Breaking News

नागपुरात २६ पासून ‘कोरोना’ सर्व्हे

Nagpur Today : Nagpur News

आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती : सहकार्य करण्याचे आवाहन


नागपूर: नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या निवासापासून तीन किलोमीटर परिसरात सर्व्हेची घोषणा केल्यानंतर लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनअंतर्ग़त येणाऱ्या संपूर्ण घरांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. आता गुरुवार २६ मार्चपासून आता या दोन झोन व्यतिरिक्त संपूर्ण नागपूर शहरात सर्व्हे होणार असून यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार उर्वरीत आठ झोनमध्येही हा सर्व्हे करण्यात येणार आहे. ‘कोरोना’विषयक जनजागृती आणि शहरातील आरोग्याची माहिती अशा दुहेरी हेतूने हे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. या संपूर्ण सर्व्हेक्षणादरम्यान संपूर्ण नागरिकांची माहिती घेण्यात येणार आहे. आरोग्यविषयक प्रश्न विचारण्यात येणार आहे. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. आपल्या घरापर्यंत येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र राहणार आहेत. त्यामुळे त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. ‘लॉकडाऊन’दरम्यान काही अडचणी येत असतील तर त्यासुद्धा आपण त्यांना सांगाव्या, असेही त्यांनी म्हटले आहे.

नागरिकांकडून माहिती घेतल्यानंतर, ज्या कोणाला आरोग्याचा काही त्रास जाणवत असेल त्यांनी अथवा त्यांच्या कुटुंबीयांना मनपाच्या नियंत्रण कक्षात फोन करून याबाबत माहिती द्यायची आहे. कुणालाही दवाखान्यापर्यंत जाण्याची गरज नाही. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर डॉक्टरांची चमू संबंधित घरापर्यंत जाईल आणि तेथे उपचार देईल. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनानचे पुढील आदेश येईपर्यंत घराबाहेर पडण्याची गरज नाही, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनमधील सर्व्हेक्षणासाठी १६ चमू तयार करण्यात आल्या होत्या. एका चमूमध्ये २६ सदस्य असून त्यातील २-२ सदस्य एका-एका घरी भेट देत आहेत. आता संपूर्ण शहराच्या सर्व्हेसाठी २८८ चमू तयार करण्यात आल्या असून यातील दोन-दोन सदस्य शहरातील प्रत्येक घरी जाऊन हा सर्व्हे करेल. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच सर्व्हे असून नागपूर महानगरपालिकेने कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी हे पाऊल उचलले आहे. मनपाकडून येणाऱ्या टीममध्ये आरोग्य सेविका, शिक्षक तसेच कर्मचारी आहेत. त्यामुळे कुठलाही दुजाभाव न ठेवता त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

सर्व्हेदरम्यान एकही बाधीत आढळला नाही
पूर्वीच्या बाधीत चार रुग्णांच्या घरापासून तीन किलोमीटरच्या परिघात सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनपाच्या आरोग्य विभागाने लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनमध्ये सुमारे ६४ हजार ४३६ कुटुंबातील दोन लाख ६४ हजार ६१७ लोकांची माहिती घेतली. विशेष म्हणजे दोन झोनचा सर्व्हे पूर्ण झाला असून त्यात एकही कोरोनाची लक्षणे असलेला अथवा बाधीत व्यक्ती आढळला नाही. ही अत्यंत सुखावह बाब असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.

नागपुरात २६ पासून ‘कोरोना’ सर्व्हे



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3bofQxn
via

No comments