कोरोना प्रतिबंधासाठी राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी जनजागृती करावी – सर्वपक्षीय बैठकीत डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन
नागपूर: कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेली आपत्ती मोठी असून तिचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन निर्धाराने प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना सर्व राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्यप्रतिनिधींनी सहयोग देतांना नागरिकांमध्ये जागृती करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.
कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंर्वधन मंत्री सुनिल केदार, खासदार डॉ. विकास महात्मे, महापौर संदीप जोशी, आमदार सर्वश्री प्रा. जोगेंद्र कवाडे, ना.गो. गाणार, प्रा. अनिल सोले, प्रकाश गजभिये, मोहन मते, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, आशिष जयस्वाल, विकास ठाकरे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, दुष्यंत चतुर्वेदी, तसेच प्रविण दटके, हेमंत गडकरी, सतिष चतुर्वेदी, अनिल अहिरकर, गिरीश गांधी, दिनानाथ पडोळे, महेश दलाल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी कोरोना विषाणूच्या प्रभावाला रोखण्यासाठी विधायक सूचना केल्या.
नागरिकांनी कोरोनासंदर्भात सावधगिरी बाळगावी. शक्यतो घराबाहेर निघण्याचे टाळावे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, जीवनावश्यक बाबींची दुकाने सुरुच राहणार आहेत. अफवांवर विश्वास ठेवून नागरिकांनी दुकानांमध्ये गर्दी करु नये. आवश्यकता पडल्यास मोबाईल व्हॅनद्वारे जीवनावश्यक वस्तूंची विक्री घरपोच करण्यात येईल. खासगी डॉक्टरकडे कोरोनाशी समान असलेली लक्षणे असणारे रुग्ण जात आहेत. त्यांना प्रशासनाकडून सूचना देण्यात याव्यात, जेणेकरुन खासगी डॉक्टरांकडून रुग्णांची स्वॅब तपासणी करता येईल. सामाजिक संस्था तथा लोकप्रतिनिधी यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे जनजागृती करावी, तसेच शहरातील काही भागात अद्यापही दुकाने सुरु आहे त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले.
कोरोनाबाबत खासगी डॉक्टरांना देखील तपासणीसाठी लवकरच सूचना देण्यात येतील. नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. उद्या (रविवार, दि.22 मार्च) नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वयंप्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला नागरिकांनी पाठींबा द्यावा. तसेच कोरोना संसर्गाची तीव्रता लक्षात घेवून 31 मार्चपर्यंत कोणाचेही नळ किंवा वीज कनेक्शन कापण्यात येवू नये. कापले असल्यास ते तात्काळ पूर्ववत करण्यात येतील. कोरोना संदर्भात प्रशासनाने आतापर्यंत चांगले काम केले आहे. मात्र यापुढील 15दिवस अत्यंत महत्वाचे आणि जोखमीचे असल्यामुळे धार्मिक स्थळे, मंदीर, मशीद, बुध्दविहार यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांमध्ये कोरोना विषाणूचा प्रचार आणि प्रसार थांबविण्यासाठी जनजागृती करावी. वारंवार हात धुणे, गर्दीची ठिकाणे टाळणे, चेहऱ्याला हाताचा अनावश्यक स्पर्श टाळणे अशा सूचना धार्मिक स्थळांमार्फत दिल्यास सर्व दूर त्याचा प्रसार होईल, असेही त्यांनी सांगितले.
चुकीची अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. जिल्हा प्रशासनाने आजपर्यंत उत्तम व्यवस्थापन केल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे, असे महापौर संदीप जोशी यांनी केले.
श्री. केदार म्हणाले, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने शासनाच्या सूचनांचे पालन करावे, सक्ती करण्याची वेळ येवू देवू नये. जीवनावश्यक वस्तूंचा साठा नियमित व्हावा तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्यासाठी शासन गंभीर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जनावरांसाठी चारा ग्रामीण भागातून येत असतो. परंतु सद्यस्थितीत चाऱ्याचे प्रमाण अत्यल्प झाल्यामुळे मोबाईल व्हॅनद्वारे चारा पोहचविल्यास पशुपालकांना दिलासा मिळेल, असे ते म्हणाले.
डॉ. संजीव कुमार यांनी कोरंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांच्या सद्यस्थितीची माहिती यावेळी दिली. सध्या नागपूर शहरात चार हजार लोकांची कॉरंटाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. मागील 15 दिवसांपूर्वी परदेशातून आलेल्या प्रवाशांची यादी प्रशासनातर्फे मागविण्यात आली आहे. या प्रवाशांची तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3bpoCeR
via
No comments