चिंधी बाजार व्यावसायिकांचे उपमहापौरांना निवेदन
नागपूर: लॉकडाउनमध्ये शहरातील बाजार बंद असल्याने जुने कपड्यांच्या बदल्यात भांडे विक्री करणा-या शेकडो चिंधी बाजार व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या विक्रेत्यांच्या सोयीकरीता शहरातील बाजार सुरू करण्यात यावेत अथवा त्यांच्या उपजीविकेसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, या मागण्यांचे निवेदन सोमवारी (ता.२९) उपमहापौर मनीषा कोठे यांना आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे यांच्या नेतृत्वात चिंधी बाजार विक्रेत्यांमार्फत देण्यात आले.
याप्रसंगी मनपा उपायुक्त निर्भय जैन यांच्यासह शिष्टमंडळातील ज्ञानेश्वर तायवाडे, धृपती खरे, गीता सनेसर, आशा तायवाडे, वैशाली खंडारे, लता कावळे, रत्ना इंगळे आदी उपस्थित होते.
शहरातील शेकडो विक्रेते मागील ५० वर्षापासून घरोघरी जावून किंवा शनिवार बाजार, रेल्वे स्टेशन जवळ किंवा अन्य आठवडी बाजारात जुन्या कपड्यांच्या बदल्यात भांड्यांचा व्यवसाय करीत आहेत. मात्र लॉकडाउनमुळे बाजारात व्यवसायासाठी परवानगी नसल्याने मागील तीन महिन्यांपासून या विक्रेत्यांचे हाल होत आहेत. लॉकडाउनच्या काळात सुरूवातीला स्थानिक आमदार, नगरसेवक व अन्य लोकप्रतिनिधींमार्फत मदत करण्यात आली. मात्र आता पुढील काळ उपासमारीचा आहे. या व्यवसायात मोठ्या प्रमाणात मातंग समाजबांधव असून यंदा बँडपार्टी आणि रिक्षाचाही व्यवसाय हिरावला गेला आहे. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या संदर्भात सकारात्मक निर्णय घेउन आठवडी बाजारात व्यवसायासाठी परवानगी देण्यात यावी किंवा उपजीविकेसाठी अन्य व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाद्वारे करण्यात आली.
यासंदर्भात यापूर्वी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनाही निवेदन सादर करण्यात आल्याचे विक्रेत्यांनी नमूद केले. चिंधी बाजार विक्रेत्यांच्या मागण्यांच्या संदर्भात गांभीर्याने विचार करून त्या संदर्भात लवकरात लवकर त्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी उपमहापौर मनीषा कोठे यांनी दिले.
चिंधी बाजार व्यावसायिकांचे उपमहापौरांना निवेदन
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2BQEuu4
via
No comments