Breaking News

मनपाच्या अधिकृत कर्मचाऱ्यांकडूनच निर्जंतुकीकरण

Nagpur Today : Nagpur News

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती : शासनाचे दिशानिर्देश मोडणाऱ्यांवर कारवाई होणार


नागपूर : नागपूर शहरात अग्निशमन गाड्या आणि हॅण्ड स्प्रेच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. हे निर्जंतुकीकरण केवळ आणि केवळ मनपाच्या कर्मचाऱ्यांकडूनच करण्यात येत आहे, अशी माहिती देत स्वयंसेवी संस्था किंवा नागरिकांनी स्वत: अशा प्रकारचे निर्जंतुकीकरण करु नये, असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

नागपूर शहरात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या भागात निर्जंतुकीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिका जबाबदारीने आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी हे निर्जंतुकीकरण करीत आहे. निर्जंतुकीकरणासंदर्भात शासनाचे काही दिशानिर्देश आहेत. त्याच पद्धतीने हे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. यासाठी संपूर्ण प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची चमू कार्यरत आहे. सोडियम हायपोक्लोराईडचा वापर निर्जंतुकीकरणासाठी करण्यात येत आहे.

मात्र, शहरातील काही भागात काही स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक आणि नागरिक स्वत: निर्जंतुकीकरण करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. भीतीपोटी किंवा समाजकार्य करण्याच्या उद्देशाने अशी पावले नागरिकांकडून उचलली जात आहे. मात्र, त्यामुळे इतर नागरिकांच्या आरोग्याला अपाय होण्याची शक्यता आहे. कुण्याही नागरिकांनी स्वत: अपुऱ्या माहितीच्या आधार किंवा गैरसमजातू कुठल्याही मिश्रणातून निर्जंतुकीकरण करु नये.

नागपूर महानगरपालिका प्रामाणिकपणे हे कार्य करीत असून तज्ज्ञ अधिकारी-कर्मचाऱ्यांची चमू कार्यरत आहे. शासनाचे दिशानिर्देश पायदळी तुडवत नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कुणीही निर्जंतुकीकरण फवारणी करताना आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

मनपाच्या अधिकृत कर्मचाऱ्यांकडूनच निर्जंतुकीकरण



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/345sj6F
via

No comments