कुंभार समाजाने मातीच्या उत्तम डिझाईनच्या वस्तू तयार करून उत्पन्न वाढवावे : गडकरी
कुंभार प्रशिक्षण आणि चाके वाटप कार्यक्रम
नागपूर: मातीच्या आकर्षक डिझाईनच्या वस्तूंना प्रचंड मागणी आहे. मातीच्या परंपरागत वस्तू तयार करताना मूल्यवर्धन करून कुंभार समाजाने मातीच्या उत्तम डिझाईनच्या वस्तू तयार करून स्वत:चे ÷उत्पन्न वाढवावे व विकास साधावा, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
एमएसएमई व खादी ग्रामोद्योग आयोगातर्फे कुंभार समाजाच्या पुरुष व महिलांना प्रशिक्षण व स्वयंचलित चाके वितरण कार्यक्रमात ना. गडकरी मार्गदर्शन करीत होते. एमएसएमई व खादी ग्रामोद्योग आयोगाची कुंभार समाज सशक्तीकरण योजनेअंतर्गत चाके व प्लंजर वाटप करण्यात येत आहे. खादी ग्रामोद्योग आयोग आणि भारत माता लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने कुंभार प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. ना. गडकरी यांच्या पुढाकाराने आणि निर्देशानुसार या प्रशिक्षण वर्गात 40 कुंभारांना 40 चाके आणि 10 कुंभारांच्या एका गटाला 1 प्लंजर 10 टक्के रक्कम भरून उर्वरित अनुदान स्वरूपात खादी ग्रामोद्योग व एमएसएमई मंत्रालय देणार आहे.
यावेळी ना. गडकरी यांनी रेल्वेत कुल्हडमधून चहा देण्यात येत असल्याच्या योजनेचा दाखला दिला. शहरांमध्ये मातीच्या भांड्यांतून जेवण देण्याची पध्दतही आता रुढ होत असल्याचे सांगितले. मिश्रीयुक्त दही मातीच्या भांड्यांमधून देण्यात येत असते. यावरून उत्तम डिझाईन असलेल्या आकर्षक मातीच्या भांड्यांना मागणी वाढत आहे. मातीच्या भांड्यांना विविध आकार देऊन विविध भांडी तयार केल्या जाऊ शकतात. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती निमित्ताने, त्यांनी सांगितलेल्या गावावर आधारित अर्थव्यवस्था आणि तळागाळातील माणसाचा विकास साधण्यास शासनाचे प्राधान्य आहे.
यामुळे गावागावात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील व बेरोजगारांना शहराकडे धाव घेण्याची गरज राहणार नाही. स्वत:च्या पायावर उभे राहून युवकांना आपला आणि आपल्या गावाचा विकास साधणे शक्य होईल. खादी ग्रामोद्योग आयोगाच्या अनेक योजना आहेत, या योजनांचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहनही ना. गडकरी यांनी यावेळी केले.
शुक्रवारी गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्ताने सावनेर तालुक्यातील खापा येथे प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन ना. गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या 24 सप्टेंबरला कुही तालुक्यात चापेगडी येथे कुंभार समाज प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. खापा व सावनेर येथेही प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. दोन्ही प्रशिक्षण कार्यक्रमात प्रत्येक 40 पेक्षा अधिक कुंभार समाजाचे तरुण, तरुणी व महिला सहभागी झाल्या होत्या.
कुंभार समाजाने मातीच्या उत्तम डिझाईनच्या वस्तू तयार करून उत्पन्न वाढवावे : गडकरी
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/36s39CA
via
No comments