सुरवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास गर्भाशय मुखाचा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो – डॉ. अनुपमा भुते
“गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांच्या योनीमार्गातील अस्वच्छतेमुळे तसेच गर्भाशयाच्या तोंडावर ‘ह्युमन पपिल्लोमा व्हायरस'(एचपीव्ही) या विषाणूद्वारे होणारा कर्करोग आहे. हा विषाणू हळुवार कार्यरत होत असल्याने रोगाच्या सुरवातीला निदान होणे कठिण असते व आजार अगदी वरच्या स्तरात पोचल्यावर त्याचे निदान होते. अशा परिस्थितीत उपचारपद्धती अयशस्वी होऊन काही काळातच रुग्ण दगावतो. अगदी सुरवातीच्या टप्प्यात या कर्करोगाचे निदान होऊन वेळेत उपचार केले गेल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. भारतात दरवर्षी सुमारे दीड लाख रुग्ण आढळून येतात व उशिरा निदान झाल्याने यातील 22 हजार रुग्णांना जीव गमवावा लागतो. महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. गर्भाशयाशी निगडीत आजार हे अस्वच्छतेच्या सवयींमुळे होतात, त्यामुळे त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे”, असे मार्गदर्शन ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. अनुपमा भुते यांनी केले. सार्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्था, नागपूरच्या वतीने महिलांसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबीर आणि मकरसंक्रांतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात सर्व्हायकल कॅन्सर (गर्भाशय मुखाचा कर्करोग) या विषयावर त्या बोलत होत्या. चिटणीसनगर हनुमान मंदिर, उमरेड रोड, नागपूर येथे दि. 23 जानेवारीला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कर्करोगाशी निगडित कार्यात उल्लेखनीय काम करणारे श्री. मनीष करविंदकर यांनी तसेच ‘निरोगी जीवनासाठी समतोल आहाराचे महत्व’ या विषयावर वरिष्ठ आहारतज्ञ श्रीमती प्रियंका कोठारी यांनी मार्गदर्शन केले.
सार्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पल्लवी बोरेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. संस्थेच्या विविध विषयांवरील कार्याची त्यांनी माहिती दिली व संस्थेच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने भविष्यातसुद्धा सामाजिक कार्य अविरत सुरू राहील, अशी आशा व्यक्त केली.
सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती योगिता शिवणकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या. विविध खेळ व हळदी-कुंकूने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
लिना डांगोरे, आरती येळेकर, अश्विनी मस्के, तनुजा फाये, समीर येरपुडे, सुरुची गिरी, सुषमा मांडवगडे, कांचन डोये, अनिरुद्ध अनासने या संस्थेच्या सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
सुरवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास गर्भाशय मुखाचा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो – डॉ. अनुपमा भुते
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3pcUFWs
via
No comments