Breaking News

मनपाच्या समुपदेशनामुळे शेकडोंना फायदा

Nagpur Today : Nagpur News

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे : आतापर्यंत १२०८ जणांचे समुपदेशन

नागपूर: कोरोनाचा वाढता धोका आणि त्यामुळे असलेले लॉकडाउन यामुळे अनेकांच्या मनात भिती आहे. अशी भिती आणि अन्य कारणांमुळे अनेकांना मानसिक त्रास होतो. चिंता, ताणतणाव, नैराश्य, भ्रमनिरास, मनोशारिरीक दोष, भावनिक असंतोष असे सहा प्रकारचे मानसिक त्रास वाढण्याची आजघडीला शक्यता आहे. त्यादृष्टीने मनपाने समुपदेशन सुरू केले आहे. मनपाद्वारे आतापर्यंत दहाही झोनमधील १२०८ जणांचे समुपदेशन करण्यात आले आहे. सद्याचे तणावपूर्ण वातावरण लक्षात घेता मनपाचे समुपदेशन लाभदाय ठरत आहे. मनपाच्या समुपदेशनामुळे शेकडोंना फायदा झाला असून पुढेही हे समुपदेशन सुरूच राहणार आहे, असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.

कोव्हिड-१९च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सारेच जण घरात आहे. हाताला काम नाही, हातात पैसा नाही यामुळे अनेक जण नैराश्याच्या छायेत आहेत. नागरिकांमध्ये वाढता वैफल्यग्रस्तपणा टाळण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे समुपदेशन सुरू करण्यात आले आहे. यासाठी एका झोनमध्ये दोन याप्रमाणे १० झोनमध्ये २० समुपदेशक नेमण्यात आले आहेत. मानसिक त्रास असलेल्या व्यक्तींकडून मनपाच्या नियंत्रण कक्षामध्ये फोन येताच तो फोन संबंधित झोनच्या समुपदेशकांकडे वळविला जातो. त्यानुसार संबंधित व्यक्तीचे आवश्यक ते समुपदेशन केले जाते. गरज असल्यास त्या व्यक्तीच्या घरी जाउनही त्याचे समुपदेशन मनपा करते. या समुपदेशकांकडून समाधान न झाल्यास मनपातर्फे दोन मानसोपचार तज्ज्ञांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात कोणालाही मानसिक त्रास होउ नये यासाठी मनपाने हा पुढाकार घेतला आहे. या तणावपूर्ण काळात अशा समुपदेशनाची गरज लक्षात घेउन मनपाने पुढेही हे समुपदेशन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोव्हिड संदर्भातील भीती आणि अन्य शंका असतील तर समुपदेशनासाठी नागपूर महानगरपालिका नियंत्रण कक्षात ०७१२-२५६७०२१, ०७१२-२५६२४७४, ०७१२-२५६१८६६ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहनही मनपा आयुक्तांनी केले आहे.

सर्वाधिक समुपदेशन आसीनगर झोनमध्ये
समुपदेशनासाठी हेल्पलाईन क्रमांक नागपूर महानगरपालिकेने जाहीर केल्यानंतर आतापर्यंत दाहाही झोनमधील १२०८ जणांचे समुपदेशन करण्यात आले आहे. यामध्ये आसीनगर झोनमधील सर्वाधिक २३४ व्यक्तींचे समुपदेशन प्रगतीपथावर आहे. तर दुस-या क्रमांकावर गांधीबाग झोनमधील २२४ जणांचे समुपदेशन प्रगतीपथावर आहे. यानंतर धरमपेठ झोनमधील १९२ व्यक्तींचे, धंतोली झोनमधील १५४ व्यक्तींचे तर लक्ष्मीनगर झोनमधील ११८ जणांचे समुपदेशन प्रगतीपथावर आहे.

याशिवाय हनुमाननगर झोनमध्ये ८७ व्यक्तींचे, नेहरूनगर झोनमध्ये ७२ व्यक्तींचे, सतरंजीपुरा झोनमध्ये ४३ व्यक्तींचे, लकडगंज झोनमधील २४ तर मंगळवारी झोनमधील ६० व्यक्तींचे समुपदेशन प्रगतीपथावर आहे. समुपदेशन करणाऱ्या व्यक्तींमध्ये चिंतादोष असलेले व्यक्ती सर्वाधिक असल्याचे आढळून आले. आतापर्यंत चिंतादोष असलेल्या ४९९ व्यक्तींचे समुपदेशन प्रगतीपथावर आहे. ताणतणाव असलेल्या १९८ व्यक्तींचे समुपदेशन प्रगतीपथावर आहे. बेघर निवारा केंद्रांमध्येही तेथील रहिवाश्यांचे समुपदेशन केले जात आहे. मनपातर्फे संपूर्ण शहरात २० बेघर निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. घराबाहेर राहणा-या या लोकांना कोणतेही मानसिक त्रास होउ नये या करिता त्यांचेही निवारा केंद्रात समुपदेशन केले जात आहे.

मनपाच्या समुपदेशनामुळे शेकडोंना फायदा



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3bzxfUl
via

No comments