शंकर नगर वीज उपकेंद्रातील रोहित्र पुन्हा कार्यान्वित
नागपूर: महावितरणच्या शंकर नगर येथील ३३ कि.व्हो. वीज उपकेंद्रातील रोहित्रात १२ मे रोजी झालेला बिघाड आणि या रोहित्राला ‘लॉकडाऊनच्या कठीण काळात तातडीने दुरुस्त करून महावितरणने वीज ग्राहकांना दिलासा दिला.
महावितरणच्या या कामाचे राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कौतुक केले आहे. आज त्यांनी शंकर नगर येथील वीज उपकेंद्रास भेट देऊन महावितरणच्या वतीने पूर्ण करण्यात आलेल्या कामाची पाहणी केली आणि अधिकारी,अभियंते तंत्रज्ञ यांचे कौतुक केले.
रोहित्र नादुरुस्त झाल्याबरोबर याचा भार ३३ के.व्ही.अमरावती रोड उपकेंद्रावर टाकून वीज ग्राहकांना अखंड वीज पुरवठा दिल्याबद्दल अभियंता आणि जनमित्रांचे आज अभिनंदन करण्यात आले. ४७ डिग्री तापमानात वीज कर्मचारी काम करीत असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.
महावितरणच्या शंकर नगर वीज उपकेंद्रात प्रत्येकी १० एम.व्ही.ए. क्षमतेचे ३ रोहित्र कार्यरत आहेत. यातील एका रोहित्रात बिघाड झाला होता. या वीज उपकेंद्रातून शंकर नगर,खरे टाऊन, शिवाजी नगर, हिल टॉप, रामनगर, धरमपेठ, डागा ले आऊट, पांढराबोडी, गांधी नगर,कार्पोरेशन कॉलनी या परिसरातील सुमारे १५३२४ वीज ग्राहकांना वीज पुरवठा होतो.काटोल येथील कंत्राटदाराकडून हे रोहित्र तातडीने दुरुस्त करून नागपुरात आणण्यात आले. त्याची चाचणी घेऊन आज उर्जामंत्र्याच्या हस्ते सुरु करण्यात आले.
ऐन उन्ह्याळ्यात , सर्वत्र लॉकडाऊन असताना महावितरणकडून वीज ग्राहकांना कोणताही त्रास न होता वीज पुरवठा अखंडित ठेवल्याबद्दल ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन वीज कर्मचाऱ्याचे मनोबल वाढवले.
यावेळी हाय पॉवर कमिटीचे अनिल खापर्डे, रमाकांत मेश्राम, अनिल नगरारे तसेच नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, राकेश जनबंधू, कार्यकारी अभियंता कुंदन भिसे उपस्थित होते.
शंकर नगर वीज उपकेंद्रातील रोहित्र पुन्हा कार्यान्वित
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2B9HUYI
via
No comments