१६ जानेवारीपासून कोव्हिड लसीकरणाचा श्रीगणेशा
– नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचा-यांना पहिल्या टप्प्यात आठ केंद्रांवर लस
नागपूर– नागपूर महानगरपालिकेद्वारे लसीकरणासंदर्भात आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झालेली असून येत्या १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाचा श्रीगणेशा ८ केन्द्रापासून होणार आहे. कोव्हिडच्या काळात अनेक संकटांचा सामना केल्यानंतर नव्या वर्षात लसीकरणाची सुरूवात ही नागपुरकरांसाठी सुखद बाब असणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यात शहरातील ज्या आरोग्य कर्मचा-यांनी ‘कोव्हिन’ ॲपवर नोंदणी केली आहे, त्याच कर्मचा-यांना लस दिली जाणार आहे.
कोव्हिड लसीकरणासंदर्भात सोमवारी (ता.११) मनपा मुख्यालयातील ‘कोरोना वार रूम’मध्ये मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बैठक घेतली. बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांच्यासह सर्व वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रतिनिधी, सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी, पोलिस प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत आयुक्तांनी लसीकरणासंदर्भात स्थितीचा आढावा घेतला व अडचणींवर चर्चा करून वैद्यकीय अधिका-यांच्या शंकांचे निरसन केले. तसेच निर्धारित वेळेच्या आधीच पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
पहिल्या टप्प्यामध्ये मनपाकडे नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचा-यांना लस दिली जाणार आहे. यासाठी शहरामध्ये आठ केंद्र तयार केली आहेत. मनपाच्या सदर रोगनिदान केंद्र, महाल रोगनिदान केंद्र, पाचपावली सूतीकागृह, के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (मेयो), एम्स, डागा हॉस्पिटल या आठ ठिकाणच्या कोव्हिड लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात येईल. प्रत्येक केंद्रावर १०० कर्मचारी याप्रमाणे सर्व कर्मचा-यांना लस दिली जाणार आहे. लसीकरण केंद्रावर सुरक्षेच्या सर्व कोव्हिड प्रतिबंधक उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले असून प्रत्येक केंद्रावर मनपाचे ४ आरोग्य कर्मचारी व पोलिस कर्मचारी तैनात राहतील. प्रत्येक झोनस्तरावर झोनल वैद्यकीय अधिकारी लसीकरणाचे समन्वय करतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
एच्छिक व नि:शुल्क लस
‘कोव्हिन’ ॲपवर नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात येणार असली तरी ती बंधनकारक करण्यात आलेली नाही. लस ही ऐच्छिक आहे. विशेष म्हणजे लस पूर्णत: नि:शुल्क आहे. सध्या शहरात ८ केंद्रावर लसीकरण होणार असून लवकरच या केंद्रांची संख्या वाढवून ५० पर्यंत केली जाणार आहे. यामध्ये शासकीय रुग्णालय, मनपाच्या आरोग्य केंद्रांसह खाजगी रुग्णालयांचाही समावेश राहणार आहे. या सर्व केंद्रांवरही नि:शुल्क लस देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचा-यांना लसीकरणाच्या २४ तास अगोदर ‘एसएमएस’वरून केंद्राची माहिती, वेळ आदी माहिती दिली जाईल.
कोरोना संक्रमणापासून मुक्तीची सुरूवात : महापौर दयाशंकर तिवारी
नागपूर शहरात प्रत्यक्ष कोव्हिड लसीकरणाला १६ जानेवारी पासून प्रारंभ होणे ही समस्त नागपुरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मकर संक्रांतीच्या पर्वावर शहराला मिळालेली ही गोड भेट आहे. नागपूरकर मकर संक्रांतीला आकाशात उंच पतंग उडवून कोरोनाच्या संक्रमणालाही दूर-दूर पर्यंत लोटून देत कोराना संक्रमणाच्या मुक्तीची नवी सुरूवात होणार, हा विश्वास आहे. यासाठी पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी यांचे कोटी-कोटी अभिनंदन. नागपूर शहरातील आरोग्य कर्मचा-यांसह सर्व कोव्हिड योध्दे मागील काही महिन्यांपासून घेत असलेल्या परिश्रमाचे हे फलीत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचा-यांना लसीकरण देण्यात येत असून सर्वसामान्यांनाही लस मिळणार आहे. मात्र लस आली म्हणून कुणीही सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नये. आपला बेजबाबदारपणा कुणाच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहा, सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.
१६ जानेवारीपासून कोव्हिड लसीकरणाचा श्रीगणेशा
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3qbyEr5
via
No comments