Breaking News

क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करणार – सुनील केदार

Nagpur Today : Nagpur News


नागपूर : राज्यात क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्याचे विचाराधीन आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करणार असून, त्यासाठी त्या-त्या जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडूंवर विशेष लक्ष देण्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

मानकापूर विभागीय क्रीडा संकुल येथे आढावा बैठकीत ते बोलत होते. क्रीडा सहसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, अमरावतीच्या क्रीडा उपसंचालक श्रीमती प्रतिभा देशमुख, नागपूरचे प्रभारी उपसंचालक अविनाश पुंड आणि विदर्भातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज्यातील सर्वच क्रीडा संकुलात पायाभूत सुविधा वाढवून खेळाडूंच्या क्षमता विकसित करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. विदर्भात अनेक कोळसा व सिमेंट कंपन्या असून, जिल्हा क्रीडा विभागाने त्यांच्याशी समन्वय साधत सीएसआर निधीतून पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात. राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. भविष्यात राज्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करावी, ही अपेक्षा ठेवताना, उत्कृष्ट क्रीडा शिक्षकांची नेमणूक करण्यासोबतच त्यांच्या नियुक्तीबाबतही विभाग विचाराधीन असून, क्रीडा संकुलाचे व्यवस्थापन, देखभाल, दुरुस्तीमध्ये सातत्य ठेवताना क्रीडा विभागाने आर्थिक स्त्रोत निर्माण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

राज्यात लवकरच क्रीडा विद्यापीठ सुरु करणार असून, क्रीडा मंत्री श्री. केदार यांनी अधिकाऱ्यांना अभिनव संकल्पना, मार्गदर्शक सूचना विभागाकडे पाठविण्याबाबत निर्देश दिले. क्रीडा विद्यापीठासाठी सहायक अधिकारी-कर्मचारी (सपोर्टींग स्टाफ) आदी मनुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे. त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील क्रीडा संकुलात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली असून, येथे ‘साई’च्या धर्तीवर क्रीडा प्रबोधिनी सुरु करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यात विशेष लक्ष घातल्यास भविष्यात क्रीडा क्षेत्रात राज्याचे नेतृत्व करणारे चांगले धावपटू मिळू शकतात. त्यासाठी क्रीडा विभागाकडून अशा धावपटूंचा शोध घेवून त्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येईल, असे ते म्हणाले.

नागपूरच्या विभागीय क्रीडा संकुल परिसरात असलेली सर्व कार्यालये एक छताखाली आणावीत. त्यामुळे परिसरातील जागेचा इतर क्रीडा प्रकारांतील खेळाडूंना सराव करण्यासाठी उपयोग करता येईल, असे निर्देशही त्यांनी दिले.

विभागीय क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रँक, पँव्हेलीयन इमारत आणि वसतीगृहाची त्यांनी पाहणी केली. इंन्डोअर हॉल, सिंथेटिक ट्रँक, पँव्हेलीयन इमारत, कुंपण भिंतीचे काम, जिल्हा नियोजनमधून वसतीगृहाचे काम, क्रीडा संकुलासाठी व्यवस्थापन देखभाल दुरुस्ती, सिक्युरिटी गार्ड, इलेक्ट्रिक बिल, पाणीपुरवठा याबाबत आढावा घेतला. तसेच विभागीय क्रीडा संकुल परिसरात वृक्षारोपण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हास्तरीय क्रीडा विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. क्रीडा संकुल परिसरातील वॉटर लॉकींग सिस्टम, ड्रेनेज सिस्टम, रेन वॉटर हॉर्वेस्टींग कामाची माहिती तात्काळ देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करणार – सुनील केदार



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2NhwPrt
via

No comments