Breaking News

लॉकडाऊन काळात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

Nagpur Today : Nagpur News

93 लाखाची सुपारी जप्त

नागपूर : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत नागपूर जिल्हयात सदर कालावधीत रिफाईन्ड सोयाबिन तेल सुमारे 972 किलो किंमत 1 लाख 16 हजार 616 रुपये, रिफाईन्ड सूर्यफुल तेल 258 किलो किंमत 27 हजार 837 रुपये, सुपारी सुमारे 28,979 किलो किंमत 93 लाख 58 हजार 945 रुपये तसेच प्रतिबंधित अन्न पदार्थ 514 किलो किंमत 5 लाख 15 हजार 615 एवढ्या किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सहआयुक्त अन्न यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

अन्न व औषध प्रशासन नागपूर कार्यालयातर्फे कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी काळात जनतेस निर्भेळ, स्वच्‍छ व आरोग्यदायी अन्न पदार्थ मिळणेस्तव विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेमध्ये संपूर्ण नागपूर जिल्हयात अन्न व औषध प्रशासनाने जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एकूण 175 अन्न आस्थापनांना भेटी दिल्या. त्यापैकी 2 पेढ्यांना स्वच्छतेच्या कारणास्तव विक्री बंद करण्याचे प्रतिबंधित आदेश पारित केले. तसेच सुमारे 76 अन्न नमुने तपासणीस्तव घेण्यात आले. संचारबंदीच्या कालावधीत रिफाईन्ड सोयाबिन तेल सुमारे 972 किलो, किंमत 1 लाख 16 हजार 616 रुपये, रिफाईन्ड सूर्यफुल तेल 258 किलो किंमत 27 हजार 837 रुपये, सुपारी सुमारे 28,979 किलो किंमत 93 लाख 58 हजार 945 रुपये तसेच प्रतिबंधित अन्न पदार्थ 514 किलो किंमत 5 लाख 15 हजार 615 एवढ्या किंमतीचा साठा सुध्दा जप्त करण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत गरीब स्थालांतरीत मजुरांना जेवण पुरविण्यात येत होते अशा एकूण 17 कम्युनिटी किचनची स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने तपासणी करण्यात येवून अन्न विषबाधेसारख्या अप्रिय घटनांना योग्य प्रकारे आळा घालता आला. तसेच कोविड-19 अंतर्गत प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आलेले आहेत. त्या रुग्णांना पुरविण्यात आलेल्या जेवणाच्या संदर्भात दोन्ही रुग्णालयातील किचनची सुध्दा तपासणी करुन आवश्यक त्या सूचना निर्गमित केल्या.

अन्न व औषध प्रशासनाने मागील वर्षात नागपूर जिल्हयात एकूण 988 अन्न आस्थापनांची तपासणी करुन त्यापैकी 11 परवाने निलंबित केले. 13 प्रकरणे न्याय निर्णयाकरीता दाखल करण्यात आले असून 21 हजार 500 रुपये दंड आकारण्यात आला आहे व 16 तडजोड प्रकरणात 32 हजार रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. तसेच एकूण 521 अन्न नमुने तपासणीस्तव घेण्यात आले, त्यापैकी 84 नमुने कमी दर्जा व मिथ्याछाप आढळून आले व 62 नमुने असुरक्षित आढळून आले. 9 कमी दर्जा प्रकरणी 46 हजार रुपये तडजोड शुल्क आकारण्यात आले. 86 दुधाचे नमुने विश्लेषणास्तव घेण्यात आले होते, त्यापैकी 12 नमुने कमी दर्जाचे आढळून आले होते. 12 कमी दर्जा नमुन्यापैकी 3 प्रकरणात 13 हजार रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.

प्रतिबंधित अन्न पदार्थ प्रकरणी 87 आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून 48 ठिकाणी एकूण 15,033 किलो, 1 कोटी 23 लक्ष 76 हजार 165 किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. 35 प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात येवून 22 प्रकरणी न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहे. याच कालावधीत नागपूर जिल्हयात सुपारी या अन्न पदार्थाचे एकूण 38 नमुने विश्लेषणास्तव घेवून तब्बल 5,32,600 किलो, 10 कोटी 50 लक्ष 46 हजार 977 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

वरील कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) शरद कोलते व अभय देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासन नागपूर कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी यांनी केली आहे.

लॉकडाऊन काळात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2Y0lfFQ
via

No comments