रुग्णांकडून वसुल केलेली अतिरिक्त रक्कम वोक्हार्ट हॉस्पिटलने परत करावी
नागपूर : कोविड-१९ संसर्गितांकडून अतिरिक्त रक्कम वसूल केल्याच्या प्रकरणात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वोक्हार्ट हॉस्पिटलच्या व्यवस्थापनास नोटीस जारी करीत स्पष्टीकरण मागितले होते. परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मनपा आयुक्तांनी रुग्णांकडून वसूल केलेली अतिरिक्त रक्कम परत करण्याचे नवीन आदेश जारी केले आहेत. यासाठी दोन दिवसाची वेळ दिली आहे. जर संबंंधित वेळेत रुग्णांची रक्कम रुग्णालय व्यवस्थापनाने परत केली नाही तर रुग्णालयाविरुद्ध महामारी कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा, अत्यावश्यक सेवा कायदा, बॉम्बे नर्सिंग अॅक्ट अंतर्गत कारवाई केली जाईल.
आदेशात म्हटले आहे की, रुग्णालयातील ८० टक्के बेड सरकारी दरावर रुग्णांसाठी आरक्षित ठेवायचे आहेत. परंतु रुग्णालयाने याचे उल्लंघन केले. चार रुग्णांचे क्रमश: ६९,५३८ रुपये, १.५० लाख रुपये, १.५९ लाख रुपये आणि १ लाख रुपये इतकी रक्कम परत करण्यात आली नाही. याशिवाय तपासात असेही आढळून आले की १२ रुग्णांकडून अतिरिक्त रक्कम वसूल करण्यात आली. त्यांनाही अतिरिक्त रक्कम परत करण्यात यावी. रुग्णालयाच्या दर्शनी भागात आरक्षित व अनारक्षित बेड, सरकारी व खासगी दर यांचा उल्लेख करावा. एकूण १४ मुद्यांवर मनपा आयुक्तांनी वोक्हार्ट रुग्णालयाला उत्तर मागितले आहे.
विशेष म्हणजे मनपा पथकाने ४ ऑगस्ट रोजी वोक्हार्ट रुग्णालयाची पाहणी केली होती. त्या दरम्यान त्यांना अनेक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. यावर रुग्णालय व्यवस्थापनास २४ तासात उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले होते. उत्तर समाधानकारक न मिळाल्याने मनपा आयुक्तांनी ८ ऑगस्ट रोजी रुग्णांकडून वसूल करण्यात आलेली अतिरिक्त रक्कम परत करण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे नवीन आदेश जारी केले.
रुग्णांकडून वसुल केलेली अतिरिक्त रक्कम वोक्हार्ट हॉस्पिटलने परत करावी
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3imWOey
via
No comments