आदेश झुगारुन काम सुरू ठेवणाऱ्या ठवकर, बजाज शोरूमवर लाखोंचा दंड
मनपा आयुक्तांच्या निर्देशाने कारवाई : दीड लाखांचा दंड
नागपूर: एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा आणि मनपा प्रशासन दिवसरात्र एक करीत आहे तर दुसरीकडे प्रशासनाच्या आदेशाला झुगारून काही खासगी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले जात आहे. असा आदेश झुगारणाऱ्या दोन कंपन्यांना सोमवारी (ता. २४) मनपाच्या उपद्रव शोध पथकाने दीड लाखांचा दंड ठोठावला.
शहरातील सर्व खासगी, कॉर्पोरेट व अन्य आस्थापना ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिलेले आहेत. असे असतानाही वर्धमान नगर येथील ठवकर कंपनीतील सुमारे ६०-७० लोकांना कामावर बोलावण्यात आले होते. कंपनीचे शटर बंद ठेवून त्यांच्याकडून काम करवून घेतले जात होते.
मनपाच्या नियंत्रण कक्षाकडे याबाबत माहिती मिळताच मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार लकडगंज झोनचे सहायक आयुक्त सुभाष जयदेव आणि उपद्रव शोध पथकाच्या चमूने सदर कंपनीवर धाड टाकली. तक्रारीनुसार तेथे सुमारे ६० ते ७० कर्मचारी काम करताना आढळून आले. कोरोना संदर्भात साथ रोग नियंत्रण कायद्याखाली मनपा आयुक्तांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे लक्षात येताच मनपाच्या अधिकाऱ्यांनी सदर कंपनीवर एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.
बजाज शो रुमवरही कारवाई
वर्धमान नगरमधीलच हनी सागर अपार्टमेंट येथे बजाजचे शो रुम आहे. याठिकाणीसुद्धा मागील गेटने कामगारांना आत घेऊन तेथे काम सुरू ठेवण्यात आले होते. याबाबतही मनपाच्या नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तेथेही धाड मारली. आदेशाचे उल्लंघन झाल्याचे लक्षात येताच शो रुम मालकाला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. वेळोवेळी सांगूनही जर नागरिक कायद्याचे उल्लंघन करीत असेल तर यापेक्षाही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
आदेश झुगारुन काम सुरू ठेवणाऱ्या ठवकर, बजाज शोरूमवर लाखोंचा दंड
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2Ublv4a
via
No comments