Breaking News

प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन : महापालिकेतील कर्तृत्ववानांचा सत्कार

Nagpur Today : Nagpur News

‘सुपर ७५’ आणि वंदेमातरम्‌ हेल्थ पोस्ट साकारणार : महापौर दयाशंकर तिवारी

नागपूर, ता. २६ : पुढील वर्षी संपूर्ण देश स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करणार आहे. यानिमित्त नागपूर महानगरपालिकांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना जेईई-नीट परिक्षांसाठी प्रशिक्षण देऊन त्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवेशाचा मार्ग प्रशस्त करून देण्याचा महाप्रकल्प आणि शौर्यपदक प्राप्त जवानांच्या नावे ७५ ‘वंदेमातरम हेल्थ पोस्ट’ तयार करण्याचा संकल्प नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी जाहीर केला.

प्रजासत्ताक दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित ध्वजवंदन सोहळ्यातील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय झलके, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाने, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, जितेंद्र घोडेस्वार, मोहम्मद इब्राहिम उपस्थित होते.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागपूर महानगरपालिकेतर्फे आरोग्य आणि शिक्षणविषयक प्रस्तावित प्रकल्पांची माहिती दिली. या सर्व प्रकल्पांत लोकसहभाग मिळत आहे. जर हेतू प्रामाणिक असेल तर कुठलाही प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास अडथळा येत नाही. ‘सुपर ७५’ हा प्रकल्प देशासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या विद्यार्थ्यांना खासगी शिकवणी संचालकांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येईल. ७५ हेल्थ पोस्टला देशातील शौर्यचक्र प्राप्त करणाऱ्या जवानांचे नाव देण्यात येईल. त्यांचा जीवन परिचय प्रत्येक हेल्थ पोस्टवर लिहिला असेल. यामुळे आरोग्य उपचारासाठी येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात देशप्रेमाची भावना निर्माण होईल. सदर येथील मनपाच्या रा.ब.गो.गो. शाळेत विद्यार्थ्यांसाठी सैनिकी प्रशिक्षण सुरू करण्यात येईल. संविधान आमचे दैवत आहे. संविधान तयार झाले. त्याचे पालन करणे हे आमचे कर्तव्य आहे. याच संविधानाचे पालन करीत नागपुरात पुढील काही दिवसांत असे अनेक लोकोपयोगी आरोग्य आणि शैक्षणिक प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा मानस आहे. शहरातील ४० वर्षांवरील १२ लाख नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण, २३ नवे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, दोन नागरी समूह आरोग्य केंद्र, ५० बेडेड आयुष्य हॉस्पीटलची सुरुवात, मनपाच्या शाळांतील दहावी, बारावीच्या १९५० विद्यार्थ्यांना टॅब, नवीन शैक्षणिक सत्रापासून सहा नवीन इंग्रजी माध्यमाच्या शाळा, ६३ गठई कामगारांना लीज पट्टे, दृष्टिदोष असणाऱ्या युवतींवर मोफत शस्त्रक्रिया आदी प्रकल्पांची घोषणा महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केली. महापालिका प्रत्यक्षात आणणार असलेले प्रकल्प आणि नागरिकांनी त्याचा उपयोग घेणे हाच खऱ्या अर्थाने संविधानाचा सन्मान असेल, असेही ते म्हणाले. कोव्हिड काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कोरोनायोद्धांसह महापालिकेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा, आयएमए, सामाजिक संघटनांचा त्यांनी आपल्या भाषणातून गौरवोल्लेख केला. कोरोनाकाळात भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करणाऱ्या राधास्वामी सत्संग ब्यासचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

तत्पूर्वी महापौर दयाशंकर तिवारी यांनी ध्वजवंदन केले. अग्निशमन विभागाच्या परेडची महापौर व आयुक्तांनी पाहणी केली. यावेळी उपायुक्त निर्भय जैन, रवींद्र भेलावे, राजेश भगत, मिलिंद मेश्राम, प्रकाश वराडे, अमोल चोरपगार, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, श्वेता बॅनजी, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन उपायुक्त महेश मोरोणे यांनी केले.

विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

यावेळी महापौरांच्या हस्ते कर्तृत्ववानांचा सत्कार करण्यात आला. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम फाऊंडेशनतर्फे जगातील सर्वात लहान उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी देशातील एक हजार विद्यार्थ्यांमधून म.न.पा.च्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थिनी स्वाती विनोद मिश्रा, काजल रामनरेश शर्मा, विज्ञानशिक्षिका दीप्ती बिष्ट, राष्ट्रपती पदकप्राप्त अग्निशमन विभागातील निवृत्त सहायक स्थानाधिकारी धर्मराज नाकोड, अग्निशमन विभागात असतानाच जोखमीची कामगिरी चोखरीत्या बजावणारे केशव रामाजी कोठे, कोरोना काळात कुठलाही खर्च न करता प्रतिबंधित क्षेत्रात बॅरिकेटिंगचे काम करणारे गांधीबाग झोनमधील शिवनाथ शिक्कलवार, बबन चांदेकर, संजय नरांजे, मनोज दाते, बाबाराव मेश्राम, बंडू रंगारी, अज्जू मस्जिद शोला, शादाब सलीम खान यांचा महापौर दयाशंकर तिवारी, आयुक्त राधाकृष्णन बी. आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन : महापालिकेतील कर्तृत्ववानांचा सत्कार



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3r4OeFJ
via

No comments