काळजी घ्या, सतर्क राहा, अफवांवर विश्वास ठेवू नका!
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे : नियम पाळण्याचे केले आवाहन
नागपूर : नागपूर शहरात ३१ जुलै अथवा ३ ऑगस्टपासून पुन्हा कडक लॉकडाऊन सुरू होईल, याबाबत निर्णय झाल्याचे वृत्त बुधवारी शहरात वाऱ्यासारखे पसरले. मात्र, ही निव्वळ अफवा आहे. ३१ जुलै किंवा ३ ऑगस्टपासून लॉकडाऊन अथवा कर्फ्यू लावण्यात आलेला नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
नागपूर शहरात लॉकडाऊन घोषित करण्याचा अधिकार आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथ रोग नियंत्रण कायद्यान्वये नागपूर महानगरपालिका आयुक्तांना आहे. त्यामुळे त्यांच्याव्यतिरिक्त कुणाच्याही नावाने संदेश बाहेर फिरत असेल किंवा कोणाची ऐकीव माहिती असेल तर ती केवळ अफवाच असू शकते. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.
महाराष्ट्र शासनाने शिथिलता देऊन ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत जे नियम ठरवून लॉकडाऊन घोषित केला आहे, त्या नियमांचे पालन नागरिकांनी करायचे आहे. दैनंदिन कार्य सुरू ठेवायचे मात्र त्यासाठी असलेले नियम पाळायचे. ते पाळले तर कोरोनाचे संक्रमण होणार नाही. त्यासाठी व्यापारी, नागरिकांमध्ये जाऊन जनजागृती सुरू आहे. दरम्यान दोन दिवसांचा जनता कर्फ्यू नागरिकांनी पाळला आणि शिस्तीचे दर्शन घडविले. हीच शिस्त यापुढे अंगी बाणवायची आहे. सोशल डिस्टंसिंग पाळणे, सम आणि विषम नियमांचे पालन दुकानदारांनी करणे, दुकानात सॅनिटायझर ठेवणे, मास्कचा वापर करणे, एका वेळी फक्त पाच ग्राहक दुकानात असणे, वाहनांसंदर्भात असलेल्या नियमांचे पालन करणे, हे सर्व दिशानिर्देश पाळणे आवश्यक आहे. लॉकडाऊन किंवा कर्फ्यू हा अंतिम पर्याय नाही. परंतु नियम पाळले नाही तर कर्फ्यू लावावा लागेल. मात्र तसे करताना कमीत कमी तीन ते चार दिवस अगोदर त्याची सूचना नागरिकांना देण्यात येईल, त्यामुळे कुठल्याच अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.
लक्षणे आढळल्यास चाचणी करा!
कोव्हिड-१९ वर नियंत्रण मिळवायचे असेल, साखळी खंडित करायची असेल तर नागरिकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. शरीरात कोरोनाशी संबंधित कुठलीही लक्षणे आढळल्यास तातडीने चाचणी करून घेणे आवश्यक आहे. मनपातर्फे आता ठिकठिकाणी चाचणी केली जात आहे. त्यामध्ये सहभागी होऊन नागरिकांनी चाचणी करून घ्यावी. मनपाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ॲन्टीजेन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. तेथे नागरिकांनी चाचणी करून घ्यावी. सतर्क राहा, काळजी घ्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
काळजी घ्या, सतर्क राहा, अफवांवर विश्वास ठेवू नका!
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3g9qivA
via
No comments