टेस्ट, ट्रेसिंग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीवर काम करा – थोरात
नागपूर : कोरोना प्रादुर्भाव राखण्यासाठी गेले साडेचार महिने शासनाची सर्व यंत्रणा काम करत आहे. दैनंदिन व्यवहार व अर्थ व्यवस्था सुरळीत करण्याला सुद्धा प्राधान्य देणे आवश्यक आहे. अशा कठीण परिस्थितीत नागरिकांनी काळजीसह स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. कोरोना ग्रामीण भागात वाढीस लागला असून कोविड-19 वर मात करण्यासाठी टेस्ट, ट्रेसिंग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीवर काम करण्याचे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, आमदार विकास ठाकरे, राजू पारवे, उपमहापौर मनीषा कोठे, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर व पोलीस अधीक्षक राकेश ओला यावेळी उपस्थित होते.
कोरोनावर मात करण्यासाठी शंभर दिवसाचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना श्री. थोरात यांनी केल्या. शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांनी गर्दी न करणे, काळजी घेणे, जास्तीत जास्त चाचण्या करून घेणे व स्वयंशिस्त पाळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
मुंबईतील धारावी व नाशिक मधील मालेगाव या शहराने केलेल्या कोरोनामुक्तीच्या प्रयोगाची जागतिक पातळीवर चर्चा झाली आहे. प्रशासनाने केलेल्या चांगल्या कामाच्या यशकथा तयार कराव्या असे ते म्हणाले. नागपूरमध्येही उत्तम काम झाले असे सांगून प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचे श्री. थोरात यांनी कौतुक केले. आता शून्य स्थितीकडे जाणे हे आपले लक्ष असून यासाठी शंभर दिवसात कोरोनामुक्ती हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी कोविड संदर्भातील नागपूर विभागाचे सादरीकरण केले. विभागात सध्या 7620 पॉझिटिव्ह रुग्ण असून 3787 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत असे त्यांनी सांगितले. अँटीजेन टेस्टमध्ये नागपूर राज्यात सहाव्या क्रमांकावर आहे. नागपूर विभागात बेड व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध आहेत मात्र मनुष्यबळाची कमतरता असल्याचे त्यांनी नमूद केले. तपासणी वाढल्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे असेही ते म्हणाले. मृत्यू संख्या कमी करण्यावर आमचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर शहरातील सहा वार्डात अँटीजेन तपासणी सुविधा सुरू असून शहरातील 38 वार्डात ही सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त मुंढे यांनी सांगितले. टेस्ट आणि ट्रेसिंग वर भर देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे राधास्वामी सत्संग या ठिकाणी सध्या 500 बेड कार्यरत असून 5000 बेडची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. खासगी हॉटेल सुद्धा रुग्णालयात परावर्तित करण्याबाबा चर्चा सुरू असल्याचे मुंढे म्हणाले.
जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी माहिती दिली. ग्रामीणमध्ये कामठी हे कोरोना हॉटस्पॉट असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ कामठीत 700 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह केसेस असल्याचे त्यांनी सांगितले. 8139 कर्मचारी निरंतर सर्व्हे करत असून नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला जातो असे ते म्हणाले. प्रशासन करत असलेल्या उपाययोजनावर महसुलमंत्र्याने समाधान व्यक्त केले व प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले.
टेस्ट, ट्रेसिंग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीवर काम करा – थोरात
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2Pkn1hg
via
No comments