‘लॉक डाऊन’मुळे बेघर-विस्थापित नागरिकांना निवारा – कुमार
भोजन व औषध आदि सुविधा
नागपूर: कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या ‘लॉक डाउन’मुळे औद्योगिक क्षेत्रातील अनेक कामगारांना फटका बसला आहे. अशा कामगारांसह बेघर झालेल्या 13 हजार 563 नागरिकांची 141 निवारागृहे (शेल्टर होम) व्यवस्था करण्यात आली आहे. निवारागृहातील विस्थापितांसाठी 141 सामूहिक किचनच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्थासुद्धा करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिली.
‘लॉक डाऊन’च्या कालावधीत मोठ्या प्रमाणात बेघर झालेले नागरिक, विस्थापित झालेले तसेच परराज्यातील अडकलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह, अन्नधान्य, व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत, यासाठी राज्य, विभाग व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांनी आज अडकलेल्या व बेघर नागरिकांसाठी निवारागृहे सुरू केली आहेत,
विभागात नागपूर – 73 निवारागृहे ( 8 हजार 179 नागरिकांची सुविधा), वर्धा जिल्हा – 7 निवारागृहे ( 240 नागरिक) भंडारा जिल्हा- 9 ( 1032 नागरिक) गोंदिया जिल्हा- 8 (1723 नागरिक) चंद्रपूर जिल्हा – 8 ( 1650 नागरिक) व गडचिरोली जिल्हा – 36 (739 नागरिक) अशा पध्दतीने एकूण 13 हजार 563 विस्थापित कामगार व बेघरांची व्यवस्था करण्यात आली आहे.
बेघर तसेच विस्थापित कामगारांसाठी निवारागृहात अन्नधान्य, भोजन, पाणी, वैधकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती डॉ. संजीव कुमार यांनी दिली.
141 सामूहिक किचनची सुरुवात
जमावबंदो व लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर कामगार व नागरिकांची निवारागृहात सुविधा करण्यात आली आहे. निवारागृहातील नागरिकांसाठी भोजनाची सुविधा 141 सामूहिक किचनच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यात 73, वर्धा 7, भंडारा 9, गोंदिया, चंद्रपूर प्रत्येकी 8 व गडचिरोली जिल्ह्यातील 36 सामूहिक किचनची सुविधा करण्यात आली आहे. सध्याच्या ठिकाणीच थांबून जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या निवारागृहातच राहावे, आपल्या गावी अथवा परराज्यात जाण्यासाठी प्रवास करू नये, असे आवाहन करतानाच विभागात विस्थापितांच्या मागणीनुसार अजून शेल्टर होम सुरू करण्यात येतील, असेही विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी कळविले आहे.
‘लॉक डाऊन’मुळे बेघर-विस्थापित नागरिकांना निवारा – कुमार
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2WVyWqU
via
No comments