जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबध्द- पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम
भंडारा :- देशाच्या विकासात महाराष्ट्राचे फार मोठे योगदान असून राज्याने अनेक क्षेत्रात देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. पुरोगामी विचारसरणीचा वारसा पुढे नेण्यासोबतच राज्याने आर्थिक आघाडीवरही लक्षणीय कामगिरी केली आहे. सामान्य माणूस, शेतकारी व कामगार यांना डोळ्यासमोर ठेवून विकासाच्या विविध योजना शासन प्रभावीपणे राबवित आहे. भंडारा जिल्ह्यातही विविध विकास योजनांची अंमलबजावणी सुरु असून यापुढेही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द असेल अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. खासदार सुनिल मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव, उपवनसंरक्षक एस. बी. भलावी, अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे व अधिकारी उपस्थित होते.
शेतकरी हा महाविकास आघाडी सरकारचा केंद्र बिंदू असून शेतकरी कर्जमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प आहे. राज्यात महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहिर करण्यात आली असून जिल्ह्यातील 35 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 150 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत असे पालकमंत्री म्हणाले.
भंडारा जिल्ह्यात ऑगस्ट महिण्यात झालेली अतिवृष्टी व पुरग्रस्त परिस्थितीमुळे शेतकरी व नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना शासनाने तातडीने 52 कोटी 26 लाखाची आर्थिक मदत दिली आहे. खरीप हंगाम 2020-21 मध्ये किमान आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत 14 लाख 85 हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली असून 49 हजार 610 शेतकऱ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यात 277 कोटी 29 लाख रुपयांची धान खरेदी झाली असून त्यापैकी 160 कोटी 42 लाख रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन जमा केली आहे. उर्वरित रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. शासनाने यावर्षी धानाला 700 रुपये बोनस जाहिर करुन धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
कृषिपंप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 7 हजार 489 कृषिपंपांना वीज जोडणी देण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्याच्या विकासात महत्वाचे योगदान असलेल्या गोसीखुर्द प्रकल्पासाठी आवश्यक निधी देवून हा प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा शासनाचा निर्धार आहे. प्रकल्पातील 12 हजार लाभार्थ्यांना गोसीखुर्द विशेष आर्थिक पॅकेज अंतर्गत 359 कोटी रकमेचे तर प्रकल्पातील 702 वाढीव कुटूंबांना 20 कोटी 35 लाख रकमेचे वाटप करण्यात आले आहे असे ते म्हणाले.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्रमुख खनिजाच्या स्वामित्व धनाच्या निधीमधून पिण्याचे पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, रस्ते, पुल, नाली व पर्यावरण आदि विकास कामांसाठी 20 कोटी 49 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून विकास कामांना सुरुवात सुध्दा झाली आहे. शासनाने आदिवासी विकास विभागामार्फत खावटी अनुदान योजना राबविली आहे. या योजनेत जिल्ह्यातील 11 हजार 459 कुटूंबाची संगणकीय प्रणालीवर नोंद करण्यात आली आहे. पात्र आदिवासी कुटूंबांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेत सन 2020-21 या वर्षात 520 लाभार्थ्यांना मुदत ठेव प्रमाणपत्र काढून लाभ देण्यात आला आहे. सदर योजनेंतर्गत भंडारा जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असल्याबद्दल पालकमंत्र्यांनी अभिनंदन केले.
कृषीपंपांना वीज जोडणी देण्याकरीता शासनाने नुकतेच कृषीपंप विज जोडणी धोरण 2020 मंजूर केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना विश्वासार्ह किफायतशीर व दिवसा सुनिश्चित विज पुरवठा करण्याच्या दृष्टीने तसेच दीर्घकालीन उर्जा सुरक्षिततेच्या दृष्टीने अपारंपारीक उर्जा स्त्रोतांच्या कृषी क्षेत्रांसाठी जास्तीत जास्त वापर करण्याच्या हेतूने शासनातर्फे 26 जानेवारी 2021 रोजी महाकृषी उर्जा अभियान जाहीर करण्यात आलेले आहे. या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषीपंप आस्थापित करण्यात येणार आहे.
कोरोना आजारातून बरे होण्यासाठी उपयुक्त असणारा प्लाझ्मा गरजू रुग्णांना उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने प्लाझ्मा दान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात 96 दात्यांनी प्लाझ्मा दान करुन विक्रम केला. राज्यातील सर्वात मोठे प्लाझ्मा दान शिबिर म्हणून या शिबिराची नोंद झाली. हा प्लाझ्मा रुग्णांसाठी जीवनदान ठरला आहे असे ते म्हणाले.
कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यंत नियोजनबध्द उपाय योजना करुन कोरोना मुक्तीचा दर 96 टक्क्यावर आणला आहे. कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी धोका मात्र टळला नाही. जिल्ह्यात कोविड लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. मास्क वापरणे, नियमित हात धुणे व सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोना या संसर्ग आजारापासून नागरिकांना संरक्षण देण्यासाठी माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिम जिल्ह्यात यशस्वी राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील 12 लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली. बहुप्रतिक्षित कोविड-19 लसीकरणाला जिल्ह्यात 16 जानेवारी पासून यशस्वी सुरुवात झाली असून 9500 कोविशिल्ड लसीचे डोज जिल्ह्यास प्राप्त झाले आहे. पहिल्या टप्प्यात 7605 लाभार्थ्यांना ही लस देण्यात येणार आहे. टाळेबंदीच्या काळात शिवभोजन थाळीच्या माध्यमातून असंख्य नागरिकांना भोजन उपलब्ध करुन दिले. जिल्ह्यात 37 हजार नागरिकांनी शिवभोजन योजनेचा लाभ घेतला असे त्यांनी सांगितले.
सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनामध्ये उत्कृष्ट कामगीरीसाठी जिल्हाधिकारी संदीप कदम व निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांचा स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला. जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेच्या विविध स्पर्धेचे विजेते आयुष्यमान भारत योजनेतील पारितोषिक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले निबंध स्पर्धा, महाकृषी उर्जा अभियानाचे लाभार्थी, पुर परिस्थीती काळात विशेष कामगीरी करणारे पोलीस जवान आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मुकूंद ठवकर व स्मिता गालफाडे यांनी केले. यावेळी नागरीक उपस्थित होते.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबध्द- पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3qXppLQ
via
No comments