Breaking News

तीन हजार महिलांना कौशल्य विकासातून रोजगार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Nagpur Today : Nagpur News

Ø ब्रह्मपुरी उपविभाग उद्योगक्षेत्र म्हणून नावारूपास येणार

Ø विकासाबरोबर नागरिकांच्या हाताला काम मिळवून देणार

चंद्रपूर : , ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’ ही महिलांचे महत्त्व सांगणारी म्हण आता जुनी झाली असून ‘ज्या कुटुंबांची महिला कमावती, त्या कुटुंबाची होईल प्रगती’ ही म्हण आता लागू झाली आहे. महिलांच्या बचतीवर कुटुंबाचा गाडा चालतो. ब्रम्हपुरी क्षेत्रातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या म्हणून कौशल्य विकासच्या माध्यमातून पुढील तीन वर्षात तीन हजार महिलांना गारमेंट शिलाईचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणातून महिलांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध होणार असून त्यातून त्यांनी आपल्या कुटूंबाचा आधार बनावे अशी अपेक्षा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यानी आज व्यक्त केली.

ब्रम्हपुरी येथील एन.डी. गारमेंट येथे ॲडव्हान्स गारमेंट मेकींग प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन समारंभात ना. वडेट्टीवार उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी कौशल्य विकास नागपूर चे आयुक्त सुनिल काळबांडे, नगराध्यक्षा रिता उराडे, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त भय्याजी येरमे, एन.डी. गारमेंटचे संचालक निलेश गुल्हाने, उद्योग महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की भविष्यात ‘मेड इन ब्रह्मपुरी’ चे वस्त्र सर्व जगात जाऊन ब्रह्मपुरीकरांची मान अभिमानाने उंचावल्या जाईल. ब्रम्हपुरी येथे अद्यावत तयार कपडे निर्मिती करुन ते विविध मेट्रो शहरातील प्रमुख बाजारपेठेत उपलब्ध होणार आहेत. गारमेंट शिलाईचा हा प्रकल्प जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील महत्त्वपूर्ण एकमेव प्रकल्प आहे. येथे सर्व प्रकारचे कपडे तयार होणार असून हा प्रकल्प पुढील कालावधीत पाच एकर मध्ये विस्तारित होणार आहे. विकासाबरोबर नागरिकांच्या हाताला काम मिळवून देण्याचा कार्यक्रम हाती घेतला असून ब्रह्मपुरी विभागात पुढील दोन वर्षात किमान दोन हजार तरुणांना रोजगार मिळेल असे नियोजन करण्यात आले असल्याचेही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले. गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्यातून होणाऱ्या सिंचनाचा सर्वाधिक फायदादेखील ब्रह्मपुरी क्षेत्राला होणार आहे, त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून उद्योग व्यवसायाला चालन मिळेल. ब्रम्हपुरी क्षेत्रात येत्या काही वर्षात विविध उद्योग सुरू करण्यात येणार असून, लवकरच ब्रह्मपुरी उपविभाग उद्योगक्षेत्र म्हणून नावारूपास येईल असेही त्यांनी सांगितले.

कौशल्य विकासातून महिलांना रोजगारचा हा उपक्रम कौशल्य विकास विभागातर्फे सुरू करण्यात आला आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षणाचा कार्यक्रम विदर्भात सर्वात पहिले ब्रम्हपुरी येथे सुरू करण्यात येत असल्याचे कौशल्य विकासचे उपायुक्त सुनिल काळबांडे यांनी सांगितले. महिलांनी येथे प्रशिक्षण घेवून स्वंयरोजगार सुरू करावा असे आवाहन त्यांनी केले.

एन. डी. गारमेंट चे संचालक निलेश गुल्हाने यांनी प्रास्ताविक केले. औद्योगिक व आर्थिक विकासाचा पाया कौशल्य असुन स्वतःचे कौशल्य विकसित करून प्रत्येकाला रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करता येतो. ब्रह्मपुरी येथील गारमेंट प्रशिक्षण केंद्रात सध्या 200 अद्यावत शिलाई मशीन उपलब्ध असून लवकरच 300 मशीन उपलब्ध होणार आहेत. येथील 500 मशीनवर प्रशिक्षणार्थी महिलांना सहा महिन्यात तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणींना कौशल्य विकासातून प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून देणारी विदर्भातील ही अभिनव योजना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने पुर्णत्वास येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

उपस्थितांचे आभार कौशल्य विकासचे सहाय्य आयुक्त भैय्याजी येरमे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाला ब्रम्हपुरी येथील नगरसेवक, संबंधीत अधिकारी, महिला व नागरिक उपस्थित होते.

तीन हजार महिलांना कौशल्य विकासातून रोजगार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3qXhcr1
via

No comments