अवाजवी वीज बिलाविरुद्ध भाजपचे जनआंदोलन
वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले निवेदन : जनतेला दिलासा देण्याची मागणी
नागपूर : कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर वीज कंपनीने वीज बिल भरण्यास सवलत दिली खरी मात्र आता पाठविलेले वीज बिल हे अवाजवी असून मध्यमवर्गीयांसोबतच सामान्य माणसाचे कंबरडे मोडणारे आहे. ही बिले तात्काळ परत घेण्यात यावी आणि योग्य बिले पाठवून जनसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करीत भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण-पश्चिम मंडळातर्फे वीज वितरण कंपनीच्या काँग्रेस नगर कार्यालयासमोर जनआंदोलन करण्यात आले.
महापौर संदीप जोशी आणि आमदार रामदास आंबटकर यांच्या नेतृत्वात हे जनआंदोलन करण्यात आले. यावेळी मुन्ना यादव, भाजप दक्षिण-पश्चिम मंडळाचे अध्यक्ष किशोर वानखेडे, माजी महापौर अर्चना डेहनकर, नंदा जिचकार, मनपाचे लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना महापौर संदीप जोशी म्हणाले, सध्या ग्राहकांना येणारे वीज बिल हा नागपुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनला आहे. बॉलिवुड स्टार्सनीसुद्धा यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. वीज बिलाचा आकडा हा सामान्य माणसांचे कंबरडे मोडणाराच आहे. जरी तीन महिन्याचे बिल एकत्र असले तर नियमानुसार युनीटचा दर लावण्यात आला नसल्याचे त्यात दिसून येते. हा वीज ग्राहकांवर अन्याय आहे. एकीकडे कोरोनाविरुद्ध युद्ध सुरू असता लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशात वीज कंपनीने पाठविलेले बिल म्हणजे सुल्तानी अन्याय असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार रामदास आंबटकर यांनीही यावेळी वीज वितरण कंपनीचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. वीज ही आता प्रत्येक व्यक्तीची निकड आहे. प्रत्येक व्यक्ती प्रामाणिकपणे बिल भरतो याचा अर्थ कंपनीने कसेही बिल द्यावे, हे कदापि खपवून घेतले जाणार नाही. सामान्य व्यक्तींच्या असहायतेचा गैरफायदा कंपनीने घेतला असल्याचा आरोप आमदार आंबटकर यांनी लावला. भारतीय जनता पार्टी नागरिकांच्या सोबत असून ह्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून नागरिकांना न्याय मिळवून देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी नागरिकांना दिला.
भाजप दक्षिण-पश्चिम मंडळाचे अध्यक्ष किशोर वानखेडे यांनी यावेळी वीज कंपनीविरोधात भाजपने पुकारलेल्या जनआंदोलनाची भूमिका विषद केली. यानंतर महापौर संदीप जोशी आणि आमदार रामदास आंबटकर यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री. भिसे यांना निवेदन देण्यात आले. कोरोना महामारीचा उद्रेक लक्षात घेता संपूर्ण दिशानिर्देश पाळतच हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची आणि मागणीची तात्काळ दखल घेऊन सुधारीत वीज बिल पाठविण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
अवाजवी वीज बिलाविरुद्ध भाजपचे जनआंदोलन
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2BSSDH6
via
No comments