Breaking News

देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा सुवर्णकाळ भाजपा शासनाने जनतेला दाखवला : नितीन गडकरी

Nagpur Today : Nagpur News

गोवा येथील भाजपाची जनसंवाद रॅली

नागपूर: देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेसाठी कठोर कारवाई करणारे धाडसी पाऊल भाजपाच्या शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात उचलून अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा सुवर्णकाळ या देशातील जनतेला दाखवला. राष्ट्रवाद हा आमचा विचाराचा आत्मा आहे. आधी राष्ट्र सर्वोपरी आहे. देश सुखी, समृध्द आणि शक्तिशाली झाला पाहिजे. सुपर इकॉनामिक पॉवर झाला पाहिजे हे आमचे चिंतन असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

गोवा येथील भाजपाच्या जनसंवाद रॅलीला ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित करीत होते. याप्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री, अन्य मंत्री, आमदार, भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले- देशाच्या स्वातंत्रयापासून आजपर्यंत सर्वाधिक काळ काँग्रेसने राज्य केले. पण गेल्या 5 वर्षात जो विकास आणि जे लोकोपयोगी कामे भाजपाच्या शासनाने केले. ते काँग्रेसच्या 55 वर्षाच्या काळातही केले गेले नाहीत. काँग्रेसच्या काळात साम्यवाद, समाजवाद आणि भांडवलशाही या देशात फोफावली होती. पण आता हे तीनही वाद संपुष्टात आले आहेत. पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या सामाजिक व आर्थिक चिंतनावर आधारित अंत्योदयाचा विचार भाजपाने मांडला आणि त्या विचारावर कार्य सुरु झाले, असे सांगताना ते म्हणाले- दरिद्री नारायणाची सेवा, या देशातील शेवटच्या माणसापर्यंत विकासगंगा पोहोचवणे, अन्न, वस्त्र, निवारा गरीबांना मिळेपर्यंत त्यांची सेवा करण्याचा हा विचार आहे. जोपर्यंत समाजातील शेवटच्या माणसाला अन्न वस्त्र निवारा मिळत नाही तोपर्यंत ही सेवा पूर्ण होत नाही. गरीब माणसाला केंद्रबिंदू मानून आम्ही काम करीत आहोत.

देशातील जातीयता, सांप्रदायिकता समाप्त झाली पाहिजे आणि सामाजिक समरसता प्रस्थापित झाली पाहिजे, या विचाराने आम्ही काम करतो. पण काँग्रेसने केवळ अल्पसंख्यकांची मते मिळावी म्हणून आमच्याबद्दल अपप्रचार केला. केंद्राने जनधन योजना आणली. 35 कोटी लोकांनी खाते उघडले आणि त्यांच्या खात्यात सरळ रक्कम जमा झाली. त्यावेळी आम्ही जातीपाती पाहिल्या नाहीत. 9 कोटी महिलांना उज्वला गॅस सिलेंडर व शेगडी दिली, त्यावेळी कुणाला जात विचारली नाही. सामाजिक शोषणाविरुध्द आणि अन्यायाविरुध्द आम्ही काम करीत आहोत. पण मतांच्या राजकारणासाठी अल्पसंख्यकांच्या मनात भाजपाबद्दल भीती निर्माण करण्याचे काम काँग्रेसने केले आहे, असेही गडकरी म्हणाले.

जम्मू काश्मीरचे 370 वे कलम रद्द करण्याचा धाडसी निर्णय मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा शासनाने घेऊन जम्मू काश्मीरला स्वातंत्र्य दिले असे सांगून गडकरी म्हणाले- काँग्रेसने मात्र अल्पसंख्यकांच्या दबावात आणि मतांच्या राजकारणासाठी 370 कलम रद्द करण्याचा निर्णय कधीच घेतला नाही.

अतिरेक्यांविरुध्द कडक कारवाई करून काश्मीरमध्ये व देशाच्या अंतर्गत भागात शांतता प्रस्थापित करण्याचे काम भाजपा शासनाने केले. जम्मू काश्मीरच्या विकासासाठी आम्ही कटिबध्द आहोत. या देशाला सुखी, समृध्द, शक्तिशाली, सुपर एकॉनॉमिक पॉवर बनवून देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी सुशासन आणि विकासाची कास आम्ही धरली आहे. आणि त्या दिशेने आमचे काम सुरु असल्याचेही शेवटी गडकरी म्हणाले.

देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा सुवर्णकाळ भाजपा शासनाने जनतेला दाखवला : नितीन गडकरी



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2YqzmpH
via

No comments