अंडी-चिकनच्या सेवनामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नाही
– पशूसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे स्पष्टीकरण
नागपूर :- अंडी-चिकनच्या सेवनामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होत नसून आरोग्यासाठी चिकन अतिशय उपयुक्त आहे. याबाबत समाजमाध्यमावरुन पसरविण्यात आलेल्या अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी आपल्या आहारात दुध, अंडी, चिकन व डाळींचा अधिक प्रमाणात वापर करावा. याबाबत काही शंका असल्यास पशुसंवर्धन आयुक्त तसेच दुग्ध आयुक्त यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी केले.
कोरोना विषाणुचे संकट ही एक राष्ट्रीय आपत्ती असल्याने संपूर्ण देश 21 दिवसांसाठी “लॉक डाऊन” करण्यात आलेला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनानेही प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पावले तातडीने उचललेली आहे. या रोगाचे प्रसार थांबवण्याकरीता लोकांचे विलगीकरण व गर्दी टाळण्याच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. विषाणुपासून संरक्षण करीत असतांनाच स्वत:ची रोगप्रतिकारशक्ती वाढविणे तितकेच महत्वाचे आहे. रोगप्रतिकार शक्तीनेच आपण विविध आजारांचा प्रतिकार करु शकतो. या साठी नागरिकांनी मोठया प्रमाणात दुध, अंडी व चिकनचे सेवन करणे आवश्यक असल्याचे श्री. केदार म्हणाले.
विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीचा आपला लढा सुरु झाला असून त्यात स्वयंशिस्तीने स्वतःसह देशाचे रक्षण करावयाचे आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचे महत्वाचे साधन म्हणजे शरीराला लागणारी पोषणद्रव्ये. यापैकी शरीरात असलेली प्रथिनांची (प्रोटीन) मात्रा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. आहारातील दुध, अंडी, चिकन, दाळी या वस्तूंमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. शरीरासाठी आवश्यक प्रथिनांची पूर्तता झाल्यामुळे आरोग्य चांगले रहाते व रोगप्रतिकारशक्ती वाढते.
नुकतेच समाजमाध्यमांवर चिकनमध्ये कोरोना विषाणु असल्याची अफवा पसरविण्यात आली होती. त्याची शासनाने गांभिर्याने दखल घेऊन असा गैरसमज पसरविणाऱ्या विरोधात घेत सायबर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन 02 व्यक्तींना अटक केली आहे.एकाला आंध्रप्रदेश आणि दुसऱ्याला उत्तरप्रदेशातून ताब्यात घेण्यात आले आहे. कोंबडयांमये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असल्याबाबत कुठलाही शास्त्रीयदृष्ट्या आधार नसून जगामध्ये कोंबडयांमधे कोरोना विषाणू आढळल्याची एकाही घटनेची नोंद नाही. संचारबंदी काळात दुध, ब्रेड, अंडी, मांस या जिवनावश्यक बाबी असल्याने त्यांची वाहतूक व विक्री यांना प्रतिबंधक यादीतून वगळण्यात आलेले आहे. याविषयी काही अडचणी उद्भवल्यास पशुसंवर्धन आयुक्त श्री. सचिन्द्रसिंग यांचेशी (भ्रमणध्वनी क्रमांक ९४२२८८५५११) किंवा अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन श्री. फरकाळे यांचेशी (भ्रमणध्वनी क्रमांक ९४२३२०७०७०) संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.
प्रतिबंधात्मक कारवाईच्या काळात महाराष्ट्रातील ग्रामीण भागात होणाऱ्या दुध उत्पादनास मागणीच्या अभावाने अडचणीस सामना करावा लागत आहे. तरी दुध उत्पादक संघांनी ठरवलेल्या हमीभावात शेतकऱ्यांकडून दुध विकत घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जिल्हा दुध उत्पादक संघाकडे शिल्लक राहीलेले दुध राज्य शासन खरेदी करणार असून महानंदाच्या माध्यमातून राज्यात आवश्यक दुधाचा पुरवठा करण्याची उपाययोजना करण्यात येईल, असे ते म्हणाले.
दुग्धप्रक्रिया केंद्रांमध्ये लागणाऱ्या आवश्यक कच्चा माल जसे डाय, स्टॅबलायझर, प्रिझरवेटीव्ह, फ्लेवर, फॅट, पॅकींग मटेरीयल, खाण्याचे रंग इत्यादींचा पुरवठा सुरळीत सुरु राहील याकडे शासनाचा दुग्धव्यवसाय विभाग लक्ष पुरवित आहे. दुध व दुग्धजन्य पदार्थ यांचा खरेदी व विक्री संदर्भात कोणत्याही अडचणी आल्यास दुग्ध आयुक्त श्री. पोयाम यांचेशी (भ्रमणध्वनी क्रमांक ९८८१९४४१५९) संपर्क साधता येईल.
कोरोनाविरुध्द प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत शासनाने घरी राहण्याच्या सुचना दिल्या असल्याने नागरीक आपले मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी योग-प्राणायाम, सूर्यनमस्कार, दोरी उड्या इत्यादी व्यायाम करु शकतात. असेही आवाहन श्री. केदार यांनी केले आहे.
अंडी-चिकनच्या सेवनामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नाही
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2WERUSt
via
No comments