उद्योग क्षेत्रातील सुगंधा गारवे नवउद्योजक तरुणींसाठी प्रेरणास्त्रोत
महापौर संदीप जोशी : सन्मान स्त्री शक्तीचा उपक्रमांतर्गत सत्कार
नागपूर, : महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकाची नोकरी सोडून उद्योग क्षेत्रात हिंमतीने उतरणाऱ्या डॉ. सुगंधा गारवे यांनी आपल्या कल्पकतेने, परिश्रमाने आणि समर्पण भावनेने स्वत:चा उद्योग विस्तारला. गुणवत्ता, सुरक्षेचे अनेक मानके गाठलेल्या त्यांच्या कंपनीने दीडशेच्या वर लोकांना रोजगार दिला. नवउद्योजक तरुणींसाठी त्यांचे कार्य प्रेरणा आहे तर त्या प्रेरणास्त्रोत असल्याचे गौरवोद्गार महापौर संदीप जोशी यांनी काढले.
नवरात्रीचे औचित्य साधून ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ या उपक्रमांतर्गत दररोज विविध क्षेत्रातील एका महिलेचा प्रातिनिधिक सत्कार करीत आहेत. गुरुवारी (ता. २२) सहाव्या दिवशी त्यांनी उद्योजक डॉ. सुगंधा गारवे यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत उपमहापौर मनीषा कोठे उपस्थित होत्या. मनपाचा मानाचा दुपट्टा, साडी-चोळी, तुळशीचे रोपटे आणि मानपत्र देऊन महापौर संदीप जोशी आणि उपमहापौर मनीषा कोठे यांनी त्यांचा गौरव केला. डॉ. सुगंधा गारवे ह्या केमिकल इंजिनिअरिंग या विषयात डॉक्टरेट आहेत. ॲनाकॉन लॅबॉरेटरीज प्रा.लि.च्या त्या संस्थापक संचालक आहेत. त्यांनी बरीच वर्षे एलएडी महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्य केले आहे. ही नोकरी सोडून त्यांनी स्वत: बुटीबोरी फूड पार्क येथे ॲनाकॉन लॅबॉरेटरीज प्रा.लि. ही कंपनी सुरू केली. सुमारे १६० कर्मचारी येथे सद्यस्थितीत कार्यरत आहेत. या कंपनीचे सर्व तांत्रिक निर्णय त्या घेत असून या कंपनीच्या त्या धोरणात्मक सल्लागार आहेत. ही कंपनी भारतीय पर्यावरण आणि वनमंत्रालय भारत सरकार, क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया, आयएसओ ९००१ प्रमाणित आहे.
पर्यावरणासाठी १४००१, सुरक्षेसाठी १८००१ अशी मानके या कंपनीला प्राप्त आहेत. फूड सेफ्टी स्टॅण्डर्ड ऑथरिटी फॉर इंडियातर्फे ‘फूड सेफ्टी लॅब’ प्रमाणपत्र प्राप्त आहे. या कंपनीच्या गुणवत्ता व्यवस्थापक म्हणूनही त्या काम बघतात. भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालयातर्फे सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल कंपनीला पुरस्कार मिळाला आहे. सन २०१८ मध्ये श्रीमती गारवे यांना ‘वुमनस् अचिव्हमेंट अवॉर्ड’ प्राप्त झाला आहे. इंस्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स पुणे चॅप्टरने ‘रासायनिक अभियांत्रिकीमध्ये योगदान’ या पुरस्काराने त्यांना गौरवान्वित केले आहे. ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ अंतर्गत गौरव करताना आम्हाला अभिमान वाटत असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी यावेळी सांगितले.
डॉ. सुगंधा गारवे यांनी सत्काराबद्दल महापौर संदीप जोशी आणि उपमहापौर मनीषा कोठे यांचे आभार मानले. तरुणींनी नोकरी करण्यापेक्षा उद्योग क्षेत्रात यावे. स्त्रियांमध्ये उत्तम व्यवस्थापन कौशल्य असल्यामुळे आणि समर्पण भावना असल्यामुळे कुठल्याही क्षेत्रात त्या भरारी घेऊ शकतात. आत्मविश्वासाने त्यांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. उपमहापौर मनीषा कोठे यांनीही सत्कारमूर्ती डॉ. सुगंधा गारवे यांचे अभिनंदन केले.
उद्योग क्षेत्रातील सुगंधा गारवे नवउद्योजक तरुणींसाठी प्रेरणास्त्रोत
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3m7dxEg
via
No comments