बारा बलुतेदारांच्या प्रतिनिधींनी विधानसभा अध्यक्षांसमोर मांडल्या आपल्या व्यथा
मुंबई – पारंपारिक गावगाड्यातील महत्वाचे घटक असणाऱ्या परंतु अद्यापही अनुदान, आरक्षणादि अनेक लाभांपासून वंचित असणाऱ्या बारा बलुतेदारांच्या तसेच भटके-विमुक्त समाजाच्या प्रतिनिधींनी आज दि. 4 रोजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या दालनात आपल्या व्यथा मांडत वर्षानुवर्षे दुर्लक्षिलेल्या भावभावनांना वाट मोकळी करून दिली … निमित्त होते प्रजा लोकशाही परिषद आणि मुस्लिम ओबीसी संघटनेच्या कल्याण दळे, शब्बीर अन्सारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची विधानसभा अध्यक्षांबरोबर ठरलेली भेट. गावगाड्यातील सर्व समाजघटकांच्या व्यथा मांडल्या जात असतांना एकप्रकारे उपेक्षितांचे अंतरंगच यावेळी उलगडत गेले. विधानसभा अध्यक्षांनी ओबीसी बांधवांच्या या व्यथांची तितक्याच संवेदनशीलतेने दखल घेत मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात तातडीने बैठक आयोजनाचे आश्वासन यावेळी दिले. “ओबीसींची जातीनिहाय जनगणना” हा या संदर्भातील कळीचा मुद्दा असून त्यासाठी आपण स्वत:च पुढाकार घेऊन विधानसभेत ठराव मांडल्याचा संदर्भही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.
महामंडळाकडून वितरीत केलेले अर्थसहाय्य अत्यंत अपुरे आहे किंबहूना नाभिक-धोबी-सुतार-लोहार-सोनार-शिंपी या समाजघटकांना याप्रकरणी सतत दुर्लक्षिले गेले आहे. घटनाकारांना अभिप्रेत असलेला सामाजिक आणि आर्थिक न्याय आम्हाला केव्हा मिळणार ? अशी विचारणा यावेळी विविध समाजाच्या प्रतिनिधींनी केली. बाराबलुतेदार आर्थिक विकासमहामंडळ स्थापन व्हावे, त्याशिवाय आम्हा ओबीसी घटकांना स्वावलंबनासाठी सहाय्य मिळणार नाही, अशी एकमुखी मागणी यावेळी सर्वांनी केली. वस्त्रोद्योग महामंडळात शिंपी समाजासाठी एक सदस्यस्थान राखीव असावे, अशी सूचना यावेळी मांडण्यात आली तर गावगाड्यातील दुर्लक्षित गुरव समाजाच्या प्रतिनिधींनीही आपल्यावरील अन्यायाला दाद मिळत नसल्याची कैफियत यावेळी मांडली.
मानपाठ एक करून आमच्या मुलांनी एमपीएससी परीक्षेसाठी अभ्यास केला परंतु त्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये फार मोठे नैराश्य पसरल्याची भावना यावेळी नाभिक मंडळ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. “होता जीवा म्हणून वाचला शिवा” या ऐतिहासिक संदर्भाची आठवणही यावेळी करून देण्यात आली.मुस्लीम तेली समाज आणि अन्य समाजघटकांना जात पडताळणी संदर्भात सोसाव्या लागणाऱ्या अडचणींकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. बैठकीस आवर्जून उपस्थित असलेले कर्नाटकमधील माजी लोकसभा सदस्य डॉ.व्ही.व्यकंटेश यांनी, ओबीसींच्या तसेच शेतकरी बांधवांच्या प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या नाना पटोले यांनी आता या चळवळीचे राष्ट्रीय नेतृत्व स्वीकारावे कारण पन्नास टक्केहून अधिक लोकसंख्या असलेला हा समाज राजकीय-आर्थिक-सामाजिक दृष्टया बलवान झाल्याशिवाय “मेरा भारत महान” होणार नाही असे सांगितले.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व व्यथा संवेदनशीलपणे ऐकून घेत सर्वांशी अत्यंत मोकळेपणाने संवाद साधला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा दाखला देत ही मोहीम सर्वांनी राजकीदृष्ट्या अधिक संघटीत आणि सक्षम होत आपण यशस्वी करायला हवी. यासंदर्भात आपण पुढकार घेतला असून मुख्यमंत्री, वित्तमंत्री, सामाजिक न्याय मंत्री आदिंसह आपणासर्वांची लवकरच एक बैठक आयोजित करून तातडीने आपणास न्याय देण्यासाठी निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सर्वश्री आ.राजू पारवे, माजी आ. प्रकाश शेंडगे, कल्याण दळे, शब्बीर अन्सारी, शाहरुख मुलाणी, ॲङ पल्लवी रेणके, विद्यानंद मानकर, विजय बिरारी, विवेक ठाकरे, तुकाराम माने, प्रतापराव गुरव, सतिष कसबे यांनी आपले विचार मांडले. मुस्लिम ओबीसींच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे शब्बीर अन्सारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
बारा बलुतेदारांच्या प्रतिनिधींनी विधानसभा अध्यक्षांसमोर मांडल्या आपल्या व्यथा
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3l2ZjV8
via
No comments