राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदी दोन वर्ष पूर्ण;सहकार्याबद्दल व विश्वासाबद्दल मानले आभार
मुंबई – ‘सफलता एक दिन में नहीं मिलती, मगर ठान लो तो एक दिन जरूर मिलती है’ या हिंदीतील प्रसिद्ध शायरीचा आधार घेत आणि आदरणीय खासदार शरदचंद्र पवारसाहेबांचा आशीर्वाद व मार्गदर्शनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या मनात असलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आज प्रदेशाध्यक्षपदाची दोन वर्षे पूर्ण केलेल्या जयंत पाटील यांनी या दोन वर्षाच्या काळात दिलेल्या सहकार्याबद्दल व ठेवलेल्या विश्वासाबाबत आभार मानले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होवून राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याबद्दल एका पत्रातून राज्यातील राष्ट्रवादीच्या सर्व लोकांशी संवाद साधला आहे.
आज महाराष्ट्रावर किंबहूना देशावर कोरोनाचे संकट घोंघावत आहे. या संकटकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता मोठ्या जिद्दीने या संकटाला सामोरे जात आहे. एखाद्या कुटुंबांवर संकट कोसळलं की त्या कुटुंबातील प्रत्येक माणूस कुटुंबाला सावरण्यासाठी मिळेल ती गोष्ट करत असतो. महाराष्ट्र हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुटुंब आहे हा विचार डोक्यात ठेवून प्रत्येक कार्यकर्ता काम करत आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवती काँग्रेस तसेच राष्ट्रवादी सेवादलाचे काम उल्लेखनीय आहे.ओबीसी सेल, अल्पसंख्याक सेल, सामाजिक न्याय विभाग, इतर सेल, खासदार, आमदार,लोकप्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सोशल मीडिया समन्वयक, बुथचा प्रत्येक कार्यकर्ता ग्राऊंडवर जाऊन काम करत आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने अनेक कुटुंबांना आधार दिला आहे. कोरोना विषाणु विरुद्धच्या लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. या संकटाशी दोन हात करताना, ग्राऊंडवर काम करताना आपल्यापैकी अनेकांना कोरोनाची लागण होण्याची भीती असतानाही न डगमगता काम करत आहात त्याबद्दल जयंत पाटील यांनी कौतुक केले आहे.
कोरोनाच्या या संकटाच्या काळात जिल्हाध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी, महिला पदाधिकारी, युवक पदाधिकारी,डॉक्टर सेलचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी जयंत पाटील हे व्हिडीओ व आॅडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सातत्याने संपर्कात आहे. त्यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेल्या सुचनांचा पाठपुरावा असेल किंवा त्या सुचनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला तात्काळ दिलेले आदेश हेही जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष व त्यांचे सहकारी लोकांच्या मदतीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहेत. हा महाराष्ट्र तुमच्या कामाची नोंद घेईल अशी खात्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
मागच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या मालाला भाव नव्हता… कर्जमाफी दिली तीही फसवी… जीएसटी… नोटाबंदी यामुळे सामान्यांसह व्यापाऱ्यांचेही कंबरडे मोडले होते. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे बेरोजगारीमुळे तरुण वर्ग नाराज होता. तरी जाहिराती आणि निवडक माध्यमांना हाताशी धरून महाराष्ट्रातील जनतेसमोर फडणवीस सरकारने फसव्या विकासाचा बागुलबुवा तयार केला होता. संघर्षयात्रा… हल्लाबोल पदयात्रा… परिवर्तन यात्रा… शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या फसव्या सरकारचा भांडाफोड केल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्र जेव्हा पुराच्या विळख्यात सापडला होता, तेव्हाही फडणवीस सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले. संपूर्ण राज्यात फडणवीस सरकारविरोधी वातावरण असताना सोशल मीडिया व काही माध्यमांना हाताशी धरून भाजपसमोर राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना हे पक्ष टिकणारच नाही असे सतत बिंबवले गेले. आपल्या अहंकाराच्या जोरावर महाराष्ट्र काबिज करण्याची खेळी दिल्लीश्वरांनी आखली मात्र महाराष्ट्र न कधी दिल्लीच्या तख्तासमोर झुकला न कधी झुकणार ! हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिले व भाजपचा अहंकार चक्काचूर करून टाकला व पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या लोकांच्या मनातील सरकार अस्तित्वात आले याची आठवणही जयंत पाटील यांनी यानिमित्ताने करून दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असताना राज्यभर संघटनात्मक बांधणीसाठी दौरे करताना मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्यांने निवडणुकीची चांगल्याप्रकारे जबाबदारी सांभाळली त्याबद्दल जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.
ही सत्ता आपल्याला जनतेने दिली आहे तेव्हा या सत्तेचा उपयोग जनतेच्या हितासाठी करायला हवा. आदरणीय पवारसाहेब म्हणतात त्यापद्धतीने २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण या धोरणावर काम करायला हवे. शासनाचा प्रत्येक निर्णय… शासनाची प्रत्येक योजना… शासनाच्या सवलती राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायला हव्यात याची खबरदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक सदस्याने घ्यावी असे आवाहन करतानाच याच कामाच्या जोरावर आपण राज्यातील प्रत्येक माणूस आपल्या राष्ट्रवादी कुटुंबाशी, पवारसाहेबांच्या विचारांशी जोडून घेण्याचा प्रयत्न करा अशी खात्रीही जयंत पाटील यांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे.
अपनी किस्मत खुद बनाओ ,
न डरो किसी से ,न सर झुकाओ ,
शर्माना छोडो और सर उठाओ ,
आगे कदम बढ़ाओ ,खुदको नहीं हार को हराओ ,
ऐसा कोई जज्बा जगाओ , ख्वाब देखो और ख्वाब सजाओ ,
कुछ करने की ठानो, कभी हार मत मानो !
रुको नहीं , बस चलते जाओ ,
रुको नहीं ,बस चलते जाओ !! या शायरीतून जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना लढण्यासाठीची एकप्रकारची प्रेरणा देण्याचे काम केले आहे.
येत्या पुढील काळात आपल्या सर्वांच्या ताकदीने… आशिर्वादाने व सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यशाची असंख्य शिखरे गाठेल असा विश्वास जयंत पाटील यांनी सर्वांचे आभार मानताना व्यक्त केला आहे.
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2xZy5eN
via
No comments