Breaking News

बावनकुळे यांचा पूरग्रस्त भागाचा झंझावाती दौरा

Nagpur Today : Nagpur News

शेतकऱ्यांची- नागरिकांची स्थिती अत्यंत हलाखीची त्वरित मदत हवी शेतकऱ्यांशी साधला संवाद सोयाबीन गेले, उडीद मूग गेले, धान कपाशी जाण्याच्या मार्गावर अजून सर्वेक्षण नाही

नागपूर: गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व पूरग्रस्त नागरिकांची स्थिती अत्यंत हलाखीची झाली असून शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि गरीब नागरिकांच्या घरांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने त्वरित मदत द्यावी, शेतकऱ्यांना व गरीब नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

बावनकुळे यांनी शुक्रवारी दिवसभर रामटेक, कन्हान, परशिवणी, सावनेर, कळमेश्वर या तालुक्यांचा दौरा करून नुकसानग्रस्त भागांची आणि गरिबांच्या पडलेल्या घरांची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधून प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, डॉ राजीव पोतदार, माजी आ. मल्लिकार्जुन रेड्डी, महामंत्री अविनाश खळतकर, किशोर रेवतकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सोयाबीनचे पीक पूर्ण शेतकऱ्यांच्या हातातून गेले असल्याचे या दौऱ्यात दिसले. पावसाने उडीद मूग, कपाशी, धानाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच पिकांवरील रोगांमुळे झालेले नुकसान वेगळे आहे. महापुरा आधी पिके चांगली होती. कोरोनामुळे नागवला गेलेला शेतकरी पुन्हा उभा राहील असे वाटत असताना अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्याला संकटात लोटले आहे. अशावेळी त्याच्या पाठीशी खंबीरपणे शासनाने उभे राहणे आवश्यक असताना शासन त्याची दखलही घेण्यास तयार नसल्याचे स्पष्ट झाले असल्याचे बावनकुळे यांनी म्हणटले आहे.

शासना कडून सर्वेक्षण अजून सुरू झाले नाही. सर्वेक्षण पाहिजे नंतर करा पण आधी मदत शेतकऱ्यांपर्यंत पोचवा. महापुराने जिल्ह्यातील हजारो कुटुंब उध्दवस्त झाले आहेत. त्यांचे जीवन आणि संसार पुन्हा उभे करणे शासनाचे काम असताना त्यांना वाऱ्यावर सोडले गेले आहे. या कुटुंबाची अत्यंत वाईट अवस्था असून राज्यात सरकार आहे की नाही असे चित्र सध्या निर्माण झाले आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन जनावरांना खाऊ घातले आहे. पुराने शेती खरडून गेल्यामुळे कपाशीची झाडेही वाहून गेली. प्रति हेक्टरी 50 हजाराची नुकसान भरपाईची मागणी आपण भाजपतर्फे केली. पण मदत तर दूर अजून सर्वेक्षणच सुरु झाले नाही. आता कधी मदत देणार अन कधी सर्वेक्षण करणार? नुकसान व्हायचे ते होऊन गेले साध्या तालुका पातळीवर पाहणी देखील झाली नाही एवढे संथ आणि उदासीन सरकार आहे. पूरग्रस्तांच्या खाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे होती तीही झाली नाही. काहीच हालचाली नाही जिल्हा वाऱ्यावर सोडला असल्याचे ही बावनकुळे म्हणाले.

या दौऱ्यात त्यांच्यासोबत इमेश्वर यावळकर, अजय बोढारे, प्रदेश नेते अशोकराव धोटे, रमेश मानकर, जिल्हा उपाध्यक्ष विकास तोतडे, नितीन राठी, सोनबा मुसळे, संजय टेकाडे, मीना तायवाडे व अनेक जण उपस्थित होते.

बावनकुळे यांचा पूरग्रस्त भागाचा झंझावाती दौरा



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3jP9AmF
via

No comments