Breaking News

घरबसल्याच लॉकडाऊन करा एन्जॉय

Nagpur Today : Nagpur News

नागपूरकरांसाठी अभिनव महापौर चषक डिजीटल पारिवारिक समूह गीतगायन स्पर्धा

नागपूर,: संगीतामध्ये मानवी मनाला सकारात्मक करण्याची अद्‌भूत क्षमता आहे. सध्याच्या कोरोना एकांतवासात आलेली निराशा दूर करून देवभक्ती आणि देशभक्तीच्या जागराने आपले घर-आंगण भारून जावे यासाठी महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आणि संस्कार भारतीच्या सहकार्याने अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘महापौर चषक डिजीटल पारिवारिक समूह गीतगायन स्पर्धा’ असे या उपक्रमाचे नाव असून नागपुरातील प्रत्येक परिवाराला या स्पर्धेत घरबसल्या सहभागी होता येणार आहे.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपण गायकच असावे, असे बंधन नाही. ही स्पर्धाच मुळात प्रत्येक कुटुंबासाठी असून कुटुंबातील कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त आठ व्यक्ती यात सहभागी होऊ शकतील.

काय आहे स्पर्धा?
‘कुटुंब रंगलंय गाण्यात’ या संकल्पनेखाली केवळ नागपूर महानगरपालिका क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबासाठीच ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात गेल्या दीड महिन्यापासून घरी बसलेल्या प्रत्येक कुटुंबासाठी विरंगुळा म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेमध्ये भक्तीगीत, सिनेगीत अथवा देशभक्ती गीत गाता येईल. एका कुटुंबाला तीन वर्गवारीपैकी कुठल्याही दोन वर्गवारीमध्ये सहभागी होता येईल. मात्र त्यासाठी वेगवेगळे प्रवेश अर्ज दाखल करावे लागतील. ही स्पर्धा पूर्णपणे डिजीटल माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यासाठी कुटुंबातील एका व्यक्तीने ऑनलाईन पद्धतीने असलेला प्रवेश अर्ज भरायचा आहे. त्याच अर्जात आपण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तयार केलेला व्हिडिओ जोडायचा आहे.

व्हिडिओ हा १०० एमबी पेक्षा अधिक आकाराचा नसावा, याची काळजी घ्यावयाची आहे. स्पर्धेत कुटुंबातील कमीत कमी दोन आणि जास्तीत आठ सदस्य सहभागी होऊ शकतील. गीते ही हिंदी अथवा मराठी भाषेतील असावी. व्हिडिओतील गीतांचा कालावधी पाच मिनिटांपेक्षा अधिक नसावा. स्पर्धकांनी गायलेले गीत समूहगीतच असावे. यामध्ये आपल्या कुटुंबातीलच सदस्यांचा समावेश असेल. बाहेरचा व्यक्ती नसावा. गायनाचा व्हिडिओ तयार करताना सोशल डिस्टंसिंगचे नियम कटाक्षाने पाळावेत. समूहगान करताना ऑडिओट्रॅक बॅकग्राऊंड म्युझिकचा वापर करता येईल. मात्र स्वतंत्र वाद्यवृदांचा समावेश केलेली गीते स्पर्धेत सहभागी केली जाणार नाहीत. गीतांची निवड, त्यातील सकारात्मक संदेश, एकूण सादरीकरण, वेशभूषा या बाबींचा परिक्षणादरम्यान विचार करण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश अर्जासह व्हिडिओ पाठविण्याची अंतिम तारीख १५ मे राहील.

तीनही गटातील विजेत्या पारिवारिक चमूंना प्रथम महापौर चषक व रु. २१ हजार रोख, द्वितीय रुपये १५ हजार रोख, तृतीय रु. ११ हजार रोख तसेच रु. एक हजारचे पाच प्रोत्साहन पुरस्कार प्रमाणपत्रासह नागपूर महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येतील.

प्रवेश कसा घ्यावा…?
प्रवेशासाठी आणि व्हिडिओ अपलोड करण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि संस्कार भारतीच्या वतीने गुगल फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. https://ift.tt/3dk2K5y या लिंकवर गुगल फार्म उपलब्ध आहे. नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक पेज, अधिकृत ट्विटर हॅण्डल आणि इंस्टाग्रामवर ही लिंक उपलब्ध राहील. याव्यतिरिक्त ९५९४८९२१०८, ९४२२१५९९५७, ९८२३७२४३२६ या क्रमांकावर आपण मॅसेज केल्यास लिंक उपलब्ध करून देण्यात येईल. नागपूरकरांसाठी नागपूरकरांच्या मनोरंजनासाठी नागपूरकरांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत नागपुरातील प्रत्येक कुटुंबांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिका आणि संस्कार भारतीच्या वतीने करण्यात आले आहे.

घरबसल्याच लॉकडाऊन करा एन्जॉय



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2W2I5wO
via

No comments