ साळवे यांची आरोग्य मंत्री यांचेशी चर्चा
तात्काळ दखल घेत केंद्रीय आरोग्यमंत्री यांचेशी चर्चा
नागपूर:-खाण कामगारांच्या आरोग्यासंदर्भात संशोधन व सेवा पुरविण्यासाठी नागपूर येथील राष्ट्रीय खणीकर्म आरोग्य संस्थेच्या (एनआयएमएच) स्वतंत्र शाखेसह आयसीएमआर अंतर्गत एनआयओएचचे प्रादेशिक कार्यालय संस्थेच्या मुळ उद्देशांसह नागपूर येथेच ठेवण्याच्या डॉ ऍड अंजली साळवे यांच्या आग्रही मागणीची दखल घेत राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री ना. राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी चर्चा केली असून यासंदर्भात ना. टोपे यांनी ना. डॉ. हर्षवर्धन यांना पत्र लिहून या संस्थेचे नागपूर येथील महत्व विषद करत प्रादेशिक कार्यालय नागपुरातच असावे याबाबत दूरध्वनी मार्फत चर्चा केली आहे .
नागपूर येथील राष्ट्रीय खनिक आरोग्य संस्थेचे भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर) अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय व्यावसायिक आरोग्य संस्था (एनआयओएच) गुजरातमध्ये विलीणीकरण करून केंद्र शासनाने ही संस्था महाराष्ट्रातून गुजरात मध्ये पळविली आहे. देशातील बहुतांश खाणी या महाराष्ट्रासह मध्य भारतात असल्याने तसेच या संस्थेची सुसज्ज प्रयोगशाळा नागपूर येथेच असल्याने राष्ट्रीय खणीकर्म आरोग्य संस्थेच्या (एनआयएमएच) स्वतंत्र शाखेसह आयसीएमआर अंतर्गत एनआयओएचचे प्रादेशिक कार्यालय संस्थेच्या मुळ उद्देशांसह नागपूर येथेच ठेवण्याबाबत सामाजिक कार्यकर्त्या व मानवाधिकार अभ्यासक डॉ. ऍड. अंजली साळवे यांनी नुकतीच ना. राजेश टोपे यांची भेट घेत या संस्थेच्या विलीनीकरण आणि स्थलांतरणाबाबत माहीती दिली होती.
आयसीएमआर अंतर्गत एनआयओएचचे पुर्व भारतासाठी कोलकत्ता येथे तर दक्षिण भारतासाठी बंगलेरु येथे प्रादेशिक कार्यालय आहे, त्याच धर्तीवर सर्वाधिक खाणी असलेल्या मध्य भारतासाठी नागपूर येथे प्रादेशिक कार्यालय सुरु ठेवण्याची डॉ. साळवे यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत ना. राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी दुरध्वनीवर चर्चा केली. सोबतच केंद्रीयमंत्री ना, नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनीही याबाबत पुढाकार घेत या संस्थेचे नागपूर येथे प्रादेशिक कार्यालय व्हावे याकरिता एकोप्याने प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. सुसज्ज प्रयोगशाळेसह खाण कामगारांच्या तसेच खाणीलगत राहणा-या रहिवास्यांचे आरोग्य, जमीनीचे कंपन, ध्वनी, वायु व जल प्रदूषण, धूळ इत्यादी पासून होणारे रोग व ते होऊ नयेत यासाठी संशोधनासोबतच तांत्रिक सेवा देणारी संपुर्ण भारतातील ही एकमेव संस्था होती. विदर्भ आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने प्रादेशिक कार्यालय नागपूर येथेच रहावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे अश्वासनही ना. टोपे यांनी डॉ. साळवे यांना दिले आहे.
मागिल वर्षभरापासून डॉ. ऍड. अंजली साळवे यांनी ही संस्था नागपुर येथेच राहावी यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले. खासदार बाळू धानोरकर यांच्या मार्फ़त हा प्रश्न संसदेतही मांडला. परंतु कोरोनाच्या संकटात भव्य प्रयोगशाळा व कर्मचाऱ्यांचे तात्काळ बदली आदेश केंद्राने दिल्याने डॉ साळवे यांनी नवी दिल्ली आणि मुंबई येथे खासदार सुप्रिया सूळे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भेट घेत त्यांना याबाबत संपुर्ण माहिती देत चर्चा केली. या मागणीची तात्काळ दखल घेत त्यांनीही पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र पाठवून या संस्थेचे प्रादेशिक कार्यालय नागपूर येथेच ठेवण्याची मागणी केली आहे.
मुळात गुजरात राज्यात खाणींची संख्याच नगण्य असतांना तेथे ही संस्था विलीनीकरण व स्थलांतरीत करणे हा मध्य भारतातील आणि त्यातही प्रामुख्याने महाराष्ट्रातील खाण कामगारांवर अन्याय असून खाणिक कामगारांच्या आरोग्याबाबत सरकार उदासिन असल्याचे लक्षात येते. एनआयओएच ही संस्था सर्व व्यावसायिक क्षेत्रातील कर्मचा-र्यांच्या आरोग्याबाबत संशोधन व तांत्रिक सेवा देते, त्यामुळे विलीनीकरणानंतर हा विषय आता फक्त खणन क्षेत्रातील कामगारांचा राहणार नसून सर्व क्षेत्रातील व्यावसायिक कर्मचाऱ्यांचा होणार आहे. यात सर्व औद्योगिक, सर्व प्रकारच्या कंपन्या, इतरही व्यासायिक क्षेत्रात काम करणारे अंतर्भूत आहेत. त्यामुळे प्रादेशिक कार्यालय नागपुरात राहीले तर महाराष्ट्रासहित मध्य भारतातील राज्यातील खाण कामगारांच्या आरोग्यासोबतच सर्व स्तरातील व्यावसायिकांच्या आरोग्याच्या संशोधन व सेवा पुरविण्यासाठी उपयुक्त ठरेल असेही डॉ. अंजली साळवे यांनी स्पष्ट केले आहे.याबाबत डॉ ऍड अंजली साळवे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे विशेष आभार व्यक्त करत खासदार डॉ अमोल कोल्हे व ना राजेश टोपे यांचे सुद्धा आभार मानत ही संस्था नागपूर येथेच असावी यासाठी राज्यातील सर्व लोकप्रितिनिधींनी पुढे येण्याचे आवाहनही केले आहे.
एनआयएमएच वाचविण्यासाठी डॉ साळवे यांची आरोग्य मंत्री यांचेशी चर्चा
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/315hsZq
via
No comments