नागपूरच्या पारडीतील हत्याकांडाचा छडा : दोन आरोपी गजाआड
नागपूर : पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी ५ दिवसांपूर्वी घडलेल्या हत्याकांडातील आरोपींना अटक करण्यात पारडी पोलिसांनी यश मिळवले. मात्र आरोपींनी ज्याची हत्या केली त्या मृताची ओळख पटविण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. तो कोण, कुठला हे शोधून काढण्यासाठी पोलीस शोधाशोध करत आहेत.
२८ मेच्या सकाळी नागपूर-भंडारा मार्गावरील कापसी पुलाजवळ एका झाडाखाली अंदाजे २५ वर्षे वयाच्या तरुणाचा मृतदेह पडून असल्याची माहिती पारडी पोलिसांना मिळाली होती. ठाणेदार सुनील चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्याकडे ओळख पटविणारे कोणतेही साधन नव्हते. त्याच्या डोक्यावर सिमेंटच्या विटेने मारून आरोपींनी त्याची हत्या केली असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी बाजूला पडलेल्या रक्तरंजित विटेवरून काढला होता. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी मृत आणि मारेकऱ्यांचा शोध लावण्यासाठी प्रयत्न चालविले. तब्बल चार दिवस प्रयत्न केल्यानंतर ही घटना उघडकीस आल्याच्या पूर्वरात्रीला काहीजण घटनास्थळाजवळ दारू पीत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी आजूबाजूच्यांकडे चौकशी केली.
आरोपी अमित ऊर्फ जल्या सहदेव कावडे (वय ३५, रा. नवरगाव रामटेक) आणि पुरुषोत्तम सुरजप्रसाद विश्वकर्मा (वय ३८, रा. प्रतापपूर सिहोरा, जी. जबलपूर, मध्यप्रदेश) हे दोघे त्या रात्री तिकडे दिसल्याचे पोलिसांना खबऱ्याने सांगितले. त्यावरून पोलिसांनी कावडे आणि विश्वकर्माचा शोध घेऊन त्यांना रविवारी ताब्यात घेतले. चौकशीत या दोघांनी हत्येची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी या दोघांना हत्येच्या आरोपात अटक केली.
तंबाखू आणि दारूने केला घात
आरोपींनी गुन्ह्याची कबुली देताना सांगितले की, २७ मे च्या रात्री घटनास्थळी मृत तरुण दारू पीत बसून होता, तेथे आम्ही दोघे गेलो असता त्याने आम्हाला तंबाखू खायला मागितला. त्याबदल्यात दारूची अर्धी बाटली देण्याचे मान्य केले. तंबाखू खाल्ल्यानंतर मात्र त्याने दिलेली दारूची बाटली लगेच हिसकावून घेतली. त्यामुळे त्याच्यासोबत हाणामारी झाली. काही वेळेनंतर आरोपी तेथून निघून गेले आणि पुन्हा दारूची बाटली घेऊन तिथे परतले. ती दारू पिल्यानंतर या दोघांनी त्या तरुणासोबत वाद घातला. झटापट सुरू असताना एका आरोपीने मृताचे पाय पकडले तर दुसºयाने सिमेंटची वीट त्याच्या डोक्यात घालून त्याची हत्या केली. त्यानंतर हे दोघे पळून गेले. आरोपीच्या या कबुलीजबाबातून केवळ तंबाखू आणि दारूच्या अर्ध्या बाटलीसाठी हत्येसारखा गंभीर गुन्हा घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागपूरच्या पारडीतील हत्याकांडाचा छडा : दोन आरोपी गजाआड
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2Uh0uoD
via
No comments