Breaking News

शासनाच्या लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवा- पालकमंत्री

Nagpur Today : Nagpur News

नागपूर : आपत्ती, अतिवृष्टी, गारपीट, साथरोग व कोरोनासारख्या संकटाच्या वेळेत महसूल विभाग हा अग्रेसर असून प्रशासनाचा कणा आहे. वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महसूल विभागाचे योगदान मोठे असून शासनाला लोकाभिमूख करण्याची महत्वाची जबाबदारी महसूल विभागावर आहे. सामान्यांशी नाळ जुळलेला हा विभाग असून शासनाच्या लोककल्याणकारी योजना महसूल विभागाने तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात, अशा अपेक्षा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महसूल दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, सुजाता गंधे, विजया बनकर व महसूल विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महसूल विभाग शासनाच्या महत्वाच्या विविध योजना राबविण्यात अग्रस्थानी आहे. जमिन विषयक सर्व बाबी, विविध स्वरुपाचे दाखले, अन्नधान्य वितरण, निवडणूक, सामाजिक सुरक्ष योजना, पाणीटंचाई, कायदा व सुव्यवस्था, पीक कर्जमाफी व नैसर्गिक आपत्ती योग्य पध्दतीने हाताळत असल्यामुळे महसूल विभागास शासनाचा कणा म्हटले जाते. समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र तसेच राज्य पुरस्कृत सामाजिक सुरक्षा योजनांची अंमलबजावणी महसूल विभागामार्फतच केली जाते. महसूल विभाग ही जबाबदारी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडते, अशा शब्दात पालकमंत्र्यांनी महसूल विभागाचा गौरव केला.

पाणीटंचाई असो वा नैसर्गिक आपत्ती एवढेच नव्हे तर आता उद्भवलेल्या अभूतपूर्व कोविड 19 च्या आपत्तीमध्य सर्वसामान्यांना मदत देण्यास महसूल विभाग सदैव तत्पर राहिला आहे. सर्वार्थाने शासनाची प्रतिमा म्हणजे महसूल विभाग असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असे पालकमंत्री म्हणाले. महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजनांचा लाभ समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पाहोचवून त्यांचे जीवन समृध्द करण्याचा महसूल विभागाने सतत प्रयत्न करावा, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

महसूल विभाग हा प्रशासनाचा आधारस्तंभ असून नेहमीच आव्हानात्मक भूमिका पार पाडण्यासाठी महसूल यंत्रणा सज्ज असते. कोरोनाच्या काळात महसूल विभागाने केलेले कार्य अभिमानास्पद असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी सांगितले. नेहमीच कामकाजात संवेदना ठेवणारा विभाग म्हणून महसूल विभागाची ख्याती असून निवडणुकीपासून ते आपत्तीपर्यंत सक्षमपणे हा विभाग काम करतो. लोकांसाठी काम करण्याची तळमळ महसूल यंत्रणेत असून शासन लोकाभिमूख होत असताना महसूल विभाग सेवा देण्यात अग्रेसर राहील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी याप्रसंगी दिली.

महसूल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. उपजिल्हाधिकारी (गोसेखुर्द) अविनाश कातडे, तहसीलदार नागपूर शहर सूर्यकांत पाटील, नायब तहसिलदार रुपेश अंबादे, अव्वल कारकुन सुभाष मोवळे, लिपिक विक्की वाघमारे, मंडळ अधिकारी राजेश चुटे, तलाठी गोविंद टेकाडे, कोतवाल मंगेश जांभुळकर व शिपाई सोजरखाँ गफारखाँ पठाण यांचा यात समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी केले. निवडणुकांपासून ते आपत्ती पर्यंत शासनाच्या सर्व विभागांशी समन्वय साधून महसूल विभाग उत्कृष्ट काम करत असतो तसेच कोरोना साथीच्या काळातही महसूल विभाग काम करत आहे, असे ते म्हणाले. निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी महसूल विभागाचे अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.

शासनाच्या लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवा- पालकमंत्री



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3gkTQ9I
via

No comments