अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी ‘सीएं’ची भूमिका महत्त्वाची : ना. गडकरी
आयसीएआयची 35 वी प्रादेशिक परिषद
नागपूर: भारत हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी प्रयत्न करीत असताना भविष्यात देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी ‘सीएं’ची भूमिका अतिशय महत्त्वाची राहणार असून सर्वच क्षेत्रात आर्थिक नियोजन करावे लागणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
आयसीएआयच्या 35 व्या प्रादेशिक परिषदेत ना. गडकरी बोलत होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले- ज्ञानाचे महत्त्व वाढले आहे. आर्थिक शिस्तीसह उद्यमशीलता वाढविल्याशिवाय देशाची निर्यात वाढणार नाही व त्याशिवाय 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होणार नाही. सर्वच क्षेत्रात आर्थिक नियोजन करावे लागणार असल्यामुळे सीएची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी सीएचे मार्गदर्शन आवश्यक ठरणार असल्याचेही ते म्हणाले.
पंतप्रधानांनी घोषित केलेल्या 100 लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रकल्प पीपीपी किंवा बीओटीच्या माध्यमातून केले तर या प्रकल्पांची यशस्वी अमलबजावणी होऊ शकते, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- महामार्गांच्या क्षेत्रात आम्ही बहुतेक प्रकल्प पीपीपी-बीओटीच्या माध्यमातून पूर्ण केले आहे. शासनाच्या मर्यादा लक्षात घेता पथकराच्या माध्यमातून आमचे उत्पन्न वाढविले. येत्या 5 वर्षात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उत्पन्न 1.34 लाख कोटींपर्यंत जाईल. या निधीतून प्रकल्प उभारू आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊ. मुंबईतील 55 उड्डाणपूल आणि वरळी-बांद्रा सी लिंकचे उदाहरण त्यांनी यावेळी दिले. हे सर्व प्रकल्प लोकसहभागातून पूर्ण झाले आहेत.
मुंबई-दिल्ली या 12 पदरी महामार्गाचे बांधकाम सुरु आहे. लवकरच तो पूर्ण होईल, असे सांगून ते म्हणाले- रस्ते क्षेत्रात उपलब्ध झालेल्या चांगल्या रस्त्यांमुळे माल वाहतूक आणि इंधन खर्चात बचत झाली आहे. तसेच वाहतुकीसाठी लागणार्या वेळेतही बचत झाली आहे. मोठ्या प्रमाणात आयात होणारे कच्चे तेल लक्षात घेता जैविक इंधन निर्मिती देशासाठी गरजेची असून धान्यापासून इंधन निर्मितीला शासनाने मान्यता दिली आहे.
जैविक़ इंधन निर्मितीमुळे कृषी, ग्रामीण आणि आदिवासी भाग संपन्न होईल व या भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होवून गरिबी आणि उपासमार रोखली जाईल. विकासाचे आणि संपत्तीचे विकेंद्रीकरण करण्यासाठीही सीएंची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे ना. गडकरी म्हणाले.
अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी ‘सीएं’ची भूमिका महत्त्वाची : ना. गडकरी
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2KBiLen
via
No comments